भारतीय क्रिकेटला फिरकीपटूंचे माहेरघर असे संबोधले जाते. जेव्हापासून भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून एकापेक्षा एक दर्जेदार फिरकी गोलंदाज भारताने जागतिक क्रिकेटला दिले. सुभाष गुप्ते हे भारतीय फिरकी गोलंदाजांतील पहिले प्रसिद्ध नाव. बेदी, प्रसन्ना चंद्रशेखर या तिकडीने तर विश्वक्रिकेटवर राज्य केले. अनिल कुंबळे-हरभजन सिंह ही जोडी सुद्धा विश्वविक्रमी कामगिरी करण्यात यशस्वी ठरली. आताही जडेजा, कुलदीप यादव व चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीने भल्याभल्यांच्या नाकात दम करत आहेत. यादरम्यान, 2011 ते 2017 या काळात एक खेळाडू भारतीय फिरकीचा झेंडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फडकवत होता, आजही तो भारतीय संघाचा सदस्य आहे, पण त्याला इतर खेळाडूंशी स्पर्धा करावी लागत आहे. अगदी अल्पावधीतच, विक्रमांचे नवेनवे शिखर सर करणाऱ्या या फिरकीपटूचे नाव आहे रविचंद्रन अश्विन. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) अश्विन आपला 37वा वाढदिवस साजरा करतोय.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईत झाला. अश्विनचे वडील एन रविचंद्रन हे स्थानिक क्रिकेटमध्ये प्रसिद्ध वेगवान गोलंदाज होते. छोट्या अश्विनने वडिलांप्रमाणेच वेगवान गोलंदाज होण्याचे ठरवले. शरीरयष्टी चांगली असल्याने तो वेगवान गोलंदाज झालाही असता मात्र, चेन्नईतील प्रसिद्ध पद्मशेषाद्री बालभवन शाळा सोडून तो, सेंट बेडे अँग्लो इंडियन माध्यमिक शाळेत दाखल झाला आणि त्याच्या भविष्याला कलाटणी मिळाली. त्या शाळेत, क्रिकेट शिकवणारे प्रशिक्षक सीके विजय व चंद्रा यांनी अश्विनला वेगवान गोलंदाजी सोडून फिरकीपटू होण्याचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला अश्विनने मानला, वेगवान गोलंदाजी सोडून तो ऑफस्पिनर झाला आणि पुढे इतिहास घडला.
उत्तम क्रिकेट खेळत असतानाच, तो शिक्षणातही अव्वल होता. चेन्नईतील एसएसएन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून त्याने बी.टेक पदवी घेतली. इंजिनीयर झाला तरी त्याचे क्रिकेटवरील प्रेम तसूभरही कमी नव्हते झाले. आपल्या फिरकीच्या तालावर, अनेकांना नाचवणारा अश्विन, भारताच्या सतरा वर्षाखालील संघाचा नियमित सलामीवीर होता. खराब फॉर्ममुळे त्याला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवून रोहित शर्माला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली होती. या घटनेनंतर अश्विनने पूर्णवेळ फिरकी गोलंदाजी करण्याचे ठरवले.
सन 2006 मध्ये पहिल्यांदा अश्विनचा तमिळनाडूच्या वरिष्ठ संघात समावेश करण्यात आला. 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात त्याची निवड केली गेली. 2010 व 2011 अशी सलग दोन वर्ष आयपीएल जिंकणाऱ्या सीएसकेचा तो अव्वल फिरकीपटू होता. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर, 2010 श्रीलंका दौऱ्यावर त्याने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
अश्विनच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण तेव्हा आला जेव्हा, भारताने 2011 मध्ये 28 वर्षानंतर विश्वचषक आपल्या नावे केला. हरभजन सिंग, पियुष चावला यांच्यासमवेत अश्विन विश्वविजयी संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये, अश्विनने भारतासाठी कसोटी पदार्पण केले आणि जागतिक क्रिकेटमधील, ‘अश्विन’ अध्यायाला सुरुवात झाली.
तसे पाहायला गेले तर, अश्विनच्या तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील पदार्पणावेळी इतर खेळाडूंनी देखील भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. एकदिवसीय पदार्पणावेळी पंकज सिंह व प्रज्ञान ओझा, टी20 पदार्पणावेळी विराट कोहली आणि नमन ओझा तर कसोटी पदार्पणात उमेश यादवने त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
अश्विनने जडेजाच्या साथीने, भारतीय खेळपट्ट्यांवर असा काही धुमाकूळ घातला की, तो सर्वात जलद 350 कसोटी बळी मिळवणारा गोलंदाज ठरला. अश्विनने आत्तापर्यंत 94 कसोटीत 489 बळी आपल्या नावे केले आहेत. गोलंदाजी सोबतच, अश्विन आपल्या उपयुक्त फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्याच्या नावे, 5 आंतरराष्ट्रीय शतके देखील आहेत. तो गोलंदाजीतील अव्वल स्थानासोबतच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत देखील पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला होता. कसोटी क्रिकेटमधील आश्चर्यकारक कामगिरी सोबतच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 151, तर टी20 मध्ये जसप्रीत बुमराह (74) व युझवेंद्र चहल (96) पाठोपाठ सर्वाधिक 72 बळी आहेत.
मधल्या काळात अश्विनने 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा सदस्य, 2014 मध्ये अर्जुन पुरस्कार विजेता, 2013 सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू, 2016 आयसीसी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असे बहुमान आपल्या नावे केले.
अश्विनने 2017 मध्ये आपल्या वडिलांच्या सोबत, “जेन-नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूट” नावाने क्रिकेट अकादमी सुरू केली. या अकादमीची चेन्नईमध्ये सहा केंद्रे आहेत. अश्विनची अकादमी चेन्नईत वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवत असते.
भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधार भूषवलेल्या अश्विनची 2018 आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघाच्या कर्णधारपदी निवड केली. दोन वर्ष कर्णधार राहूनही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. 2019 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला ‘मंकडींग’ करत त्याने अनेक क्रिकेट समीक्षकांची आणि प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली होती.
सध्या अश्विन, कसोटी क्रिकेटमध्ये आजही पहिल्या पसंतीचा फिरकीपटू आहे. (The Story of Indian Cricketer R Ashwin)
हेही वाचा-
‘या’ दोन्हींपैकी एक संघ जिंकणार वनडे विश्वचषक! माजी श्रीलंकन कर्णधाराची भविष्यवाणी
श्रीलंकन युवा दुकली ठरतेय आशिया कपमध्ये यशस्वी! पाहा टॉप फाईव्ह गोलंदाजांची यादी