इतर संघांसह भारतीय क्रिकेट संघाचीही नजर आगामी टी२० विश्वचषक २०२२ वर आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या आयसीसी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापन सातत्याने नवीन खेळाडूंना संधी देत आहे. यामुळे भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना त्यांचे स्थान टिकवून ठेवणे अवघड झाले आहे. याबरोबरच वाढते वय, सातत्याने होणाऱ्या दुखापती आणि फिटनेश अशा कारणांमुळेही भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू आगामी टी२० विश्वचषक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटला अलविदा करू शकतात. अशाच काही क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
मोहम्मद शमी
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान मोहम्मद शमीला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळून जवळपास एक वर्ष व्हायला आले आहे. तो २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघातून बाहेर आहे. यादरम्यान त्याने आयपीएल २०२२ मध्ये शानदार प्रदर्शन करत गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीही त्याचे राष्ट्रीय टी२० संघात पुनरागमन होऊ शकले नाही.
शमीने आतापर्यंत भारताकडून केवळ १७ टी२० सामने खेळले असून यादरम्यान १८ विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. परंतु टी२० संघातील आपले स्थान अद्याप तो पक्के करू शकला नाही. त्यामुळे आगामी टी२० विश्वचषकानंतर तो या स्वरूपाला रामराम ठोकू शकतो.
शिखर धवन
भारतीय क्रिकेट संघाचा धाकड फलंदाज शिखर धवन याचेही नाव आगामी टी२० विश्वचषक २०२२ नंतर या स्वरूपातून निवृत्त होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत येते. त्याने आपल्या विस्फोटक खेळीने भारतीय संघात सलामीचे स्थान निश्चित केले आहे. परंतु त्याला गेल्या काही वर्षांपासून कसोटी आणि टी२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कसोटी स्वरूपात २०१८ पासून त्याला जागा मिळालेली नाही. तर टी२० संघातून तो वर्षभरापासून बाहेर आहे.
टी२० क्रिकेटसारख्या ताबडतोब स्वरूपात धवनच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित होत असतात. त्याने आतापर्यंत फक्त ६८ टी२० सामने खेळले असून यादरम्यान २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा काढल्या आहेत. मात्र आता केएल राहुल, इशान किशन यांच्यामुळे धवनला टी२० संघात जागा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे तो आगामी टी२० विश्वचषकानंतर या स्वरूपातून निवृत्त होण्याचा निर्णय घेऊ शकतो.
आर अश्विन
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनदेखील नोव्हेंबर २०२१ पासून भारताच्या टी२० संघातून बाहेर आहे. त्याने २०१० मध्ये टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र तेव्हापासून त्याला फक्त ५१ टी२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान तो फक्त ६१ विकेट्स घेऊ शकला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून टी२० संघातून बाहेर असलेला अश्विन आगामी टी२० विश्वचषकानंतर निवृत्त होण्याचा विचार करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, ते ‘या’ पाच भारतीयांनी केलं, विक्रम आजही अबाधित
मँचेस्टर वनडेत ‘रोहितसेने’ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत
निर्णायक सामन्याची वेळ बदलली, वाचा कधी सुरू होणार इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे