गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण, आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी, सनरायझर्स हैदराबादसाठी काही युवा खेळाडू शोधत होता. खेळाडूंची चौकशी करत असताना, तो जम्मू-काश्मीरचे प्रशिक्षक मिलाप मेवाडा यांना भेटला. मेवाडा आणि लक्ष्मण हे एकोणीस वर्षाखालील संघात एकत्र खेळत असत. जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेट सुधारण्यात मेवाडा यांचा मोलाचा वाटा आहे.
संभाषणादरम्यान, लक्ष्मणने मेवाडा यांना सांगितले की, आम्ही संघासाठी फिनिशरची भूमिका साकारणार्या काही खेळाडूंना शोधत आहेत. मेवाडा यांनी अजिबात वेळ न दवडता, लक्ष्मणला ‘अब्दुल समद’ हे नाव सांगितले. लक्ष्मणने हे नाव कधीच ऐकले नव्हते. तेव्हा मेवाडा यांनी सांगितले की, हा जम्मू-काश्मीरचा खेळाडू आहे. काही दिवसांनी लक्ष्मणने भारताचा माजी खेळाडू व जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचा मार्गदर्शक असलेल्या इरफान पठाणला अब्दुल समदविषयी विचारले असता, त्यानेदेखील सनरायझर्स हैदराबादने अब्दुल समदला एक संधी द्यावी असे सुचवले.
२०२० आयपीएल लिलावाच्या अगदी चार दिवसांपूर्वी, सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाने त्याला चाचणीसाठी बोलावले. चाचणीत त्यांने गगनचुंबी षटकार मारत, व्यवस्थापनाला प्रभावित केले. १९ डिसेंबर २०१९ ला झालेल्या लिलावात, २० लाख रुपयांच्या आधारभूत किमतीत हैदराबादने त्याला आपल्या संघात निवडले. कोणत्याही आयपीएल संघात निवडला जाणारा तो चौथा काश्मीरी खेळाडू होता.
कायम दहशतवादाच्या छायेत असलेल्या, जम्मू-काश्मीरमधील राजौरी या ठिकाणच्या या प्रतिभासंपन्न युवकाने, मागील देशांतर्गत हंगाम गाजवला. संपूर्ण हंगामात तीन शतके ठोकत त्याने ५९२ धावा जमविल्या. यावेळी त्याने ३६ षटकार लगावले होते. जम्मू-काश्मीरला रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेण्यात समदने मोठा हातभार लावला.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लागण्यापूर्वी, इरफान पठाण याच्या मार्गदर्शनाखाली, जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचे छोटेखानी शिबिर वडोदरा येथे लावले गेले होते. मात्र, अचानक लॉकडाऊन लागल्याने संपूर्ण संघाला जम्मू-काश्मीरमध्ये परतावे लागले होते. त्यावेळी बोलताना समद म्हटला,
“अचानक लॉकडाऊन लागल्याने, आम्हाला सरावाची संधी मिळाली नाही. घरी आल्यावर मी, हलकासा व्यायाम तसेच टेरेसवर थोडाफार फलंदाजीचा सराव करत. प्रशिक्षक उपलब्ध नसल्याने, मी माझ्या सरावाचे व्हिडिओ इरफान भाईंना पाठवायचो, ते माझ्या चुका मला सांगत. या गोष्टीचा मला खरच खूप फायदा झाला.”
आयपीएल यूएईला हलविल्यानंतर, तो हैदराबाद संघासोबत यूएईत दाखल झाला. सनरायझर्स हैदराबादला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात, पराभवाचा धक्का बसल्यानंतर, मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात समदला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले. हैदराबादचा सहाय्यक प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिन याच्या हस्ते त्याला टोपी प्रदान करण्यात आली. याच बरोबर तो परवेज रसूल, रसिक सलाम दार यांच्यानंतर आयपीएलचा सामना खेळणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला. जम्मू-काश्मीरचा मंझूर दार हा २०१८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
अंतिम अकरामध्ये निवड झाल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,
“मी अजूनही स्वप्नातच आहे असे मला वाटतेय. डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, भुवनेश्वर कुमार, केन विल्यमसन, राशिद खान या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून मी आज मैदानात उतरत आहे. मुरलीधरन, लक्ष्मण, हॅडिन हे आमचे प्रशिक्षक आहेत. एखाद्या युवा खेळाडूला यापेक्षा अधिक काय हवे ?”
आपल्या पहिल्याच सामन्यात समदने, सात चेंडूत १२ धावा केल्या. यात प्रत्येकी एका चौकार व षटकाराचा समावेश होता. क्षेत्ररक्षण करताना, त्याने श्रेयस अय्यरचा अप्रतिम झेल टिपला.
देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर आता तो आयपीएलमध्ये धमाका करण्यास सज्ज आहे. मिचेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाल्याने तसेच मोहम्मद नबीला संघात स्थान न मिळाल्यास, समदला अधिकाधिक संधी मिळू शकते. आपल्या अष्टपैलू खेळाने तो यूएईची मैदाने गाजवेल यात शंका नाही.
वाचा-
-तेराव्या वर्षी पायाची तीन बोटे गेली तरी, तो न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बनला
-मुरलीधरनला ‘फेकी गोलंदाज’ ठरवणारे डॅरेल हेयर