बरीच वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले बिल गेट्स म्हणतात,
“तुम्ही एका गरीब परिवारात जन्म घेतला यात तुमची काही चूक नाही. मात्र, तुम्ही तुमच्या आयुष्याची अखेर गरीब म्हणून केली तर हा पूर्णपणे तुमचा दोष आहे.”
बिल गेट्स यांना या वाक्याद्वारे हेच सांगायचे आहे की, तुम्ही स्वतः मेहनत करून तुमची परिस्थिती सुधरवू शकता आणि नाव कमावू शकता. क्रिकेटच्या मैदानावरही हे वाक्य जगलेले अनेक क्रिकेटपटू पहायला मिळतात. ज्या क्रिकेटपटूंनी एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विश्वविक्रम आपल्या नावे करत, क्रिकेट इतिहासाला आपली नोंद घ्यायला भाग पाडले. अशाच एका क्रिकेटपटूविषयी, आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, ज्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, सुरुवातीचे आयुष्य काढले व नंतर क्रिकेट जगतावर राज्य केले. तो क्रिकेटपटू म्हणजे, ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल.
कुटुंबाला हातभार म्हणून तो कचरा गोळा करायचा
जमैकाची राजधानी असलेल्या, किंगस्टनपासून या कहाणीला सुरुवात होते. ख्रिसचे वडील एक पोलीस शिपाई होते. पोलीस असले तरी त्यांचा पगार अत्यंत तुटपुंजा होता. त्यांच्या सहा अपत्यांपैकी ख्रिस पाचवे अपत्य. एका लहानश्या झोपडीत सहा मुले व आई वडील असा परिवार राहायचा. कुटुंबाचा पोटापाण्यासाठी ख्रिसची आई रस्त्याच्या कडेला छोटेसे दुकान लावून, काही खाण्याचे पदार्थ विकत. आर्थिक परिस्थितीमुळे ख्रिस दहावीपर्यंत शिकू शकला. यादरम्यान तो गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळू लागला. मात्र, कुटुंबाला थोडासा आर्थिक हातभार लागावा म्हणून तो काम शोधू लागला. त्याला त्याच्या मनासारखे काम कोठे मिळत नव्हते. शेवटी, ख्रिसने रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातून, वस्तू वेचायला सुरुवात केली. तो कचऱ्यातून असा वस्तू निवडून घेत, ज्याद्वारे त्याच्या हाती काही पैसे लागत. कधीकधी तर तो लहानसहान चोऱ्यादेखील करत. परिस्थिती खराब असली तरी, त्याचे क्रिकेटवरील प्रेम कमी नव्हते झाले. आपल्या गावातील किंवा शेजारच्या गावातील मुलांच्या समवेत तो क्रिकेट खेळत. त्या सर्व मुलांच्यात ख्रिसचा खेळ, सर्वात उच्च दर्जाचा होता.
लुकास क्रिकेट क्लबने संधी दिली आणि…
एकदा जमैकातील लुकास क्रिकेट क्लबच्या एका अधिकाऱ्याने ख्रिसचा खेळ पाहिला आणि त्याला आपल्या क्लबसाठी खेळण्यास निमंत्रित केले. क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत असताना, त्याच्या खेळात चांगलीच प्रगती झाली. ख्रिस क्रिकेटच्या क्षेत्रात मोठे नाव कमावण्यासाठी इच्छुक होता. लुकास क्रिकेट क्लबमार्फत त्याला ही संधी मिळाली. तो आपल्यातील दोष बाजूला करत, एक उत्तम क्रिकेटपटू होण्याकडे मार्गक्रमण करू लागला. ख्रिस आत्ता जे काही आहे, त्यासाठी सर्वस्वी लुकास क्रिकेट क्लब जबाबदार आहे.
एकदाचा आंतरराष्ट्रीय धावांचा दुष्काळ संपवला
सन १९९८ मध्ये जमैकासाठी प्रथमश्रेणी पदार्पण केल्यानंतर, एका वर्षातच तो राष्ट्रीय संघात सामील झाला. भारताविरुद्ध त्याने एकदिवसीय पदार्पण केले. बऱ्याच महान खेळाडूंप्रमाणे तोदेखील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. सन २००० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पणात त्याने, ३३ धावांची खेळी केली. ख्रिसने आपल्या सुरुवातीच्या अनेक सामन्यांत, चांगली सुरुवात केली. पण, तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत. ख्रिससाठी २००१ हे वर्ष अत्यंत लाभदायी ठरले. याच वर्षी त्याने आपले पहिले कसोटी व एकदिवसीय शतक पूर्ण केले. आपला धावांचा दुष्काळ संपवत, त्याने वेस्ट इंडीजच्या संघात आपली जागा पक्की केली.
तेव्हा गेल तर मैदानात कोसळला होता
वेस्ट इंडीज संघाचा नियमित सलामीवीर झाल्यानंतर ख्रिसने आधी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत द्विशतक, तर भारताविरुद्ध वनडेमध्ये आक्रमक शतक झळकावत, जगभरातील गोलंदाजांसाठी धोक्याची सूचना दिली. २००३ चा विश्वचषकात याच्यासाठी संमिश्र राहिला. विश्वचषकानंतर त्याने काही शतकी खेळ्या केल्या. ख्रिसचे आयुष्य आणि क्रिकेट कारकीर्द चांगल्यारितीने चालू असताना त्याच्यावर एक आघात झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी दरम्यान, तो अचानकपणे चक्कर येऊन मैदानात कोसळला. हॉस्पिटलमध्ये सर्व चाचण्या केल्यानंतर निदान झाले की, त्याच्या हृदयाला काहीतरी त्रास आहे. त्यानंतर त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पण, डॉक्टरांनी त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले.
ख्रिस गेल २.०
क्रिकेटपासून दूर असताना, त्याला अनेकदा भीती वाटत की, आपण यानंतर पूर्वीसारखे क्रिकेट खेळू शकणार नाही. पण, आरामानंतर मैदानात परतलेला ख्रिस यावेळी वेगळा भासत होता. तो पूर्वीपेक्षा मजबूत झाला होता. आधी वेळ घेऊन खेळणारा ख्रिस निडर आणि आक्रमक झाला होता. तो पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर आक्रमण करत. ख्रिसचे हे बदललेले रूप, क्रिकेटशौकिनांना मात्र खूप आवडू लागले होते.
बदललेल्या ख्रिसचे नवे रूप क्रिकेट चाहत्यांना सर्वप्रथम पाहण्याची संधी मिळाली ती २००६ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. ख्रिसने आपल्या विस्फोटक फलंदाजीने स्पर्धा गाजवली. इंग्लंड विरुद्ध साखळी सामन्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने शतकी खेळ्या केल्या. अंतिम फेरीतही ख्रिस मैदानावर असेपर्यंत, वेस्ट इंडीजला विजयाची आशा होती. ख्रिसने संपूर्ण स्पर्धेत ४७४ धावा तडकावत ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारावर आपले नाव कोरले.
वेस्ट इंडिजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकात त्याची कामगिरी बऱ्यापैकी राहिली. याच वर्षी पहिल्या टी२० विश्वचषकाचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावून, टी२० क्रिकेटचा पहिला शतकवीर होण्याचा मान मिळवला. यानंतर गेल सातत्याने धावा बनवत राहीला. सन २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात त्याने ३३३ धावांची खेळी केली. जी त्याची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. वेस्ट इंडीजने जिंकलेल्या २०१२ व २०१६ टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा तो प्रमुख खेळाडू राहिला आहे. वाढत्या वयामुळे २०१९ पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे बंद केले.
आयपीएलचा सर्वात मोठा खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठे नाव असलेल्या ख्रिस गेलला आंतरराष्ट्रीय पटलावर एक ‘सेलिब्रिटी’ दर्जा देण्याचे काम आयपीएलने केले. आयपीएलच्या २०११ च्या हंगामात तो डर्क नॅनेसचा बदली खेळाडू म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघात दाखल झाला आणि त्यानंतर इतिहास घडत गेला. आयपीएलमधील बरेचसे विक्रम त्याच्या नावे नोंदवले गेले. २०११ ते २०१७ अशी सात वर्ष तो आरसीबीच्या संघाचा सदस्य राहिला. या काळात ख्रिसला भारतीय खेळाडूंप्रमाणे प्रेम मिळाले. २०१८ आयपीएल हंगामासाठी किंग्स इलेव्हन पंजाब संघात दाखल झाल्यानंतर येईल त्याच्यावरील प्रेमात कसलीही कमी आली नाही.
एका अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या ख्रिसकडे आज एवढी सुबत्ता आहे की, तो जगातील कोणतीही गोष्ट सहजरीत्या खरेदी करू शकतो. आपल्या मस्तमौला अंदाजासाठी प्रसिद्ध असणारा, जगभरात ‘युनिव्हर्स बॉस’ हे बिरूद लावून मिरवणारा ख्रिस वयाच्या ४१ व्या वर्षीही क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालताना आपल्याला दिसतोय.