गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलने भारताला अनेक युवा व गुणवान क्रिकेटपटू दिले आहेत. आयपीएलमधील मिळालेल्या संधीचे सोने करत, अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपली जागा बनवली. आधी, युसुफ पठाण, रवींद्र जडेजा तर नजीकच्या काळात जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांच्यासारख्या खेळाडूंनी आपले नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलावर कोरले. दुसरीकडे, असे बरेच खेळाडू आहेत जे, आयपीएलमध्ये पुरेशी संधी मिळून देखील संधीचे सोने करता न आल्याने विस्मृतीत गेले. त्यापैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी. बहुतांश, क्रिकेटप्रेमींच्या लक्षातून गेलेला सुदीप आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करतोय.
मेरठसारख्या शहरातून पुढे आलेल्या सुदीपकडे त्यावेळी भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात होते. वेगवान गोलंदाजाला अनुरूप अशी उंची व सातत्याने १४० किमी/प्रतितास इतक्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवत होती. सुदीपमधील प्रतिभा सर्वप्रथम ओळखण्याचे काम भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने केले. २००७-२००८ रणजी हंगामात उत्तर प्रदेशकडून ओडिसा विरुद्ध पदार्पण करताना त्याने सहा बळी मिळवले. पूर्ण हंगामात ४१ बळी मिळवून, तो सर्वांच्या नजरेत आला.
सुदीपला खरी ओळख मिळाली ती २००९ आयपीएलमध्ये. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले. द. आफ्रिकेत झालेल्या त्या हंगामात सुदीपने ८ सामन्यात ७.२० च्या कंजूस सरासरीने धावा देत पाच बळी मिळवले. भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ६ सामन्यात १४ बळी मिळवत त्याने राष्ट्रीय संघाचे दार ठोठावले.
सुदीप, देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्या उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करत त्या उत्तर प्रदेशचे, प्रवीण कुमार व आरपी सिंह त्यावेळी भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज होते. उत्तर प्रदेश क्रिकेट वर्तुळात मेरठचाच दुसरा युवा गोलंदाज भुवनेश्वर कुमार धुमाकूळ घालत होता. तेव्हा क्रिकेट समीक्षकांचे असे मत होते की, सुदीप त्यागी या सर्वांच्यात सर्वाधिक प्रभावशाली आहे.
सुदीप त्यागीने डिसेंबर २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय मालिकेत देखील तो खेळला. मात्र, क्रिकेटचाहत्यांच्या आणि निवडकर्त्यांच्या मनात घर करेल अशी, कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. पुढे, लवकरच तो राष्ट्रीय संघातून वगळला गेला आणि पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकला नाही. सुदीप टीम इंडियाकडून एकूण ४ एकदिवसीय सामने आणि १ टी२० सामना खेळू शकला. आयपीएलमध्ये सुद्धा पहिल्या यशस्वी हंगामानंतरही तो केवळ १४ सामने खेळू शकला.
भारतीय संघात पुन्हा संधी मिळावी म्हणून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या जोमाने दाखल झाला. उत्तर प्रदेश संघात जागा न मिळाल्याने, २०१४-१५ रणजी हंगामासाठी सौराष्ट्रासाठी खेळण्याचा निर्णय त्याने घेतला. सौराष्ट्राला वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असल्याने तो दोन वर्ष सौराष्ट्रासाठी खेळला. पण, २०१७ पासून तो कोणत्याही पातळीवर क्रिकेट खेळताना दिसला नाही. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ४१ सामने खेळत १०९ बळींची नोंद त्याच्या नावे झाली.
डेल स्टेनला आदर्श मानणाऱ्या सुदीपला स्टेनसारखा कमबॅक कधीच करता आला नाही. भारतीय संघासाठी, बोटावर मोजण्याइतके सामने खेळून तो कायमचा विस्मृतीत गेला.
वाचा-
-मुख्याध्यापकांशी भांडून वडिलांनी त्याला खेळायला पाठवले आणि…
-जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट