आशिया चषक २०१२ च्या समाप्तीनंतर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. टी२० क्रिकेटमध्ये २००७ सालीच निवृत्त झालेला सचिन आता फक्त कसोटी क्रिकेट खेळणार होता. २०१३ मध्ये भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर एकदिवसीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत; भारतीय क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अशातच १० ऑक्टोबर रोजी समस्त क्रिकेटप्रेमींना भावनिक करणारी एक बातमी आली. गेली २४ वर्ष भारतीय क्रिकेटची धुरा वाहणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. नोव्हेंबरमध्ये नियोजित वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो अखेरच्या वेळी खेळताना दिसणार होता. हे दोन सामने खेळल्यानंतर सचिनचे २०० कसोटी सामने पूर्ण होणार होते आणि २०० कसोटी खेळणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा विश्वविक्रम सचिनच्या नावे नोंदविला जाणार होता.
बीसीसीआयच्या ‘रोटेशन पॉलिसी’ नुसार मालिकेतील दुसरा म्हणजे सचिनचा २०० वा सामना कोलकत्याच्या ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र, सचिनच्या इच्छेनुसार २०० वा सामना सचिनचे घरचे मैदान असलेल्या, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचे ठरवले गेले. मालिकेसाठी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. तेव्हा त्यात बहुतांशी नवखे खेळाडू होते. सचिनच्या अखेरच्या मालिकेत त्याच्यासोबत गेली १३ वर्ष सलामीला येत असलेल्या वीरेंद्र सेहवागला संधी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिखर धवन आणि मुरली विजय हेच सलामीवीर म्हणून खेळणार होते. मधल्या फळीत सचिनसोबत प्रतिभावंत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व गेली चार वर्ष पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रोहित शर्माचा समावेश होता. फिरकीची जबाबदारी रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा आणि अनुभवी प्रज्ञान ओझाच्या खांद्यावर होती. वेगवान गोलंदाजीची बाजू पूर्णपणे तरुण खेळाडू सांभाळणार होते. ईशांत शर्मा, उमेश यादव व भुवनेश्वर कुमार यांच्या साथीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केलेल्या मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला होता.
सचिनचा अखेरचा सामना म्हणून भारतामध्ये प्रचंड भावनिक वातावरण तयार झालेले. प्रत्येकाच्या तोंडी फक्त सचिनचे नाव होते. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या १९९ व्या सामन्यासाठी संपूर्ण कोलकाता सज्ज होता. कोलकत्यातील भिंतींना, रस्त्याच्या कडेला रंगरंगोटी करण्यात आली होती. संपूर्ण कोलकता ‘सचिनमय’ झाला होता. जगातील सर्व प्रसारमाध्यमे कोलकता आणि मुंबईत गोळा झाले होते. सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू होता. याच वातावरणात पहिल्या कसोटीला सुरुवात होणार होती.
…आणि रोहितची प्रतीक्षा संपली
कोलकात्यात आल्हाददायी सकाळी ६ नोव्हेंबरला भारतीय कर्णधार एमएस धोनी व वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी नाणेफेकीसाठी मैदानात आले. सॅमीने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात वेस्ट इंडीजकडून वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने तर भारताकडून रोहित शर्मा व मोहम्मद शमीने कसोटी पदार्पण केले. पदार्पण करणाऱ्या दोन्ही खेळाडूंना सचिनच्या हस्ते ‘टेस्ट कॅप’ देण्यात आली.
शमीचा दमदार डेब्यू
वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेल व कायरन पॉवेल सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात करण्यासाठी आले. सचिनच्या अखेरच्या मालिकेत काहीतरी उलटफेर करायचा वेस्ट इंडीज संघाचा मानस होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी या सर्व रणनीतीवर पाणी फेरले. घरच्या मैदानावर पदार्पण करणाऱ्या शमीने वेस्ट इंडीजचे चार खंदे फलंदाज माघारी धाडत वेस्ट इंडिजचा डाव २३४ धावात गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज मार्लोन सॅम्युअल्स एकटाच अर्धशतकाची वेस ओलांडून गेला.
भारताची निराशाजनक सुरुवात
शिखर धवन आणि मुरली विजय यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. काही आकर्षक चौकार मारून दोघांनी पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या बिनबाद ३७ पर्यंत नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच भारताला पहिला धक्का बसला. संघाची धावसंख्या ४२ झाली असताना शिखर धवन शेन शिलिंगफोर्डच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. धवन बाद होऊन, सहा षटके होत नाहीत; तोपर्यंत मुरली विजय माघारी परतला. एरवी, भारतीय फलंदाज बाद झाल्यावर निराश होणारे भारतीय चाहते मुरली विजय बाद झाल्यानंतर खुश होते. कारण सर्वांचा लाडका सचिन अखेरच्या वेळी ईडन गार्डन्सवर उतरत होता. मैदानात एकसारखा “सचिन.. सचिन” नावाचा जयघोष सुरू होता.
पण सचिनने चाहत्यांना निराश केले
भारताची नवी भिंत चेतेश्वर पुजारा व सचिन एकेरी दुहेरी धावा काढत भारताचा डाव विणू पाहत होते. सचिनने दोन आकर्षक चौकार मारत, चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आणले. २८ व्या षटकात कॉट्रेलने पुजाराला बाद करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला. पुढच्या षटकात शेन शिलिंगफोर्ड पुन्हा गोलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूला त्याने जरा उंची दिली आणि चेंडू जाऊन सचिनच्या पॅडवर आदळला. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. पंच नायजेल लॉँग यांनी काही क्षण वाट पाहीली आणि बोट वर केले. संपूर्ण मैदानावर स्मशानशांतता पसरली. सचिनने पंचांच्या निर्णयावर अजिबात नाराजी व्यक्त न करता पॅव्हेलियनची वाट धरली. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला अभिवादन केले.
सचिन परतत होता आणि रोहित येत होता
ज्यावेळी, सचिन मैदानातून बाहेर जात होता त्याचवेळी ड्रेसिंग रूममधून दुसरा मुंबईकर रोहित शर्मा मैदानात येत होता. जवळपास सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रोहित कसोटीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होता. २००७ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, ‘टेस्ट कॅप’ मिळवण्याची त्याची इच्छा होती. रोहितला याआधीही कसोटी संघात जागा मिळाली होती. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना, जखमी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या जागी रोहित नागपूर कसोटीतून पदार्पण करणार हे नक्की होते. मात्र, दुर्देवाने सामन्याच्या दिवशीच त्याला दुखापत झाली आणि वृद्धिमान साहाला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षांनी तो आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत होता.
रोहित आणि दुसरा युवा फलंदाज विराट कोहली भारताचा डाव पुढे नेणार याची सर्वांना शाश्वती होती. पण पुन्हा माशी शिंकली. शिलिंगफोर्डने विराटला चकवत आपला तिसरा बळी मिळवला. तब्बल बारा चेंडूंनंतर रोहितने आपली पहिली धाव काढली. लंचपर्यंत रोहित व कर्णधार धोनीने किल्ला लढवत धावसंख्या १२० पर्यंत नेली. भारताचे पाच गडी बाद झाल्याने सामना बरोबरीत आला होता. अजून एक किंवा दोन बळी मिळताच वेस्ट इंडिजचे पारडे जड होणार होते.
धोनी-रोहितची भागीदारी
लंचनंतर खेळ सुरू झाला आणि धोनी-रोहित जोडीने भारताची धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. रोहितने आपल्या पहिल्या ७ धावांसाठी २७ चेंडू घेतले होते. शेन शिलिंगफोर्ड व वीरस्वामी पेरमॉल या क्रिकेटपटूंना खेळण्यात त्याला अडचणी येत होत्या. संघाची धावसंख्या १५६ झाली असताना; कर्णधार धोनी टिनो बेस्टच्या गोलंदाजीवर एक बेजबाबदार फटका मारून बाद झाला. त्याने वेगवान ४२ धावा काढल्या.
‘रोहित-अश्विन शो’
रोहितच्या साथीला फिरकी गोलंदाज असलेला; मात्र, अष्टपैलू म्हणून खेळणारा रविचंद्रन अश्विन आला. दोघांनी कोणताही धोका न पत्करता वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा सामना करणे सुरू ठेवले. रोहितने टिनो बेस्टला पूल लगावत आपला पहिला षटकार मारला. पेरमॉलला कव्हर ड्राईव्ह मारत, त्याने ९५ चेंडूत आपले पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक पूर्ण केले. चहापानापर्यंत, भारताची धावसंख्या २२९ पर्यंत पोहोचली होती. रोहित ६१ तर अश्विन ३९ धावांवर नाबाद होता.
चहापानानंतर अखेरच्या सत्रात ३४ षटके टाकली जाणार होती. भारताने सामन्यात पुनरागमन केले होते. जशी दिवसातील अखेरच्या सत्राला सुरुवात झाली; रोहित आणि अश्विनने कसोटी क्रिकेटचे रूपांतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये केले. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांविरूद्ध दोघांनी आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली. रोहितने दोन्ही फिरकीपटूंवर वर्चस्व गाजवत धावसंख्या वेगाने वाढवली. “सचिन.. सचिन” असा येणारा आवाज “रोहित.. रोहित” असा बदलला होता. वेस्ट इंडीजने नवीन चेंडू घेतला. पण रोहित आणि अश्विनवर त्याचा काही फरक पडला नाही. त्यांनी शैली न बदलता चौकार मारणे सुरु ठेवले.
..आणि रोहितने आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले
अखेर, तो क्षण आला. सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कसोटीत खेळण्याची संधी मिळालेल्या रोहितने कॉट्रेलचा चेंडू स्लीपमधून ढकलत; आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. सचिनचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या तमाम चाहत्यांचे पैसे रोहितने वसूल केले होते. सचिनच्या निवृत्तीनंतर कसोटी संघातील ‘ती’ जागा काहीकाळ तरी रोहित आपल्या नावे करणार हे नक्की झाले होते. शतकानंतरही रोहित थांबला नाही व फाइन लेगला दोन चौकार त्याने मारले. दुसरा दिवस संपला तेव्हा धावफलकावर ३५४ धावा दिसत होत्या. रोहित १२७ तर अश्र्विन ९२ धावांवर नाबाद पॅव्हेलियनमध्ये गेले.
अश्विनची आश्वासक खेळी
तिसर्या दिवशी सकाळीच अश्विनने आपले पहिले शतक साजरे केले. रोहितला देखील आपले दीड शतक पूर्ण करण्यासाठी फार काळ वाट पहावी लागली नाही. रोहितचा वेग पाहून तो द्विशतक करतो की काय, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र, पेरमॉलने वैयक्तिक १७७ धावांवर त्याला पायचीत पकडले. रोहितने ३०१ चेंडूत २३ चौकार व एका षटकारासह १७७ धावांची अप्रतिम खेळी केली.
रोहित बाद झाल्यानंतर, अश्विनदेखील १२४ धावा काढून परतला. अश्विन बाद झाल्यानंतर ४५३ धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला. वेस्ट इंडीजकडून शेन शिलिंगफोर्डने सर्वाधिक सहा बळी मिळवले. भारत हा सामना जिंकणार; याची सर्वांना खात्री होती. फक्त, त्यासाठी किती वेळ लागणार याची सर्व जण वाट पाहत होते. भारतीय गोलंदाजांनी विशेषता ‘लोकल बॉय’ शमीने वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणण्याची जबाबदारी उचलली. शमीने पाच तर अश्विनने तीन बळी घेत; वेस्ट इंडिजचा डाव १६८ धावांवर संपुष्टात आणला. एक डाव आणि ५१ भावांनी सामना जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली.
मुंबईतील दुसरा सामनाही जिंकत भारतीय संघाने सचिनला विजयाची भेट दिली. या सामन्यात देखील रोहितने शतक झळकावले. सचिन निवृत्त झाला तो दिवस भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात भावनिक दिवसांपैकी एक मानला गेला. मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू मानला गेलेल्या रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीची अफलातून सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-






