चिन्नप्पापट्टी नावाचे तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यात एक लहान गाव आहे. चेन्नईपासून अंदाजे ३४० किलोमीटर दूर. याच गावातील एका २९ वर्षीय मुलाने २०२० आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत, आपला पहिला बळी म्हणून, सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीला बाद केले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रिषभ पंत, शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नावाजलेल्या फटकेबाजांविरूद्ध इच्छेनुसार यॉर्कर टाकून त्यांना धावा काढू दिल्या नाहीत. चिन्नप्पापट्टी येथे टेनिस बॉल क्रिकेट खेळून आज युएईमध्ये भल्याभल्या फलंदाजांना नामोहरम करणारा, हा गोलंदाज आहे टी. नटराजन.
चिन्नप्पापट्टी भारतातील, इतर खेडेगावांप्रमाणेच एक खेडेगाव. भारतातील इतर मुलांप्रमाणे या गावातील मुले देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. चांगल्या दर्जाच्या क्रिकेटसाठीच्या कोणत्याही सुविधा गावात उपलब्ध नाहीत. नटराजन देखील आवड म्हणून क्रिकेट खेळत. नटराजन यांचे वडील एका साडीच्या कारखान्यात कामाला होते तर आई मोलमजुरीचे काम करत. अभ्यासात बर्यापैकी असलेला नटराजन क्रिकेटमध्ये अत्यंत निपून होता. वेगवान गोलंदाजी करणे त्याला आवडत. त्याच्या यॉर्करला तोंड देणे सर्वांना अवघड जात. संपूर्ण तामिळनाडूमध्ये त्याचे टेनिस क्रिकेटमध्ये खूप नाव झाले होते. बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज, मुस्तफिजुर रहमान प्रमाणे, यॉर्कर टाकण्याच्या क्षमतेमुळे, त्याला अनेक जण “तमिळनाडूचा मुस्तफिजुर” असे म्हणत.
तमिळनाडू टेनिस बोल क्रिकेटचा दिग्गज असलेला नटराजन विसाव्या वर्षापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. २०१७ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगच्या डिंडीगुल ड्रॅगन्स संघात तो निवडला गेला. त्या स्पर्धेतील एका सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर, अभिनव मुकुंद व वॉशिंग्टन सुंदर या फलंदाजांविरुद्ध सहा यॉर्कर चेंडू टाकत त्याने लक्ष वेधून घेतले. त्या स्पर्धेत, सहा सामने खेळत त्याने, ९ बळी मिळवले. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट ५.४ इतका कमी होता.
टीएनपीएल मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर, त्याला २०१७ आयपीएलच्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने तीन करोड इतकी रक्कम मोजत आपल्या संघात सामील केले. पंजाब संघात निवड झाल्यावर, त्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,
“आयपीएलमध्ये निवड झाल्याचा आनंद आहेच तसेच इतकी मोठी रक्कम मिळाल्याचेही आश्चर्य वाटत आहे. या पैशातून सर्वप्रथम मी मोठे घर बांधणार आहे. कारण, माझ्या आईवडिलांनी आतापर्यंत खूप कष्ट केले आहेत. आता मला त्यांना सुखात ठेवायचे आहे.”
२०१७ आयपीएलमध्ये त्याला, सहा सामने खेळायला मिळाले. मात्र, तो ९ च्या महागड्या इकॉनोमी रेटने अवघे दोन बळी मिळवू शकला. आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे, लोक त्याचे नाव विसरू लागले. २०१८ च्या टीएनपीएल हंगामात त्याने लायका कोवई किंग्सचे प्रतिनिधित्व केले. गेल्या वर्षीपेक्षा, त्याने यावर्षी वरचढ कामगिरी केली. आठ सामन्यात १२ बळी घेताना त्याने, इकॉनोमी रेट ५.२ असा राखला.
२०१८ मध्ये जेव्हा, आयपीएलचा मोठा लिलाव करण्यात आला तेव्हा मुथय्या मुरलीधरनने त्याचा समावेश सनरायझर्स हैदराबाद संघात केला. २०१८ व २०१९ या दोन्ही हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत, १३ सामन्यात ११ बळी घेत, त्याने तमिळनाडू संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेतही त्याचा इकॉनॉमी रेट ५.८ असा राहिला होता जो फक्त, तमिळनाडूच्याच साई किशोरपेक्षा जास्त होता.
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, अखेरीस यावर्षी त्याला यावर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपला पहिला आयपीएल बळी म्हणून त्याने, आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. दिल्ली विरुद्ध देखील हैदराबादला हंगामातील पहिला विजय मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला.
आपल्या गोलंदाजीविषयी सांगताना नटराजन म्हणतो,
“टेनिस बॉल क्रिकेटमूळे यॉर्कर टाकण्याचा आम्हाला चांगला सराव आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून यॉर्कर चेंडू आपल्या भात्यात असणे, केव्हाही फायद्याचे असते. याचाच फायदा मला, टीएनपीएलमध्ये झाला.”
दिल्ली विरुद्ध केलेल्या, दमदार कामगिरीचे ब्रेट ली, वीरेंद्र सेहवाग यांनी तोंडभरून कौतुक केले. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात, भुवनेश्वर कुमारचा साथीदार म्हणून त्याने चांगली कामगिरी बजावली आहे. हैदराबाद संघ व्यवस्थापनाला व क्रिकेट चाहत्यांना, यापुढे देखील त्याच्याकडून अशीच अपेक्षा आहे.
वाचा-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-क्या बात है! २००८ पासून आजपर्यंत ‘ते’ खेळत आहेत आयपीएल, हा विदेशी खेळाडूही यादीत