१९९४-९५ च्या क्रिकेट हंगामात, न्यूझीलंडच्या संघाला काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त केले होते. त्यांच्यासाठी आणखी वाईट बातमी तेव्हा आली जेव्हा, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकतर्फी हरलेल्या कसोटी मालिकेनंतर विश्वासू फलंदाज अँड्र्यू जोन्सने निवृत्तीची घोषणा केली. अशा कठीण परिस्थितीत, एमेरल्ड विरुद्ध केंटरबरी संघाच्या एका युवा खेळाडूने ९५ धावांची जोरदार खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा २३ वर्षीय फलंदाज त्यावेळी, न्यूझीलंड क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावंत खेळाडू म्हणून ओळखला जात होता.. नाव होते नॅथन ऍस्टल..
१५ सप्टेंबर १९७१ ला ख्राइस्टचर्च येथे जन्मलेल्या ऍस्टलने न्यूझीलंडला ब्रुस टेलर, क्रेग मॅकमिलन आणि मायकेल पप्स यांसारखे क्रिकेटपटू देणाऱ्या ईस्ट ख्राइस्टचर्च-शर्ली क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत तसेच उत्तमरित्या मध्यमगती गोलंदाजी करून संघासाठी पाचव्या गोलंदाजाची भुमिका निभावत . क्रिकेटसोबतच तो उत्तम फुटबॉलपटू देखील होता. ख्राइस्टचर्च येथील रेंजर्स एफसी या संघाचे त्याने १७ वर्षांखालील वयोगटात प्रतिनिधित्व केले होते. १९९०-९१ च्या हंगामात ऍस्टलची निवड इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या न्यूझीलंडच्या युवा संघात झाली. त्याने १९९१ मध्ये केंटरबरीसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केले, मात्र जवळपास तीन वर्ष तो कसल्याही प्रकारे आपली छाप पाडू शकला नाही. १९९४ देशांतर्गत हंगामात ५५.२५ च्या सरासरीने ६६३ धावा काढून तो राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या रडारवर आला.
देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीनंतर अखेर १९९५ मध्ये राष्ट्रीय संघात त्याची निवड करण्यात आली. ऍस्टलने वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु पदार्पणात त्याला चांगली कामगिरी केली नव्हती. तसेच १९९६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने आपली पहिली कसोटी खेळली.
ऍस्टलच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ग्लेन टर्नर हे न्यूझीलंडचे प्रशिक्षक होते. टर्नर यांनी सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या ऍस्टलला एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून बढती दिली आणि त्याची कसोटी संघात पुन्हा निवड केली. टर्नर यांच्या या दूरदृष्टीने नंतर इतिहास घडविला. १९९६ विश्वचषकातील पहिला सामना खेळताना ऍस्टलने इंग्लंड विरुद्ध धमाकेदार शतक ठोकले. त्या सामन्यात मिळालेल सामनावीराचा धनादेश ऍस्टलने, अहमदाबाद येथील पाणीपुरीवाला भरत शाह यांना देत माणुसकीचे दर्शन घडवले होते.
ऍस्टलच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण २००२ मध्ये घरच्या ख्राइस्टचर्च मैदानावर आला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तुफानी खेळी करत ऍस्टलने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले. मार्च २००२ मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ऍस्टलने चौथ्या डावात फक्त १६८ चेंडूत २२२ धावा फटकावल्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दुहेरी शतक झळकावणारा खेळाडू ठरला. त्याच्या खेळीत २८ चौकार आणि ११ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्या सामन्यातील नासिर हुसेन व अँड्र्यू फ्लिंटॉफ यांची शतके, ग्रहम थॉर्पचे द्विशतक तसेच कॅडिकच्या सहा बळींपेक्षा ऍस्टलच्या वेगवान द्विशतकाची चर्चा अधिक होते. ऍस्टलच्या विश्वविक्रमी खेळीनंतरही दुर्दैवाने न्युझीलंडला तो सामना ९८ धावांनी गमवावा लागला होता.
२००३ चा विश्वचषकही त्याच्यासाठी चांगला राहिला. सात सामन्यात ४२.६२ च्या सरासरीने २१३ धावा व ४ बळी त्याने आपल्या नावे केले. ऍस्टल आपल्या संपूर्ण कारकीर्दीत तीन विश्वचषकात सहभागी झाला, मात्र त्याच्या नावे सर्वाधिक पाच वेळा शून्यावर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम देखील जमा आहे.
२००३ विश्वचषकानंतर त्याच्या खेळात कमालीची घसरण झाली. २००४ चॅम्पियन्स ट्रॉफीतील अमेरिकेविरुद्धचे शतक तसेच झिम्बाब्वेत भारताविरुद्धचे शतक व २००६ मधील वेस्ट इंडिज विरुद्धच्या शतकाव्यतिरिक्त तो चांगली कामगिरी करू शकला नाही. ऍस्टल चौथा विश्वचषक खेळण्याची अपेक्षा असतानाच, त्याने जानेवारी २००७ मध्ये कॉमनवेल्थ बँक मालिकेत खेळत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
ऍस्टल हा एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू होता. ऍस्टलने ८१ कसोटी सामन्यांत ३७ च्या सरासरीने ४,७०२ धावा केल्या आणि ५१ बळी मिळवले. त्याने न्युझीलंडसाठी २२३ एकदिवसीय सामने खेळत ३४.९२ च्या सरासरीने ७०९० धावा केल्या आणि ९९ बळी टिपले. आकडेवारी व प्रदर्शनाच्या आधारे, ऍस्टल निर्विवादपणे न्यूझीलंडच्या सर्वात्तम फलंदाजांपैकी एक ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, ऍस्टलने छंद म्हणून, ऑटो रेसिंग करायला सुरुवात केली. ‘रुआपुना स्पीड वे’ या प्रतिष्ठेच्या रेसिंग स्पर्धेत त्याने २०१० मध्ये सहभाग देखील नोंदवला. तत्पूर्वी, आयसीएलच्या मुंबईचे चॅम्प्स संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले.
सध्या, क्रिकेटपासून काहीसा दूर राहत त्याने, आपली पत्नी केलीसोबत ख्राइस्टचर्च येथे लहान मुलांचे संगोपन करणारी संस्था सुरू करत, स्वतःचे मन रमवले आहे.
वाचा-
-बीडमधील आंबेजोगाईचा भीडू आयपीएल गाजवायला झालाय सज्ज
-एमएस धोनीशी तुलना केली जाणारा पठ्या गाजवणार आयपीएल; करतोय स्मिथच्या राजस्थानकडून एंट्री