आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग बंद दाराआड आणि विनाप्रेक्षक पार पडेल. आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेला चेन्नई सुपर किंग्स यावर्षी मागील हंगामातील कामगिरी विसरून पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्यास आतुर असेल.
गत हंगामात चेन्नईने स्पर्धेच्या इतिहासातील आपली सर्वात खराब कामगिरी केली होती. ते प्रथमच प्ले ऑफपर्यत मजल मारू शकले नव्हते. यावर्षी सीएसकेने आपल्या संघात मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा यासारख्या खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे चेन्नईला मागील वर्षीपेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
आज आपण आगामी हंगामात चेन्नईसाठी सर्वाधिक धावा बनवू शकणाऱ्या तीन फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
रॉबीन उथप्पा
आयपीएल लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला ट्रेड केले होते. उथप्पाही एमएस धोनीच्या नेतृत्वात पुन्हा खेळण्यास उत्सुक आहे आणि संघासाठी सलामीवीर म्हणून खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. उथप्पा नुकताच खेळलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने काही चमकदार खेळल्या केल्या. उथप्पा हा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू आहे आणि जर त्याला चेन्नईकडून वरच्या फळीत खेळण्याची संधी मिळाली तर तो या संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनू शकतो.
सुरेश रैना
मिस्टर आयपीएल या नावाने प्रसिद्ध असणारा सुरेश रैना हा आयपीएलचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व मोसमात रैनाने नेहमीच ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. रैना मागील आयपीएलमध्ये वैयक्तिक कारणास्तव खेळला नव्हता, परंतु या मोसमात तो चेन्नई संघाचा सदस्य असेल. रैना यावर्षी आयपीएलचे सर्व सामने खेळणार आहे. तो या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनू शकेल.
ऋतुराज गायकवाड
संघासाठी मागील आयपीएल हंगाम निराशाजनक राहिला होता. मात्र, संघासाठी सर्वात सकारात्मक बाब म्हणजे ऋतुराज गायकवाड. महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या ऋतुराजने या हंगामात एकूण सहा सामने खेळले. त्यातील पहिल्या तीन सामन्यात त्याला दारुण अपयश आले. मात्र, अखेरच्या तीन सामन्यात त्याने तीन अर्धशतके ठोकत, कौतुक वसूल केले होते. यावर्षी देखील त्याचा तसाच फॉर्म राहिल्यास तो चेन्नईसाठी सर्वाधिक धावा बनवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा बनवणारे फलंदाज
“असे खूप भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना विदेशी फ्रँचायझी टी२० लीगमध्ये खेळायचे आहे”, या दिग्गजाचा दावा
डेव्हिड वॉर्नरला पडला प्रश्न, क्वारंटाईनमध्ये काय करावे? रोहित शर्माने दिले ‘भन्नाट’ उत्तर