---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दिवशी भारताची फलंदाजी गडगडली; पण रहाणेची एकाकी झूंज

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2020 10:30 AM
---Advertisement---

वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिला दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे 55 षटकांनंतर थांबवण्यात आला आहे. यावेळी भारताने पहिल्या डावात पहिल्या दिवसाखेर 5 बाद 122 धावा केल्या आहेत.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र आज कसोटीमध्ये जवळजवळ दिडवर्षांनी पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ चांगल्या सुरुवातीनंतरही 2 चौकार मारत 16 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथीने त्याला त्रिफळाचीत केले.

यानंतर सलामीवीर मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू पुजारा 11 धावांवर आज कसोटी पदार्पण केलेल्या काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच्यापाठोपाठ लगेचच भारताचा कर्णधार विराट कोहलीही 2 धावांवर जेमिसनच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 40 धावांवर 3 विकेट्स अशी होती.

पण यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अगरवालने डाव सांभाळताना चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. पण दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर अगरवाल 34 धावांवर झेलबाद झाल्याने ही जोडी तुटली. त्याच्या पाठोपाठ काही वेळात हनुमा विहारीही 7 धावांवर बाद झाला.

एकीकडे भारताच्या विकेट्स जात असताना रहाणेने आज किल्ला लढवला. तो पहिल्या दिवसाखेर 122 चेंडूत 38 धावांवर नाबाद आहे. तर त्याच्याबरोबर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत 10 धावांवर फलंदाजी करत आहे.

आज पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर टिम साऊथी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

https://twitter.com/Maha_Sports/status/1230704727555375104

https://twitter.com/Maha_Sports/status/1230691312933883905

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---