सन २००४ च्या अखेरीस भारतीय संघात एमएस धोनी दाखल झाला. झारखंडसारख्या लहान शहरातून आलेला धोनी आपल्या कामगिरीच्या बळावर भारतीय संघाचा कायमस्वरूपी सदस्य बनला. धोनी येण्यापूर्वी, भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून खेळत असलेले दीप दासगुप्ता, पार्थिव पटेल हे खेळाडू मागे पडले. द्रविड फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकला आणि ज्या दिनेश कार्तिकसोबत धोनीची यष्टीरक्षकाच्या जागेसाठी स्पर्धा होती तो दिनेश कार्तिक फलंदाज म्हणून संघात खेळू लागला. खरंतर, धोनीमुळे या खेळाडूंची कारकीर्द तितकीशी बहरली नाही, असे अनेकजण ठामपणे म्हणतात.
मात्र, धोनीने मिळालेल्या सर्व संधीचा पुरेपूर फायदा उचलत ही जागा कमावली होती. पुढे तीन-चार वर्षात धोनी भारतीय संघाचा कर्णधार बनला. त्यानंतर, धोनीव्यतिरिक्त कोणी यष्टीरक्षक म्हणून राष्ट्रीय संघात खेळेल, याची सुतराम शक्यता नव्हती. त्याचवेळी, २००७-२००८ पासून बंगालचा एक यष्टीरक्षक दमदार कामगिरी करत, भारतीय संघाच्या दिशेने येत होता. दिनेश कार्तिक व धोनी यांच्यासमवेत स्पर्धा करताना, त्याने कसोटी संघातील राखीव यष्टीरक्षकाची जागा पटकावली. धोनीच्या काळात राखीव असलेल्या या खेळाडूने त्याच्या निवृत्तीनंतर, कसोटी संघातील जागेवर कब्जा केला. भारतातील एक उत्तम यष्टिरक्षक असलेला हा खेळाडू म्हणजे ‘वृद्धिमान साहा’.
लक्षणीय रणजी पदार्पण
पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे जन्मलेला साहा लहानपणापासूनच क्रिकेट आणि फुटबॉल अत्यंत चपळतेने खेळत. दोन्हीकडे यष्टीरक्षक आणि गोलरक्षकाची जबाबदारी त्याला दिली जात. हळूहळू फुटबॉल खेळण्याचे त्याने सोडले आणि क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले. आधी बंगालच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघातून त्याने उच्चस्तरीय क्रिकेट खेळले. पुढे, २२ वर्षाखालील संघात चांगली कामगिरी करत राहिला. बंगालचा प्रमुख यष्टीरक्षक दीप दासगुप्ता हा बंडखोर आयसीएलमध्ये सहभागी झाल्याने, साहाला बंगालच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. २००६-२००७ ला त्याने विजय हजारे चषकात आपला पहिला सामना खेळला. पुढच्या रणजी हंगामात त्याने आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. हैदराबाद विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात, तो शतक झळकावण्यात यशस्वी ठरला. याच, शतकामुळे त्याला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी कोलकत्ता नाईट रायडर्सने करारबद्ध केले.
अचानकपणे खेळायला मिळाली पहिली कसोटी
जानेवारी २०१० मध्ये, दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. देशांतर्गत क्रिकेटमधल्या चांगल्या कामगिरीच्या आधारे, वृद्धिमान भारतीय संघातील सदस्य बनला होता. नियमितपणे संघासोबत असलेल्या दिनेश कार्तिकच्या जागी साहाला राखीव यष्टिरक्षक म्हणून निवडले गेलेले.
धोनी कर्णधार व यष्टीरक्षक असल्याने, साहाला संधी मिळणे अपेक्षित नव्हते. परंतु, व्हीव्हीएस लक्ष्मण दुखापतीतून सावरू शकला नाही आणि संघातील एकमेव राखीव फलंदाज रोहित शर्मा, ऐन सामन्याच्या सकाळी फुटबॉल खेळताना जायबंदी झाला. संघात एक फलंदाज कमी पडत असल्याने, साहाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तो पहिल्या डावात शून्य व दुसऱ्या डावात ३६ धावा काढू शकला. दोन्ही डावात तो डेल स्टेनचा शिकार झाला. पुढच्या सामन्यात, लक्ष्मण तंदुरुस्त झाल्याने, त्याला संघातून वगळण्यात आले.
साहाला आपली दुसरी कसोटी खेळण्यासाठी दोन वर्ष वाट पहावी लागली. तो २०११-२०१२ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकांची गती कमी राखल्याने धोनीला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे, पुढील सामन्यात साहा यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघात खेळला. याच सामन्यात विराट कोहलीने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. कोहली व साहाने सहाव्या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी करत, भारताला नामुष्कीजनक पराभवापासून वाचवले. यानंतरही, तो नियमितपणे भारतीय संघासोबत राहू लागला.
आयपीएल फायनलमधील शतक
साहासाठी २०१४ हे वर्ष लाभदायक ठरले. आयपीएलमध्ये किंग्स इलेवन पंजाबसाठी त्याचा हंगाम जबरदस्त राहिला. पंजाबचा यष्टीरक्षक म्हणून त्याने, यष्ट्यांमागे अफलातून कामगिरी केली. सोबतच फलंदाजीत १४५.३० च्या सरासरीने ३४२ धावा चोपल्या. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने, धुवाधार शतक झळकावत ११५ धावांची शतकी खेळी केली. आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतक करणारा तो पहिला फलंदाज होता. त्याच्या शतकानंतरही, पंजाबला विजेतेपद मिळविता आले नाही. मनीष पांडेने केलेल्या ९० धावांच्या खेळीमुळे, कोलकाता नाईट रायडर्सने २०० धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पूर्ण करत, विजेतेपद पटकावले.
वर्षाखेरीस, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर एमएस धोनीने अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. यानंतर, साहा भारतीय कसोटी संघाचा नियमित यष्टीरक्षक बनला. भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक बनल्यानंतर, साहाने आपले यष्टीरक्षण आणि फलंदाजी कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली.
बनला भारताचा नियमित कसोटी यष्टीरक्षक
साहाने यष्ट्यांमागे अशी काही कामगिरी केली की, त्याला क्रिकेटप्रेमी ‘सुपरमॅन साहा’ या नावाने ओळखू लागले. उत्कृष्ट यष्टीरक्षणासोबत भारतीय संघ अडचणीत असताना त्याने, फलंदाजीतही तितकेच योगदान दिले. त्याने २०१६ च्या श्रीलंका दौर्यावर दोन शतके झळकावली. तर, वेस्ट इंडिजविरुद्ध सेंट लुसिया येथे झळकावलेले शतक हे कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाने आशिया बाहेर जाऊन झळकवले पहिले शतक होते. न्यूझीलंड विरुद्ध आपले घरचे मैदान असलेल्या ईडन गार्डन्सवर दोन्ही डावात अर्धशतके ठोकत त्याने, आपल्या इतर स्पर्धक यष्टीरक्षकांना खूप मागे सोडले.
२० चेंडूतील विक्रमी शतक ठोकणारा साहा
जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने एका कसोटीत १० झेल घेण्याचा पराक्रम केला. मात्र, पुढच्याच कसोटीत त्याला खांद्याची दुखापत झाली आणि तो भारतीय संघातून बाजूला गेला. लवकरच त्याने यातून सावरत मैदानात पाऊल ठेवले. कोलकात्यातील जे.सी. मुखर्जी टी२० स्पर्धेत, मोहन बागान संघाकडून खेळताना त्याने फक्त २० चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या खेळीत १४ षटकार व चार चौकारांचा समावेश होता. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ५१० असा आश्चर्यचकित करणारा होता. या स्पर्धेला बीसीसीआयची मान्यता नसल्याने हे शतक विश्वविक्रम म्हणून मोजले गेले नाही.
रिषभ पंतसोबत स्पर्धा
चांगल्या फॉर्मसह साहा आयपीएलमध्ये दाखल झाला. मात्र, आयपीएलमध्ये त्याच्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली. तो जवळपास वर्षभरासाठी संघातून बाहेर गेला. या काळात त्याला सलग १२ कसोटी खेळता आल्या नाहीत. साहा भारतासाठी फक्त कसोटीत खेळत असल्याने त्याला पुनरागमन करणे अवघड जाणार होते. रिषभ पंत चांगली कामगिरी करत, त्या जागेवर हक्क सांगत होता. साहाने २०१९ च्या मध्यात, पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. रिषभ पंतसोबत त्याची स्पर्धा चांगलीच रंगली आहे. साहाने बांगलादेश विरुद्ध खेळताना यष्ट्यांमागे १०० झेल घेण्याची कामगिरी केली. यष्टिरक्षक म्हणून १०० झेल घेणारा तो अवघा पाचवा भारतीय आहे.
यष्टिरक्षणाच्या बाबतीत साहाचे तंत्र धोनीपेक्षा सरस आहे, असे साहाचे कौतुक भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केले होते. भारताचा यष्टीरक्षक असलेला ‘फ्लाईंग साहा’ सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिला तर, भारताच्या अव्वल तीन यष्टीरक्षकांमध्ये सामील होऊ शकतो. त्याने भारताकडून शेवटचा सामना 2021मध्ये खेळला.
संबंधित लेख-
एकाच वनडे सामन्यात नाबाद २३२ धावा अन् ५ बळी घेणारी ‘फ्युचर सुपरस्टार’
सचिन मैदानात होता; वानखेडेवर इतिहास घडत होता, तरीही जगात कुणालाच याची साधी खबरसुद्धा नव्हती…