आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सहयोगी सदस्य असलेला झिम्बाब्वे संघ १९८७ मध्ये सलग दुसरा विश्वचषक खेळत होता. झिम्बाब्वेला अजूनही कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला नव्हता. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघ बर्यापैकी कामगिरी करत असत. १९८३च्या आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. कपिल देव यांनी १७५ धावांची चमत्कारी खेळी खेळण्याअगोदर देखील झिम्बाब्वेने सामन्यावर पकड मिळवली होती.
सन १९८७ मध्ये भारतीय उपखंडात विश्वचषकाचे आयोजन होत होते. झिम्बाब्वे नव्या जोशाने पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी झाला होता. यावेळी झिम्बाब्वेचे कर्णधारपद जॉन ट्रायकोस यांच्या हाती होते. १० ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे न्युझीलंडविरूद्ध झिम्बाब्वे आपला पहिला सामना खेळणार होता. अ गटातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यामुळे झिम्बाब्वेला हा सामना जिंकून विजय सुरुवात करायची होती.
विश्वचषक मोहिमेचा प्रारंभ
ट्रायकोस यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने सलामीवीर मार्टिन स्नेडन यांच्या ६४ आणि मार्टिन क्रो यांच्या ७२ तसेच कर्णधार जेफ क्रो यांनी २५ चेंडूत ३१ आणि यष्टिरक्षक फलंदाज इयान स्मिथ यांनी २० चेंडूत फटकावलेल्या नाबाद २९ धावांच्या जोरावर २४२ धावा धावफलकावर लावल्या. झिम्बाब्वेच्या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या आठ धावांवर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज डेव्ह ह्यूटन मैदानावर उतरले. न्यूझीलंडचे गोलंदाज त्यादिवशी तुफान फॉर्मात होते. चॅटफील्ड, वॉटसन आणि स्नेडन या तिकडीने झिम्बाब्वेची अवस्था सात बाद १०७ दयनीय करून टाकली. मात्र, ३० वर्षाच्या ह्यूटन यांनी हैदराबादच्या दमट हवामानात देखील निग्रहाने फलंदाजी सुरू ठेवली होती. संघाच्या १०७ पैकी ६० धावा एकट्या ह्यूटन यांच्या होत्या. झिम्बाब्वेचा पराभव स्पष्टपणे दिसत होता. नवव्या क्रमांकावरील फलंदाज इयान बुचार्ट हे ह्यूटन यांची साथ देण्यासाठी आले.
ह्यूटन आणि बुचार्ट यांची विक्रमी भागीदारी
न्यूझीलंडच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा ह्यूटन आणि बुचार्ट जोडीने धीराने सामना करण्यास सुरुवात केली. पडझड झालेल्या झिम्बाब्वेचा डाव दोघांनी विणायला सुरुवात केली. संधी मिळेल तेव्हा खराब चेंडूंवर मोठे फटके खेळत होते. दोघांनी आठव्या गड्यासाठी ११७ धावांची भर घालून संघाची धावसंख्या २२१ पर्यंत पोहोचवली. ह्यूटन यांनी तोपर्यंत १३७ चेंडूत १३ चौकार आणि सहा षटकारांच्या सहाय्याने १४२ धावांची खेळी केली होती.
ह्यूटन यांना हैदराबादच्या गरमीचा प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी खालावत होती. अशा परिस्थितीतही ते देशासाठी मैदानावर उभे होते. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ह्यूटन यांनी शतक पूर्ण केल्यानंतर काही प्रेक्षकांनी मैदानावर धावत येऊन त्यांचे चुंबन घेतलेले. जास्त थकल्या कारणाने ह्यूटन धावण्यापेक्षा चौकार मारण्यावर भर देताना दिसत.
मार्टिन क्रो यांचा अफलातून झेल
ह्यूटन हे थकलेले असतानाही बाद होण्याची चिन्हे दिसत नव्हती. काहीतरी चमत्कार व्हावा, अशी अपेक्षा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी बाळगलेली. यावेळी मार्टिन क्रो न्यूझीलंडच्या मदतीला धावून आले. विजयासाठी २२ चेंडूत २१ धावा हव्या असताना ह्यूटन यांनी मिड-ऑनचा क्षेत्ररक्षक काहीसा आत असलेला पाहून स्नेडेन यांचा चेंडू उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न केला. सर्वांची नजर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्टिन क्रो यांच्याकडे गेली. तीस यार्डाच्या आतून उलटे धावत जात जवळजवळ तीस मीटर अंतर कापत न्यूझीलंड संघातील स्टार खेळाडू असलेल्या क्रो यांनी सूर मारत हा अफलातून झेल पकडला. ह्यूटन यांची दर्जेदार खेळी संपवण्यासाठी अशाच प्रकारच्या अप्रतिम झेलाची आवश्यकता होती.
बुचार्ट यांची झुंज
ह्यूटन बाद झाल्यानंतर, त्यांच्या जागी आलेले ब्रॅन्डेस एकही चेंडू न खेळता धावबाद झाले. बुचार्ट यांनी हार न मानता नेटाने किल्ला लढवला. अखेरचे फलंदाज व कर्णधार ट्रायकोस हे बुचार्ट यांच्यासमवेत होते. बुचार्ट यांनी दोन चौकार मारत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले.
झिम्बाब्वेचा अपेक्षाभंग
अखेरच्या षटकात झिम्बाब्वेला ८ धावांची गरज होती. बुचार्ट स्ट्राइकला असल्याने झिम्बाब्वेचे पारडे जड वाटत होते. बुक यांच्या दुसऱ्या चेंडूवर त्यांनी चौकार मारत सामना पूर्णपणे झिम्बाब्वेच्या बाजूने झुकवला. मात्र, चौथ्या चेंडूवर दोन्ही फलंदाजांकडून अक्षम्य चूक झाली. बुचार्ट यांनी तटवलेल्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ते स्वतः धावबाद झाले. शर्थीची झुंज देऊन सामन्यात पुनरागमन केलेल्या झिम्बाब्वेच्या पदरी अखेर पराभवच पडला.
या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला असला तरीही मार्टिन क्रो यांचा झेल आणि ह्यूटन-बुचार्ट यांची झुंजार भागीदारी क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिली.
अधिक वाचा –
-जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई
– शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून