भारतीय क्रिकेटला फिरकीपटूंचे माहेरघर असे संबोधले जाते. जेव्हापासून भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून एकापेक्षा एक दर्जेदार फिरकी गोलंदाज भारताने जागतिक क्रिकेटला दिले. सुभाष गुप्ते हे भारतीय फिरकी गोलंदाजांतील पहिले प्रसिद्ध नाव. बेदी, प्रसन्ना चंद्रशेखर या तिकडीने तर विश्वक्रिकेटवर राज्य केले. अनिल कुंबळे-हरभजन सिंह ही जोडी सुद्धा विश्वविक्रमी कामगिरी करण्यात यशस्वी ठरली. आताही जडेजा, कुलदीप यादव व चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीने भल्याभल्यांच्या नाकात दम करत आहेत. यादरम्यान, २०११ ते २०१७ या काळात एक खेळाडू भारतीय फिरकीचा झेंडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फडकवत होता, आजही तो भारतीय संघाचा सदस्य आहे, मात्र त्याला इतर खेळाडूंशी स्पर्धा करावी लागत आहे. अगदी अल्पावधीतच, विक्रमांचे नवेनवे शिखर सर करणाऱ्या या फिरकीपटूचे नाव आहे रविचंद्रन अश्विन. आज अश्विन आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतोय.
१७ सप्टेंबर १९८६ रोजी अश्विनचा चेन्नईत जन्म झाला. अश्विनचे वडील एन रविचंद्रन हे स्थानिक क्रिकेटमध्ये प्रसिद्ध वेगवान गोलंदाज होते. छोट्या अश्विनने वडिलांप्रमाणेच वेगवान गोलंदाज होण्याचे ठरवले. शरीरयष्टी चांगली असल्याने तो वेगवान गोलंदाज झालाही असता मात्र, चेन्नईतील प्रसिद्ध पद्मशेषाद्री बालभवन शाळा सोडून तो, सेंट बेडे अॅग्लो इंडियन माध्यमिक शाळेत दाखल झाला आणि त्याच्या भविष्याला कलाटणी मिळाली. त्या शाळेत, क्रिकेट शिकवणारे प्रशिक्षक सीके विजय व चंद्रा यांनी अश्विनला वेगवान गोलंदाजी सोडून फिरकीपटू होण्याचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला अश्र्विनने मानला, वेगवान गोलंदाजी सोडून तो ऑफस्पिनर झाला आणि पुढे इतिहास घडला.
उत्तम क्रिकेट खेळत असतानाच, तो शिक्षणातही अव्वल होता. चेन्नईतील एसएसएन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून त्याने बी.टेक पदवी घेतली. इंजिनीयर झाला तरी त्याचे क्रिकेटवरील प्रेम तसूभरही कमी नव्हते झाले. आपल्या फिरकीच्या तालावर, अनेकांना नाचवणारा अश्विन, भारताच्या सतरा वर्षाखालील संघाचा नियमित सलामीवीर होता. खराब फॉर्ममुळे त्याला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवून रोहित शर्माला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली होती. या घटनेनंतर अश्विनने पूर्णवेळ फिरकी गोलंदाजी करण्याचे ठरवले.
२००६ मध्ये पहिल्यांदा अश्विनचा तमिळनाडूच्या वरिष्ठ संघात समावेश करण्यात आला. २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात त्याची निवड केली गेली. २०१० व २०११ अशी सलग दोन वर्ष आयपीएल जिंकणाऱ्या सीएसकेचा तो अव्वल फिरकीपटू होता. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर, २०१० श्रीलंका दौऱ्यावर त्याने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
अश्विनच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण तेव्हा आला जेव्हा, भारताने २०११ मध्ये २८ वर्षानंतर विश्वचषक आपल्या नावे केला. हरभजन सिंग, पियुष चावला यांच्यासमवेत अश्विन विश्वविजयी संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये, अश्विनने भारतासाठी कसोटी पदार्पण केले आणि जागतिक क्रिकेटमधील, ‘अश्विन’ अध्यायाला सुरुवात झाली.
तसे पाहायला गेले तर, अश्विनच्या तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील पदार्पणावेळी इतर खेळाडूंनी देखील भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. एकदिवसीय पदार्पणावेळी पंकज सिंह व प्रज्ञान ओझा, टी२० पदार्पणावेळी विराट कोहली आणि नमन ओझा तर कसोटी पदार्पणात उमेश यादवने त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
अश्विनने जडेजाच्या साथीने, भारतीय खेळपट्ट्यांवर असा काही धुमाकूळ घातला की, तो सर्वात जलद ३५० कसोटी बळी मिळवणारा गोलंदाज ठरला. अश्विनने आत्तापर्यंत ७० कसोटीत ३६२ बळी आपल्या नावे केले आहेत. गोलंदाजी सोबतच, अश्विन आपल्या उपयुक्त फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्याच्या नावे, ४ आंतरराष्ट्रीय शतके देखील आहेत. तो गोलंदाजीतील अव्वल स्थानासोबतच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत देखील पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला होता. कसोटी क्रिकेटमधील आश्चर्यकारक कामगिरी सोबतच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १५० तर टी२० मध्ये बुमराह व चहल पाठोपाठ सर्वाधिक ५२ बळी आहेत.
मधल्या काळात अश्विनने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा सदस्य, २०१४ मध्ये अर्जुन पुरस्कार विजेता, २०१३ सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू, २०१६ आयसीसी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असे बहुमान आपल्या नावे केले.
अश्विनने २०१७ मध्ये आपल्या वडिलांच्या सोबत, “जेन-नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूट” नावाने क्रिकेट अकादमी सुरू केली. या अकादमीची चेन्नईमध्ये सहा केंद्रे आहेत. अश्विनची अकादमी चेन्नईत वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवत असते.
भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधार भूषवलेल्या अश्विनची २०१८ आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघाच्या कर्णधारपदी निवड केली. दोन वर्ष कर्णधार राहूनही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. २०१९ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला ‘मंकडींग’ करत त्याने अनेक क्रिकेट समीक्षकांची आणि प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली होती.
सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला अश्विन, कसोटी क्रिकेटमध्ये आजही पहिल्या पसंतीचा फिरकीपटू आहे. या वर्षी आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत, भारताच्या एकदिवसीय व टी२० संघात पुनरागमन करण्याचा मनोदय त्याने बोलून दाखवला आहे.
वाचा-
-भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी
-मुख्याध्यापकांशी भांडून वडिलांनी त्याला खेळायला पाठवले आणि…
-जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट