इंग्रजांचा खेळ म्हणून हिणवले गेलेले क्रिकेट सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणून ओळखला जातो. भारतातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी दरवर्षी बऱ्याच खेळाडूंना प्रसिद्धीझोतात आणत असते. सन १९३४ मध्ये सुरु झालेली ही स्पर्धा जगभरातील सर्वात प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे. भारतातील सर्व राज्य क्रिकेट संघटनांचे संघ या स्पर्धेत खेळत असतात. या स्पर्धेत, विदर्भ क्रिकेट असोसिएशनने १९५७ पासून सहभाग घ्यायला सुरुवात केली. विदर्भ संघ नियमितपणे या स्पर्धेत सहभागी होत असला तरी, २०११ या वर्षापर्यंत विदर्भाचा एकही खेळाडू भारताच्या राष्ट्रीय कसोटी संघात खेळला नव्हता. जवळपास ५४ वर्षानंतर, विदर्भाचा पहिला खेळाडू भारतीय कसोटी संघात खेळला. वेगवान गोलंदाज असलेला हा क्रिकेटपटू म्हणजे उमेश यादव.
व्हायचे होते सैन्यात भरती, मात्र झाला क्रिकेटपटू
खाण कामगाराचा मुलगा असलेला उमेश उर्फ बबलू सर्वांचाच लाडका होता. लहानपणापासूनच त्याला शाळेची आवड नव्हती. शाळेला दांडी मारत तो कबड्डी, फुटबॉल आणि क्रिकेटच्या मैदानावर रमत होता. वडिलांची इच्छा होती की, उमेशने शिकून सरकारी नोकरी मिळवावी. उमेश मात्र आपल्याच दुनियेत मग्न होता. रडतखडत बारावीपर्यंत शिकल्यानंतर, त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. शिक्षण सोडल्यानंतर त्याला सैन्यात भरती होण्याचे वेड लागले. त्या दिशेने त्याने प्रयत्न सुरू केले. दोन वेळा प्रयत्न केल्यानंतरही तो सैन्यात भरती होऊ शकला नाही. पुढे, पोलीस भरतीसाठी त्याने सराव सुरू केला. मैदानी चाचणीत ९० पेक्षा अधिक गुण त्याला मिळाले. मात्र, लेखी परीक्षेत त्याला अपयश आले. सैन्य आणि पोलीस भरतीचा विषय डोक्यातून काढून त्याने तिसरा मार्ग शोधायला सुरुवात केली.
उमेश नागपूरच्या टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात चांगलाच प्रसिद्ध होता. तो अतिशय वेगवान गोलंदाजी करून फलंदाजांच्या यष्ट्या उखाडण्यात माहीर होता. एका स्थानिक स्पर्धेत त्याला रू. १०,००० चा रोख पुरस्कार मिळाला होता. अनेक संघ त्याला ५००-१००० रुपये देऊन आपल्या संघात खेळण्यासाठी बोलवत असत. आपण चांगली गोलंदाजी करतो आहे, असा आत्मविश्वास मिळाल्याने उमेशने क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचे ठरवले.
प्रीतम गंधे यांनी केली मदत
क्रिकेट खेळायला मिळावे म्हणून, त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. कोणत्याही क्लबकडून खेळला नसल्याने त्याची निवड महाविद्यालयाच्या संघात झाली नाही. क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण मिळवण्यासाठी त्याने विदर्भ जिमखाना या क्लबमध्ये प्रवेश घेतला. विदर्भ जिमखानाकडून एका स्थानिक सामन्यात खेळताना, विदर्भ रणजी संघाचे खेळाडू असलेले प्रीतम गंधे यांची त्याच्यावर नजर पडली. त्यांनी उमेशला आपल्यासोबत सराव करण्यासाठी विचारले. उमेशच्या कामगिरीने प्रीतम गंधे आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी इतके खुश झाले की, त्यांनी अवघ्या सहा महिन्यात त्याची निवड विदर्भाच्या वरिष्ठ संघात केली.
उमेशच्या रणजी पदार्पणाची गोष्टही भलतीच रंजक आहे. २००८-२००९ च्या रणजी मोसमात त्याची विदर्भ संघात निवड झाली. मध्य प्रदेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची अपेक्षा नव्हती. कारण, खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने त्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना संधी देण्याचा मानस संघ व्यवस्थापनाचा होता. तरीही, प्रीतम गंधे यांनी धोका पत्करून त्याला त्या सामन्यात खेळवले. विदर्भाला पराभव पत्करावा लागला तरी उमेशने आपल्या पहिल्याच सामन्यात ४ बळी मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आयपीएलमध्ये निवड आणि आईचे निधन
सलग दोन रणजी हंगामात जोरदार कामगिरी केल्यानंतर, आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या प्रशिक्षकांचे उमेशवर लक्ष गेले. उमेशच्या गोलंदाजीने त्यांच्यावर प्रभाव पाडला. आयपीएलच्या तिसर्या हंगामात तो दिल्लीच्या संघाचा सदस्य झाला. भारतीय संघाकडून खेळण्याच्या आपल्या स्वप्नाच्या तो अगदी जवळ आला होता. उमेश भारतीय संघासाठी खेळणार याची खात्री सर्वांना होती. आयपीएलमधील त्याच्या खेळानंतर तो अधिक मेहनत घेऊ लागला. अशातच, त्याच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. त्याच्या आईचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आपल्या मुलाला भारतासाठी खेळताना पाहण्याची तिचे स्वप्न अधुरे राहिले. आई गेल्यानंतर, लगेचच उमेशची भारतीय संघात निवड झाली. आपल्या आईचे स्वप्न तो लवकरच पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार होता.
… आणि उमेश आंतरराष्ट्रीय कसोटी खेळणारा पहिला वैदर्भीय खेळाडू ठरला
वेस्ट इंडीजमध्ये आयोजित २०१० टी२० विश्वचषकादरम्यान प्रवीण कुमार दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी उमेशला बोलावून घेण्यात आले. या स्पर्धेत तो एकही सामना खेळू शकला नाही. मात्र, त्याचे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आगमन झाले होते. विश्वचषकानंतर श्रीलंकेत झालेल्या भारत, श्रीलंका व झिम्बाब्वे यांच्यातील तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने आपले एकदिवसीय पदार्पण केले. पहिल्या मालिकेत तो अपयशी ठरला तरीही, त्याला पुन्हा संधी देण्यात आली. श्रीलंका दौऱ्यावर कसोटी संघासह तो नेट बॉलर म्हणून कार्यरत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी न करता आल्याने त्याला संघातून वगळले गेले.
उमेशच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण तेव्हा आला, जेव्हा त्याने नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. या सामन्यात खेळण्यासाठी उतरताना त्याने, आपल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी इतिहास रचला होता. कारण, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळणारा तो विदर्भाचा पहिला खेळाडू होता. तेव्हापासून उमेश भारतीय संघात नियमितपणे खेळताना दिसू लागला.
२०१५ विश्वचषकात ठरला सर्वोत्तम भारतीय गोलंदाज
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित २०१५ विश्वचषकात खेळताना त्याने भारताकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा मान मिळवला. संपूर्ण स्पर्धेत उमेशने आठ सामने खेळत भारताकडून सर्वाधिक १८ बळी मिळवले. वेगवान गोलंदाज असला तरी, उमेश आपल्या फलंदाजीसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. भारतीय संघासाठी अनेकदा मोक्याच्या क्षणी त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सामन्याचा नूर पालटला आहे. सन २०१७ च्या रणजी ट्रॉफीत ओडिसा विरुद्ध केलेली ११९ चेंडूतील १२८ धावांची खेळी त्याच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीतील पहिले शतक होते.
विराट कोहलीच्या नेतृत्वात बहरली कारकीर्द
कारकिर्दीच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या आत-बाहेर होत राहिलेल्या उमेशला विराट कोहलीने भारतीय कर्णधार झाल्यानंतर वारंवार संधी दिली. खासकरून, कसोटी संघाचा तो नियमित सदस्य झाला. भारतीय खेळपट्ट्यांवरील तो सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून समोर आला. २०१६-२०१७ च्या हंगामात तो भारताचा सर्वात्कृष्ट गोलंदाज होता. कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांच्यानंतर भारतात एका सामन्यात दहा बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला. ही कामगिरी त्याने २०१८ मध्ये हैदराबाद कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध केली.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व ईशांत शर्मा यांच्यासोबत उमेश भारतीय कसोटी संघाच्या वेगवान आक्रमणाचा स्तंभ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्व करत असलेल्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी तो गेली तीन वर्ष आपले योगदान देत आहे.
दिग्गजांनी केले कौतुक
उमेशने आपल्या गोलंदाजीने जगभरातील तमाम दिग्गज खेळाडूंना प्रभावित केले आहे. जेव्हा जहीर खानला विचारले गेले होते की, तुझ्यानंतर भारताच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व कोण करेल ? तेव्हा जहीरने उमेशचे नाव घेतले होते. सर गॅरी सोबर्स व ग्लेन मॅकग्रा हेदेखील त्याचे अनेकदा कौतुक करतात. जगातील सर्वात वेगवान गोलंदाज असे बिरूद मिरवणाऱ्या डेल स्टेनने म्हटले होते की, “मी उमेशच्या गोलंदाजीचा मोठा फॅन आहे.”
भारतीय संघाचा एक महत्त्वपूर्ण सदस्य असलेला उमेश यंदा पुन्हा एकदा लिलावात असेल, त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुक्त केले आहे. त्यामुळे अनेक संघ उमेश सारख्या वेगवान गोलंदाजावर बोली लावण्यास उत्सुक असतील.