---Advertisement---

खाकीच्या भीतीने ‘त्याची’ अशी काही टरकली की, पठ्ठ्याने भारतात येण्याचेच बंद केलं

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 5:07 PM
MARLON SAMUELS
---Advertisement---

जमैका.. कॅरेबियन बेटांवरील एक सुंदर देश. क्रिकेट आणि इतर खेळांवरही हा देश भरभरून प्रेम करतो. मनमौजी स्वरुपाची माणसं आणि निसर्गाने मुक्तपणे केलेली रंगांची उधळण या देशाची वैशिष्ट्ये.. जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेले उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, योहान ब्लेक हे याच देशाचे खेळाडू.. क्रिकेटबाबतीत म्हणाल तर फ्रँक वॉरेल, जेफ्री दुजॉ, मायकल होल्डिंग, कर्टनी वॉल्श हे सर्वकालीन महान खेळाडू याच जमैकन मातीतील. सध्याच्या टी२० क्रिकेटचे दोन ‘दादा’ खेळाडू असलेले ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल हेदेखील, क्रिकेट विश्वाला ‘जमैकन पावर’ दाखवणारे क्रिकेटमधील बाहुबली. गेल आणि रसेल यांच्या व्यतिरिक्त एकविसाव्या शतकातील जमैकन क्रिकेटचा तिसरा महत्त्वपूर्ण शिलेदार म्हणजे मार्लेन सॅम्युअल्स. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जितके अविस्मरणीय क्षण सॅम्युअल्सने वेस्ट इंडीज क्रिकेटला दिले, तितकेच वाद देखील सॅम्युअल्सने ओढवून घेतले. या सॅम्युअल्सने दोन दशकांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याच सॅम्युअल्सच्या क्रिकेट प्रवासाचा त्याच्या वाढदिवशी मागोवा घेऊया.

शाळेला दांडी मारून क्रिकेट मैदाने गाजवणारा सॅम्युअल्स

सॅम्युअल्सचा जन्म जमैकाची राजधानी असलेल्या किंगस्टनचा. आपला भाऊ रॉबर्ट याच्यासमवेत तोदेखील लहानपणापासून क्रिकेट खेळू लागला. सॅम्युअल्ससाठी क्रिकेटच सर्वकाही होते. खाणे, झोपणे आणि क्रिकेट खेळणे अशी त्याची दिनचर्या होते. इतर मुले शाळेत जात असताना हा, शाळेला दांडी मारून क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करण्यात व्यस्त असायचा. लहानपणीच, आपल्याला मोठे क्रिकेटपटू व्हायचे आहे; असे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये तो दमदार कामगिरी करायला.

प्रथमश्रेणी सामना न खेळता आंतरराष्ट्रीय पदार्पण

शाहरूख खान आपल्या चित्रपटात म्हणतो, “किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलने की कोशिश मे लग जाती है।” अगदी असंच काहीसं सॅम्युअल्ससोबत झालं. फक्त स्थानिक स्पर्धांमधील कामगिरीच्या जोरावर सॅम्युअल्सला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. एकही प्रथमश्रेणी सामना न खेळता तो वेस्ट इंडीज संघात दाखल झाला. सॅम्युअल्सला सन २००० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. पाठोपाठ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत त्याला वेस्ट इंडीजच्या कसोटी संघाची टोपी देखील मिळाली.

भारत दौऱ्यावर केली दिमाखदार कामगिरी

सॅम्युअल्सने २००२-२००३ चा भारत दौरा गाजवून, क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. कोलकत्ता येथील इडन गार्डन्सवरील कसोटीमध्ये वेस्ट इंडिज संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. त्यावेळी, सॅम्युअल्सने हरभजन सिंह, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ या कसलेल्या गोलंदाजांविरुद्ध धाडसाने फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. सॅम्युअल्सच्या १०४ धावांच्या खेळीमुळे, वेस्ट इंडीजने हा सामना अनिर्णित राखला. कसोटी मालिकेत पाठोपाठ, एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात देखील त्याची बॅट पुन्हा तळपली. सात सामन्यांची मालिका ३-३ अशा बरोबरीत असताना, सॅम्युअल्सने विजयवाडा येथील अखेरच्या निर्णायक सामन्यात अवघ्या ७५ चेंडूत १०८ धावांची विस्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडीजने ३१५ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाला १८० धावांत गुंडाळून वेस्टइंडीज नाही मालिका विजय साजरा केला. २००३ विश्वचषकानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो काही काळ संघाबाहेर राहिला.

ब्रायन लाराला शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धावबाद करण्यात सॅम्युअल्सचा होता सहभाग

सॅम्युअल्सने २००६-२०७ मध्ये भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे गाजवले. सॅम्युअल्स हा वेस्ट इंडीजमध्ये आयोजित २००७ क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज संघाचा सदस्य होता. या विश्वचषकानंतर वेस्ट इंडीजचा सर्वकालीन महान फलंदाज ब्रायन लाराने निवृत्ती घेतली होती. लारा आपल्या अखेरच्या सामन्यात धावबाद झालेला. दुर्दैवाने, लाराला धावबाद करताना दुस-या टोकाला फलंदाज म्हणून सॅम्युअल्स होता. सॅम्युअल्सच्या आवाजाला प्रतिसाद देत लारा एका धावेसाठी पळाला. मात्र, तो सुरक्षित पोहोचू शकला नाही आणि केविन पीटरसनच्या थेटफेकीवर धावबाद झाला.

सट्टेबाजी प्रकरण आणि दोन वर्षांची बंदी

सॅम्युअल्ससाठी २००८ हे वर्ष अतिशय खराब राहिले. अवैध गोलंदाजी शैलीमुळे त्याच्यावर गोलंदाजीसाठी बंदी घालण्यात आली. २००७ च्या भारत दौऱ्यावर सट्टेबाज मुकेश कोचर याच्यासमवेत त्याने सामनानिश्चितीसाठी फोनवरून संभाषण केल्याचा आरोप लावण्यात आला. सट्टेबाजाकडून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याची बंदी घालण्यात आली. पुढे, पुराव्यांच्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, भारतातील पोलिस आपल्याला अटक करतील; या भीतीने तो भारतात येत नव्हता. सॅम्युअल्सवरील बंदी मे २०१० मध्ये उठवण्यात आली. २०११ विश्वचषकात ड्वेन ब्रावो दुखापतग्रस्त झाल्याने, त्याला बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले. मात्र, त्याने भारतात येण्यास नकार दिला. पुढे, वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारताविरुद्धच्या त्याने आपले पुनरागमन केले.

दोन टी२० विश्वचषक विजयाचा नायक

मार्लेन सॅम्युअल्ससाठी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली ती २०१२ टी२० विश्वचषकातील. संपूर्ण स्पर्धेत तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. प्रत्येक सामन्यात तो उपयुक्त खेळी करत; संघासाठी योगदान द्यायचा. वेस्ट इंडीजने सांघिक कामगिरीच्या बळावर अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्याचा नायक होता मार्लेन सॅम्युअल्स. इतर फलंदाज नियमित अंतराने बाद होत होते आणि सॅम्युअल्स एकटा खिंड लढवत होता. सॅम्युअल्सने ५६ चेंडूमध्ये ७८ धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्या वेळी टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज मानल्या जाणाऱ्या लसिथ मलिंगाला पाच षटकार मारत त्याने वेस्ट इंडिजला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली होती. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही त्याने दोन बळी आपल्या नावे केले. वेस्ट इंडीजने यजमान श्रीलंकेला नमवत आपला पहिला टी२० विश्वचषक जिंकला. याचवर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पाच डावात ३८६ धावा काढल्या. सॅम्युअल्सला आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी २०१३ या वर्षीचा ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित २०१५ विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध ख्रिस गेलसमवेत त्याने दुसऱ्या गड्यासाठी ३७२ धावांची भागीदारी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गड्यासाठीची ही सर्वोत्तम भागीदारी आहे. सॅम्युअल्स ज्याप्रकारे २०१२ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा नायक ठरला होता; त्याचप्रकारची कामगिरी त्याने २०१६ टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत देखील केली. ६६ चेंडूत ८५ धावा करत; त्याने वेस्टइंडीज ला विजयाच्या नजीक आणले होते. अखेरच्या षटकात कार्लोस ब्राथवेटने बेन स्टोक्सला सलग चार षटकार ठोकत वेस्ट इंडिजला दुसरा टी२० विश्वचषक जिंकून दिला. विजयानंतर, पत्रकार परिषदेत टेबलवर पाय ठेवून त्याने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती.

कारकिर्दीची अखेर

सॅम्युअल्सवर २०१५ मध्ये कारकिर्दीत दुसऱ्यांदा अवैध गोलंदाजी शैलीसाठी कारवाई करण्यात आली. यावेळी त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घातली गेली. २०१७ च्या सुरुवातीला, त्याच्यावरील बंदी उठली. बंदीनंतर त्याला भारताविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान मिळेल अशी आशा होती. मात्र, त्याची संघात निवड झाली नाही. तो कोलपॅक करारांतर्गत इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा विचार करत होता. त्यावेळी, वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्याला रोखत; त्याचा समावेश एकदिवसीय संघात केला. या पुनरागमनानंतर त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. तो सातत्याने अपयशी ठरत होता. २०१८ च्या बांगलादेश दौऱ्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. २०१९ क्रिकेट विश्वचषकात देखील त्याची वेस्ट इंडीज संघात निवड झाली नव्हती.

सॅम्युअल्सची आंतरराष्ट्रीय आकडेवारी

सॅम्युअल्सने आपल्या २० वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वेस्ट इंडीजसाठी ७१ कसोटी व २०४ एकदिवसीय सामने खेळले. यात अनुक्रमे ३,९१७ आणि ५,५३६ धावा त्याने जमवल्या. सॅम्युअल्सच्या नावे १७ आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. सॅम्युअल्स आपल्या कामगिरीद्वारे टी२० क्रिकेटमधील एक मोठे नाव बनला. सॅम्युअल्सने ६७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. ज्यात १,६११ धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. सॅम्युअल्सने जगभरातील व्यवसायिक टी२० लीगमध्ये देखील अनेक संघांसाठी आपले कौशल्य दाखवले. आयपीएलमधील पुणे वॉरियर्स इंडिया आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांसाठी तो प्रत्येकी एक हंगाम खेळला. बिग बॅश, सीपीएल, बीपीएल आणि पीएसएल या विविध स्पर्धांमध्ये तो खेळलेला आहे.

वादांनी भरलेली कारकीर्द

सॅम्युअल्स आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कायम वादात राहिला. २००७ मधील मॅचफिक्सिंग प्रकरणामुळे त्याला दोन वर्षाच्या बंदीचा सामना त्याला करावा लागला होता. २०१२ बिग बॅश लीगमध्ये शेन वॉर्न आणि डेविड हसी यांच्यासमवेत भर मैदानात त्याची भांडण झालेली. वॉर्नने त्याची जर्सी ओढली; तर, सॅम्युअल्सने त्याच्या अंगावर बॅट फेकलेली. ती घटना क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक मानली जाते. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्ससोबत तर त्याचा ३६ चा आकडा आहे. २०१४ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेत त्यांचा पहिल्यांदा वाद झाला. २०१६ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, त्याने स्टोक्सवर “तू कधीच काही शिकू शकणार नाही” अशी टिप्पणी केली होती. अगदी काही दिवसांपूर्वीच, स्टोक्स आणि सॅम्युअल्स वादाचा तिसरा अध्याय झाला. ज्यात सॅम्युअल्सने स्टोक्सच्या पत्नीबद्दल अर्वाच्च टिप्पण्या केल्या होत्या.

दानशूर सॅम्युअल्स

एक वादग्रस्त क्रिकेटपटू राहिलेला सॅम्युअल्स आपल्या, दानशूरपणासाठी देखील प्रसिद्ध आहे. आपल्या मार्लेन सॅम्युअल्स फाउंडेशनच्या माध्यमातून तो जमैकातील अंध मुलांसाठी कार्य करत असतो. स्तनाच्या कर्करोगाबद्दल तो जनजागृती करताना तो दिसून येतो. ‘आयकॉन ७’ नावाचा म्युझिक अल्बम देखील त्याने प्रदर्शित केला आहे.

सॅम्युअल्सने आपल्या अनोख्या फलंदाजी शैलीने जगभरातील मैदाने गाजवली आहेत. त्याची कारकीर्द वादांनी भरलेली राहिली. तो अनेकदा उद्धटपणे वागला. मात्र, वेस्ट इंडीज क्रिकेटमधील त्याचे योगदान न विसरण्यासारखे आहे.

वाचा-

-रात्री वडिलांचा अंत्यविधी करुन सकाळी ९० धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटरची गोष्ट

-वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---