मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे अनेक मैदानांना बंद करावे लागले. क्रिकेटपटू गेल्या तीन महिन्यांपासून सराव करता आला नाही. काही क्रिकेटपटू सरावाची संधी शोधत आहेत. याच दरम्यान, भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना सरावाची संधी मिळाली आणि त्यांनी संपूर्ण जगाला ‘बॅटिंगचा क्लास’ दाखवला.
भारताच्या या माजी कर्णधाराने गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात ते राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर फलंदाजीचा सराव करत होते. व्हिडिओत ते फ्लिक्स शॉट खेळताना दिसून आले ज्यासाठी ते खूप प्रसिद्ध होते. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ”नॉक नॉक. . .! जुन्या दिवसासारखं योग्य टायमिंग साधत आहे.” तसेच त्यांनी कव्हर ड्राईव्हचा शॉट देखील खेळला. यासोबतच स्टेप आऊट करून एक फटकाही मारला.
मोहम्मद अझरुद्दीन यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी विचार केला तर ते भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक होते. त्यांच्यासारखी फिरकी आणि वेगवान गोलंदाजी तंत्रशुद्ध पद्धतीने खेळण्याची कला भारतात कुणाकडेच नव्हती. बॅकफूटवर त्यांनी मारलेले फटके आजही क्रिकेटपटूंना वेडे करतात. कोणत्याही गियरमध्ये फलंदाजी करण्याची क्षमता असणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपला शेवटचा सामना 2000 साली खेळला होता.
https://www.instagram.com/p/CBA7DLbANLd/
मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्याने बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन प्रतिबंध लावले. त्यामुळे त्याचे क्रिकेट करिअर संपले. अझरुद्दीन सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. भारताकडून त्यांनी 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय सामने खेळले. ज्यात त्यांनी अनुक्रमे 6215 आणि 9378 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमधून 9 तर कसोटीमध्ये 22 शतके ठोकली. मोहम्मद अझरुद्दीन एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होते. चित्त्याच्या चपळाई प्रमाणे ते चेंडू अडवायचे. स्लिपमध्ये थांबून अनेक अफलातून झेलही घेतले.