ऍलन डोनाल्ड.. तुम्ही ९० च्या दशकापासून क्रिकेट पाहत असाल, तर हे नाव तुमच्यासाठी अजिबात नवीन नाही. कदाचित तुम्ही या नावाचे आणि या खेळाडूचे चाहते नक्कीच राहिले असणार. आपल्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने विक्रमांची रास लावणाऱ्या डोनाल्ड यांच्यासमोर जगातील सर्वोत्तम फलंदाज देखील कधीकधी क्लब क्रिकेटमधील नवख्या फलंदाजांप्रमाणे भासत.
२१ व्या शतकातील ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज ब्रेट ली म्हणतो की, “डोनाल्ड यांना पाहूनच मी क्रिकेट आणि वेगवान गोलंदाजी करण्याचे ठरवले. डोनाल्ड यांच्या गोलंदाजीनेच, माझ्यात काहीतरी करून दाखवण्याची उर्मी तयार झाली. मला कायम वाटत त्यांच्यासारखी गोलंदाजी करावी. तेच माझे आदर्श आहेत.”
ही होती ऍलन डोनाल्ड या नावाची आणि त्यांच्या खेळाची जादू.
जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ऍलन डोनाल्ड यांच्या विषयी जाणून घेऊया.
रग्बीपटू ते क्रिकेटपटू
द. आफ्रिकेतील ब्लोएमफोंटन या सुंदर शहरात डोनाल्ड यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अंगापिंडाने मजबूत असलेल्या डोनाल्ड यांना अभ्यासापेक्षा मैदानावर खेळायला खूप आवडे. ब्लोएमफोंटनच्या ग्रे कॉलेजमध्ये शिकत असताना, त्यांची ओळख हॅन्सी क्रोनिए यांच्याशी झाली आणि ते चांगले मित्र बनले. डोनाल्ड शाळेच्या दिवसात रग्बी अत्यंत कुशलतेने खेळत. याच दरम्यान त्यांनी फुटबॉल व क्रिकेट खेळायला सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते सैन्यात भरती होण्याचे उद्देशाने सराव आणि कसरत करत. त्यांनी सैन्याचे ट्रेनिंग देखील घेतले. त्यांना क्रिकेटविषयी आवड निर्माण झाल्याने ते त्यावरच जास्त लक्ष केंद्रित करू लागले. एका स्थानिक सामन्यात खेळताना त्यांनी, आपलेच काका प्रशिक्षक असलेल्या संघाविरुद्ध, १६ धावा देत ९ गडी बाद केले. हा सामना पाहण्यासाठी, द. आफ्रिकेतील प्रथमश्रेणी संघ असलेल्या, ऑरेंज फ्री स्टेटचे पदाधिकारी आले होते. डोनाल्ड यांची गोलंदाजीचे पाहून, त्यांनी त्वरित डोनाल्ड यांना आपल्या संघात सामील करून घेतले.
दक्षिण आफ्रिका ते इंग्लंड, दुसऱ्या हंगामात संपवला वॉर्विकशायरचा विजेतेपदाचा दुष्काळ
दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेट गाजवत असतानाच, १९८७ साली इंग्लंडमधील वार्विकशायर काउंटी क्लबने डोनाल्ड यांना करारबद्ध केले. डोनाल्ड यांनी एकट्याच्या बळावर १९८९ मध्ये वार्विकशायरला, नऊ वर्षानंतर काउंटी विजेतेपद मिळवून दिले. वर्णभेदाच्या कारणामुळे लादलेले, दक्षिण आफ्रिका संघावरील निलंबन २२ वर्षानंतर म्हणजे सन १९९१ मध्ये रद्द करण्यात आले. निलंबनानंतरच्या, पहिल्याच भारताविरुद्धच्या मालिकेसाठी जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाची निवड करण्यात आली, तेव्हा डोनाल्ड यांचा राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पदार्पणातच केले भारतीय फलंदाजांना ढेर
ऍलन डोनाल्ड यांनी १० नोव्हेंबर १९९१ ला भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. कोलकत्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात, डोनाल्ड यांनी आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्याच सामन्यात पाच बळी मिळवत त्यांनी सामनावीराचा किताब आपल्या नावे केला. सन १९९२ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्याच वर्षाच्या अखेरीस, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात डोनाल्ड यांच्या गोलंदाजीसमोर, भारतीय फलंदाजांना पळता भुई थोडी झाली. दर्जेदार वेगवान गोलंदाजीचे प्रदर्शन करत त्यांनी दोन्ही डावात मिळून, १२ बळी आपल्या नावे केले. तो अखेरचा सामना जिंकत, दक्षिण आफ्रिकेने मालिका १-० अशा फरकाने खिशात घातली. तीन सामन्यांच्या या मालिकेत २० विकेट्स मिळवून त्यांनी, मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्या दोन वर्षातच त्यांच्या नावाची चर्चा सर्व क्रिकेटविश्वात होऊ लागली. सर्व समीक्षक आणि माजी खेळाडू त्यांचे सर्वोत्तम गोलंदाज म्हणून कौतुक करत होते. क्रिकेटचे बायबल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘विस्डेन’ ने त्यांचा सन १९९२ या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला.
हॅन्सी क्रोनिएचा विवादित निर्णय आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव
अल्पावधीतच, ऍलन डोनाल्ड हे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू बनले होते. त्यांच्या उपस्थितीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे भल्याभल्या संघांना जड जाई. भारतीय उपखंडात झालेल्या १९९६ क्रिकेट विश्वचषकासाठी त्यांची दक्षिण आफ्रिका संघात निवड झाली. स्पर्धेत ते अवघे चार सामने खेळले. मात्र, या सर्व सामन्यात विरोधी संघांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवत, त्यांनी दक्षिण आफ्रिकेला उपांत्यपूर्व फेरीत नेण्यात आपले योगदान दिले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांनी डोनाल्ड यांना बाकावर बसवले. डोनाल्ड नसल्याचा फायदा उचलत, ब्रायन लाराने शतक झळकावत, वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेला या उपांत्यपूर्व सामन्यात १९ धावांनी पराभव पत्करावा लागला. क्रोनिए यांच्या डोनाल्ड यांना महत्त्वाच्या सामन्यात बाहेर बसविण्याच्या निर्णयावर खूप वाद झाला.
तीन वर्षात जमविला क्रिकेटविश्वात धाक
सन १९९७ ते १९९९ या काळात डोनाल्ड आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये राहिले. या तीन वर्षाच्या कालावधीत ३१ कसोटी सामन्यात त्यांनी तब्बल १५१ बळी आपल्या नावे केले. कसोटी क्रिकेट प्रमाणेच वनडेत देखील त्यांचा फॉर्म कायम राहिला. डोनाल्ड यांनी यादरम्यान ४९ एकदिवसीय सामने खेळताना ८६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सन १९९८ मध्ये ते आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले.
डोनाल्ड धावले नाही आणि दक्षिण आफ्रिका राहिली विश्वचषकापासून वंचित
इंग्लंडमध्ये झालेला १९९९ चा क्रिकेट विश्वचषक डोनाल्ड यांनी आपल्या वेगाने व अचूक गोलंदाजीने गाजवला. यजमान इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ८ षटके टाकून १६ धावा देत त्यांनी इंग्लंडचे चार खंदे फलंदाज बाद केले. संपूर्ण स्पर्धेत १६ बळी त्यांच्या नावे होते. दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत नेण्यात यांचे योगदान होते. संपूर्ण स्पर्धेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम कामगिरी बजावत होता. स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला अटीतटीच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. या पराभवासाठी डोनाल्ड यांना जबाबदार धरण्यात आले. त्याचे झाले असे की, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१४ धावांचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने ९ बाद २०५ धावा बनवल्या होत्या. अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ९ धावांची गरज होती. संपूर्ण स्पर्धा गाजवलेला लान्स क्लुसनर स्ट्राइकवर खेळत होता तर डोनाल्ड नॉन स्ट्राइकला होते. शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या, डेमियन फ्लेमिंगला पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारत, क्लुसनरने धावसंख्या बरोबरीत आणली. चौथ्या चेंडूवर, क्लुसनरने एक फटका खेळला आणि तो धाव घेण्यासाठी धावला. त्यावेळी, नॉन स्ट्राईकला असलेले डोनाल्ड चेंडू पाहत राहिले. जेव्हा त्यांना पाहिले की, क्लुसनर धावत आहे तेव्हा, त्यांनी सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ते धावबाद झाले. सामना टाय झाला. मात्र, सुपर सिक्स फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवले असल्याने, ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. त्या क्षणी डोनाल्ड, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटचाहत्यांसाठी खलनायक ठरले.
दुखापतीमुळे सोडावे लागले क्रिकेट
विश्वचषकानंतरही डोनाल्ड दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधित्व करत राहिले. यादरम्यान त्यांना काही दुखापती झाल्या. दुखापतीमुळे त्यांचा वेग कमी झाला. त्यांच्या गोलंदाजीतील धार काहीशी बोथट झाली. वेगात कमतरता आली असली तरी, डोनाल्ड मोक्याच्या क्षणी संघाला बळी मिळवून देत. अखेरीस वाढते वय, खराब फॉर्म व दुखापतीमुळे मायदेशात झालेल्या २००३ विश्वचषकानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.
डोनाल्ड यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी ७२ कसोटी खेळताना २२.२५ च्या सरासरीने ३३० बळी मिळवले. यात एका डावात ७१ धावा देऊन ८ बळी घेण्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील त्यांनी १६४ सामन्यात दक्षिण आफ्रिकेची प्रतिनिधीत्व करताना २७२ गडी बाद केले.
आजही ‘त्या’ गोष्टीसाठी ते राहुल द्रविडला माफी मागतात
डोनाल्ड यांच्याशी तितकेसे वाद जोडले गेले नाहीत. मात्र, सन १९९७ मध्ये राहुल द्रविडला अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. द्रविडने डोनाल्ड यांना षटकार मारल्याने, डोनाल्ड काहीसे विचलित झाले. त्यांनी द्रविडला काही अपशब्द वापरले. सामन्याच्या शेवटी जेव्हा, डोनाल्ड द्रविडशी हात मिळण्यासाठी गेले तेव्हा द्रविडने हात मिळवण्यास नकार दिला. त्यावेळी, डोनाल्ड यांना समजले की, आपण खरंच चुकीचं वागलो होतो. याबद्दल डोनाल्ड आजही माफी मागत असलेले दिसतात. ते या घटनेला आपल्या कारकिर्दीतील सर्वात लांच्छनास्पद घटना म्हणून संबोधतात.
‘हॉल ऑफ फेम’ ऍलन डोनाल्ड
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर, डोनाल्ड जगभरात एक नावाजलेले प्रशिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. न्युझीलंड, श्रीलंका, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या संघांसाठी त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. सन २०१९ मध्ये आयसीसीने डोनाल्ड यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करत, यथोचित सन्मान केला.
आपल्या धडकी भरवणाऱ्या वेगवान चेंडूंनी संपूर्ण एक दशक गाजवत, प्रतिस्पर्ध्यांच्या मनात भीती व क्रिकेट चाहत्यांच्या मनात आदर कमावत, ‘व्हाईट लाईटनिंग’ या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ऍलन डोनाल्ड यांनी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
विकेटकीपरऐवजी ऑलराऊडंर! दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषक संघात करावे लागले ‘हे’ बदल