---Advertisement---

दुखापती नसत्या तर, रवी रामपॉल वेस्ट इंडीजचा अव्वल गोलंदाज असता…!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 11:30 AM
---Advertisement---

वेस्टइंडीज क्रिकेटची ओळख म्हणजे आक्रमक फलंदाज आणि वेगवान गोलंदाज. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात असे फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही वेस्टइंडीज संघात होते. नव्वदच्या दशकात, आधुनिक क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर आक्रमक फलंदाजांची फळी कायम राहिली. मात्र, अस्सल कॅरेबियन वेगवान गोलंदाज म्हणावा, असा एकाधाच वेगवान गोलंदाज वेस्टइंडीज संघात असत. कर्टनी वॉल्श व कर्टली अंब्रोज यांनी निवृत्ती घेतल्यानंतर, वेस्ट इंडीजची वेगवान गोलंदाजांची परंपरा जपणारा गोलंदाज बराच काळ वेस्टइंडीज संघात नव्हता. केमार रोच, फिडेल एडवर्डस, जेरोम टेलर ही अशी काही नावे आहेत, ज्यांनी थोडाफार वेग दाखवला. मात्र, प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरेल, अशी कामगिरी त्यांना करता आली नाही. सध्या, ओशेन थॉमस, जेसन होल्डर, शेल्डन कॉट्रेल हे वेस्टइंडीजच्या वेगवान गोलंदाजीचे प्रतिनिधित्व करत आहेत. मधल्या काळात एका भारतीय वंशाच्या गोलंदाजाने वेस्टइंडीजच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व केले. त्याच्या वेगात येणाऱ्या आणि स्विंग होणाऱ्या चेंडूना तोंड देणे, भल्याभल्या फलंदाजांना अवघड जात. सहा-सात वर्षे वेस्टइंडीजला आपल्या गोलंदाजीने अनेक सामने जिंकून देणारा हा गोलंदाज होता ‘रवी रामपॉल’.

वेस्ट ‘इंडीयन’ रामपॉल अंडर-१५ संघातून सरळ अंडर-१९ संघात निवडला गेला

भारतीय वंशाचे लोक ज्या देशात सर्वाधिक संख्येने राहतात, त्या त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील प्रेसल या ठिकाणी त्याचा जन्म झाला. त्याचे खरे नाव, रवींद्रनाथ रामपॉल. त्रिनिदादमधील इतर मुलांप्रमाणेच, रामपॉल देखील लहान वयातच क्रिकेटकडे आकर्षित झाला. अल्पावधीतच त्याने गोलंदाज म्हणून चांगली प्रगती केली. वर्ल्ड अंडर-१५ चॅलेंजसाठी इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या संघाचा तो सदस्य होता. या स्पर्धेवर वेस्टइंडीज क्रिकेटच्या निवड समितीची नजर होती. इंग्लंडमधील त्या स्पर्धेत, रामपॉलची कामगिरी इतकी चांगली होती की, त्याची निवड सरळ १९ वर्षांखालील मुलांच्या संघात करण्यात आली. २००२ च्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत, रामपॉलने स्पर्धेच्या मध्यात सहभागी होत, २१ च्या सरासरीने ५ सामन्यात ९ बळी मिळवले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी दोन हंगामात मिळवून त्याने, ७२ बळी आपल्या नावे केले. रामपॉल राष्ट्रीय संघाच्या दिशेने योग्यरित्या आपली पावले टाकत होता.

राष्ट्रीय संघात खेळून तो पुन्हा अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक खेळला

अशातच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जर्मन लॉसन याची गोलंदाजीची शैली अवैध ठरवली गेल्याने, पुढील झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडकर्त्यांना एका युवा वेगवान गोलंदाजाची आवश्यकता होती. प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवत असलेल्या, रामपॉलला याचा फायदा झाला आणि त्याची निवड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी झाली. झिम्बाब्वे विरुद्धच्या या मालिकेत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चार सामन्यात २६ षटके टाकल्यानंतरही त्याला एक बळी मिळाला नाही. रामपॉलसारख्या प्रतिभावंत खेळाडुला इतक्यात बाहेर करणे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डांना परवडणारे नव्हते, म्हणून त्यांनी त्याला द. आफ्रिका दौऱ्यासाठी पुन्हा संधी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा पहिला बळी होता द. आफ्रिकेचा जॅक कॅलिस.

वरिष्ठ संघात खेळल्यानंतर ही, तो २००४ चा एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात खेळला. विश्वचषकातील उत्तम कामगिरीमुळे, २००४ च्या नेटवेस्ट ट्रॉफीसाठी त्याला वेस्ट इंडीज संघात निवडले गेले. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने सहा षटकात दोन बळी मिळवले होते. मात्र, त्याच सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो संघाबाहेर गेला. याच काळात, रामपॉलपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करणारे, गोलंदाज वेस्ट इंडीज संघात सामील झाले आणि या गोलंदाजांच्या स्पर्धेत रामपॉल मागे पडला.

दुखापतीतून सावरत रामपॉलने घेतली भरारी

रामपॉलला दुखापतीतून बरे होण्यासाठी जवळपास एक वर्षाचा काळ लागला. यावेळी तो निवडकर्त्यांच्या नजरेत नसला तरी, त्याने त्रिनिदादमधील लीग क्रिकेटवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. तो बर्‍याच स्पर्धांमध्ये, सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याचा वेगही काहीसा वाढला. सोबतच तो खालच्या फळीतील एक विश्वासार्ह फलंदाज म्हणून पुढे आला. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियन हाय कमिश्नरने, त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील गुणवंत वेगवान गोलंदाजांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे ठरवले. रामपॉलची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. या शिष्यवृत्ती अंतर्गत त्याने, ऑस्ट्रेलियात प्रथम दर्जाचे गोलंदाजी प्रशिक्षण मिळवले. ही गोष्ट त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. तीन वर्षांच्या काळानंतर, २००७ मध्ये, रामपॉलला पुन्हा वेस्ट इंडिजची मरून टोपी डोक्यावर घालण्याची संधी मिळाली.

दोन वर्षात त्याने इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड व नेदरलँड या युरोपियन संघांविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. भारताविरुद्ध त्याने प्रथमच एका सामन्यात चार बळी मिळवण्याची किमया केली. २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले. आता, तो वेस्ट इंडिजच्या संघाचा नियमित सदस्य बनला होता.

रामपॉलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्म २०११ मध्ये आला. तो यावर्षीचा विश्वचषकात वेस्टइंडीजचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून सामील झाला. भारताविरुद्ध चेन्नईत झालेल्या विश्वचषकातील साखळी सामन्यात त्याने, पाच बळींची नोंद केली. विश्वचषकानंतर, झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील गयाना कसोटीत त्याने सात बळी मिळवले. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम आकडेवारी ठरली. डिसेंबर २०११ च्या भारत दौऱ्यात त्याने विशाखापट्टनम वनडेत, दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८६ धावांची खेळी केली. रामपॉलची ही खेळी दहाव्या क्रमांकावरील फलंदाजाची एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळी आहे.

२०१२ टी२० विश्वचषक विजयाचा नायक

वेस्ट इंडीजने जिंकलेल्या, २०१२ च्या टी२० विश्वचषकातील नायकांपैकी तो एक होता. संपूर्ण स्पर्धेत त्याने, सात सामन्यात ९ बळी मिळवलेले. वेस्ट इंडीजसाठी तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. अंतिम सामन्यात त्याने, श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान याला बाद करताना टाकलेला चेंडू ‘बॉल ऑफ द इयर’ म्हणून ठरविण्यात आला होता. वेगवान गोलंदाज असला तरी, रामपॉल शांत स्वभावाचा खेळाडू होता. संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याशी अवघे दोन वाद जोडले गेले. ईशांत शर्माला टाकलेला बाऊंसर चेंडू वाईड दिला म्हणून, त्याने पंचांना काही प्रश्न विचारल्याने, त्याला दंड ठोठावण्यात आला होता. सचिन तेंडुलकरला शंभरावे शतक करण्यासाठी एक शतक हवे असताना, त्याने सचिनला ९४ धावांवर बाद केले. त्यानंतर, वानखेडे स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी त्याला अर्वाच्च शिवीगाळ केली. त्या, शिवीगाळीलादेखील त्याने “मित्रांनो, हेच आयुष्य आहे.” असे सभ्य भाषेत उत्तर दिले होते. रामपॉल २०१३ व २०१४ अशी दोन वर्षे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळला.

दुखापतीने अकाली संपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द

रामपॉल आपल्या कारकिर्दीच्या महत्वाच्या टप्प्यावर असतानाच, पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला.२०१५ मध्ये त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर झाला.

रामपॉलने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. पण, दुखापतीतून सावरून आल्यानंतर २००७ पासून त्याची क्रिकेट कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. २००७ पूर्वी १७ वनडे खेळताना तो फक्त ११ बळी मिळवू शकला होता. २००७ मध्ये पुनरागमना नंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडताना, त्याची आकडेवारी होती १८ कसोटीत ४९ बळी, ९२ वनडेत ११७ बळी. तसेच, रामपॉलने २३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २९ बळी आपल्या नावे केले आहेत.

बहुतांशी वेगवान गोलंदाज ज्यावेळी आपली कारकीर्द सुरू करतात, त्यावेळी त्यांचा वेग अधिक असतो व नंतर तो मंदावतो. मात्र, रामपॉल याला अपवाद होता. २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करताना त्याचा वेग १३० किमी/प्रतितास होता. हाच वेग २०११ मध्ये १४५ किमी/प्रतितास इतका वाढला. सततच्या दुखापती झाल्या नसत्या तर, रवी रामपॉल २००० नंतरच्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला असता.

वाचा- गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---