२००० नंतर ऑस्ट्रेलियन संघाने खऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने सलग दोन विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्या ऑस्ट्रेलियन संघात पॉन्टिंग, गिलख्रिस्ट, हेडन, सायमंड्स, मार्टिन यासारख्या दिग्गज फलंदाजांसोबत ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली व जेसन गिलेस्पी हे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज होते. या तिघांच्या सोबतीला अधीमधी इतर गोलंदाजांना संधी दिली जात यात अँडी बिकेल, स्टुअर्ट मॅकगिल ही नावे प्रामुख्याने समोर येतात. मात्र एक वेगवान गोलंदाज होता जो या संपूर्ण काळात ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा सदस्य असताना देखील, तितकासा प्रकाशझोतात राहिला नाही. तो वेगवान गोलंदाज म्हणजे नॅथन ब्रेकन. आज ब्रेकनचा ४५ वा वाढदिवस.
नॅथन ब्रेकन (Nathan Bracken) याचा क्रिकेटशी संबंध शालेय स्तरावरच आला. शाळेत ब्रेकन ज्या पद्धतीने बॉल स्विंग करीत असे ते पाहून शाळेतील मुले आणि प्रशिक्षक देखील आवाक् होत असत. त्याच्या चेंडू स्विंग करण्याच्या कलेमुळे तो न्यू साउथ वेल्समध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला. येथूनच त्याने क्रिकेटकडे गंभीरतेने पहायला सुरुवात केली.
शालेय स्तरावर आपल्या स्प्रिंगवुड हायस्कूल या शाळेला आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर त्याने अनेक स्पर्धा जिंकून दिल्या. ब्रेकनची दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची कला पाहून १९९६ मध्ये त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट ॲकॅडमीसाठी निवडण्यात आले. ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण देत असे. ब्रेकन ज्यावेळी ॲकॅडमीमध्ये दाखल झाला होता तेव्हा ब्रेट ली, स्टुअर्ट मॅकगिल व सायमन कॅटिच त्याचे सहकारी होते.
१९९७ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट अकॅडमीमधून बाहेर पडल्यानंतर त्याची निवड न्यू साउथ वेल्सच्या संघात करण्यात आली. क्वींसलंड विरुद्ध त्याने आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले मात्र तो प्रभावी कामगिरी करू शकला नाही. पुढील तीन वर्ष पायाची दुखापत व खराब कामगिरीमुळे त्याची काहीही प्रगती झाली नाही.
सन २०००-०१ चा प्रथमश्रेणी हंगाम त्याने चांगलाच गाजवला. न्यू साउथ वेल्ससाठी २९ बळी घेत, तो स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. या दमदार कामगिरीमुळे त्याला २००१ अॅशेससाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले. त्याच वर्षी ब्रेकनला ब्रॅडमन यंग क्रिकेटर ऑफ द इयर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा पुरस्कार देण्यात आला.
ब्रेकनला २००१ मध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नाही मात्र त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो ऑस्ट्रेलियाच्या संघाचा नियमित सदस्य बनला. २००३ च्या विश्वचषक विजेत्या संघात ब्रेकनचा समावेश होता. २००१ मध्ये राष्ट्रीय कसोटी संघात निवड झाली असली तरी पहिली संधी मिळायला २००३ साल उजाडावे लागले. जखमी ग्लेन मॅकग्राच्या जागी ब्रेकनने ४ डिसेंबर २००३ रोजी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी पहिली कसोटी खेळली. कसोटी निवडीनंतर ब्रेकनने इंग्लिश काउन्टी संघ ग्लॉस्टरशायर सोबत देखील करार केला.
डिसेंबर २००३ मध्ये कसोटी सामन्यात पदार्पणानंतर संघाकडे असलेल्या इतर दिग्गज वेगवान गोलंदाजांमुळे ब्रेकनला ऑस्ट्रेलियन कसोटी संघापासून २ वर्षे बाहेर बसावे लागले. अखेर २००५ मधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीसाठी त्याची निवड झाली. त्या सामन्यात चार बळी मिळवून देखील, उर्वरित मालिकेसाठी तो संघात आपले स्थान टिकवू शकला नाही आणि निवडकर्त्यांनी स्टुअर्ट मॅकगिलला संघात स्थान दिले. त्याच वर्षी ब्रेकनने, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला.
कसोटी संघातून दुर्लक्षित केले गेल्याने ब्रेकनने आपले संपूर्ण लक्ष एकदिवसीय क्रिकेट व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्याने सुरू झालेल्या टी२० वरती द्यायला सुरुवात केली. ब्रेकनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विशेष मेहनत घेत २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी व द. आफ्रिका दौरा गाजवला. भारतात झालेल्या २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात ब्रेकनने हातभार लावला. द. आफ्रिकेने यशस्वी पाठलाग केलेल्या ४३४ धावांच्या सामन्यात ब्रेकनने पाच बळी मिळवले होते. त्या दौऱ्यातील शानदार कामगिरीमुळे त्याची निवड २००७ च्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात झाली. ग्लेन मॅकग्रा व शॉन टेट यांच्यासह तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भुमिका पार पाडत ब्रेकनने २००७ विश्वचषकात १६ बळी घेत ऑस्ट्रेलियाला सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. २००८ च्या सुरुवातीला डॅनियल व्हेटोरीला हटवून तो अव्वल एकदिवसीय गोलंदाज बनला. त्या वर्षीचा, सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा ‘ऍलन बॉर्डर पुरस्कार’ देखील त्याने आपल्या नावे केला.
ब्रेकनने अखेरचा एकदिवसीय सामना १७ सप्टेंबर २००९ रोजी खेळला खेळला. त्यानंतर, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो २००९ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला. ऑस्ट्रेलियन निवड समितीने युवा खेळाडूंचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर ब्रेकनला पुन्हा संधी मिळाली नाही. अखेर, ब्रेकनने जानेवारी २०११ रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २०१२ मध्ये, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याच्याशी दुर्व्यवहार केला म्हणून त्याने बोर्डाला न्यायालयात खेचले होते.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, ब्रेकनने आपली ‘सेकंड इनिंग’ राजकारणात सुरू केली. २०१३ च्या फेडरल निवडणुकीत ब्रेकनने डॉबेलच्या ऑस्ट्रेलियन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव सीटवर अपक्ष म्हणून क्रेग थॉमसन यांच्याविरुध्द निवडणूक लढविली आणि ८.२ टक्के प्राथमिक मते मिळवली.
डोक्यावर विशिष्ट प्रकारचा हेअरबँड घालून गोलंदाजी करताना, आजूबाजूला इतर दिग्गज गोलंदाज असतानाही, १७४ एकदिवसीय बळींसह ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघातील प्रमुख खेळाडू म्हणून त्याने आपली कारकीर्द संपवली. अचूकता, दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची क्षमता आणि उत्कृष्ट कटर चेंडू यांच्या मिश्रणाने ब्रेकनने स्वत: ला मर्यादित षटकांच्या क्रिकेट मधील एक श्रेष्ठ गोलंदाज म्हणून सिद्ध केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेला विजयाच्या ‘वीरू स्टाईल’ शुभेच्छा; पाकिस्तानलाही मारला टोमणा
पीसीबी अध्यक्षांना पराभव बोचला! भारतीय पत्रकाराशी केले गैरवर्तन; पाहा व्हिडिओ
वानिंदु हसरंगा मालिकावीर, तर अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळी करणाऱ्याला मिळाले ‘हे’ बक्षीस