नवी दिल्ली । क्रिकेट जगतात आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच आपल्या संघाकडून दीर्घ काळापर्यंत खेळत राहणेही महत्त्वाचे आहे. जर, कोणताही खेळाडू आपल्या संघाकडून खूप काळ सातत्याने प्रत्येक सामन्याचा भाग बनत असेल, तर त्याचा अर्थ असा की त्या खेळाडूने आपल्या खेळात चांगली मेहनत घेत उत्तम कामगिरी केली आहे. खेळाडूच्या कामगिरीवरच त्या संघाचे यश अवलंबून असते.
परंतु जर अशा खेळाडूंची संख्या जर एक ऐवजी २ झाली, तर संघ आणखी चांगली कामगिरी करतो. कसोटी क्रिकेटमध्ये खूप सारे दिग्गज खेळाडूंच्या जोड्या राहिल्या आहेत. ज्यांचे नाव सातत्याने प्रत्येक कसोटी सामन्यात अव्वल स्थानी घेतले जात होते. क्रिकेट इतिहासात १७ जोड्या अशा राहिल्या आहेत, ज्यांनी एकसोबत संघात १०० पेक्षाही अधिक कसोटी सामन्यांचा निकाल आपसात शेअर केला आहे. अशाच एकत्र सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या अव्वल ५ जोड्यांबद्दल या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
१. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड –
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने एकत्र खेळण्याचा विक्रम भारतीय संघाच्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ‘द वॉल’ राहुल द्रविड (Rahul Dravid) या दिग्गज जोडीच्या नावावर आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यात १५,९२१ धावा केल्या आहेत, तर द्रविडने १६४ कसोटी सामन्यात १३,२८८ धावा केल्या आहेत. त्यांनी १९९६ ते २०१२ पर्यंत भारतीय संघाकडून खेळताना १४६ कसोटी सामने एकत्र खेळले आहेत. त्यात १४३ डावांमध्ये त्यांनी मिळून संघासाठी ५०.५१ च्या सरासरीने ६,९२० धावा केल्या आहेत. त्यामध्ये २० शतकी भागीदारींचा समावेश आहे.
२. जॅक कॅलिस आणि मार्क बाऊचर
एकत्र सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या जोड्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि यष्टीरक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) या खेळाडूंची जोडी आहे. या दोघांनीही १९९८ ते २०१२ दरम्यान एकत्र १३६ कसोटी सामने खेळले आहेत. तरीही या दरम्यान त्यांनी एकसोबत केवळ ३२ डावांमध्ये फलंदाजी केली आहे. कॅलिसने १३६ कसोटीत २६५ विकेट घेण्याव्यतिरिक्त १६९ झेलही घेतले आहेत. तसेच, त्याने ११,२५२ धावादेखील केल्या आहेत. बाऊचरनेही १३६ कसोटी सामन्यात ४,९७० धावा केल्या आहेत. तसेच, ५१७ झेल घेतले आहेत.
३. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण
राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणमध्ये (VVS Laxman) २००१ च्या कोलकाता कसोटीची ऐतिहासिक भागीदारी तर सर्वांनाच लक्षात असेल. परंतु या जोडीने या एका कसोटी सामन्यातच नव्हे, तर १९९६ ते २०१२ दरम्यान १३२ कसोटी सामन्यात एकत्र भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये त्यांनी ८६ डावांमध्ये एकत्र फलंदाजी करताना भागीदारीमध्ये ५१.४५ च्या सरासरीने ४०६५ धावा केल्या. त्यामध्ये १२ शतकी भागीदारींचा समावेश आहे. त्या दोघांनी एकत्र खेळलेल्या १३२ सामन्यात लक्ष्मणने ८,५२९ धावा आणि द्रविडने १०,६०७ धावांचे योगदान संघाच्या खात्यात दिले होते.
ऍलिस्टर कूक आणि जेम्स अँँडरसन
कसोटी क्रिकेटच्या जोड्या पाहिल्या, तर त्यामध्ये इंग्लंडचा महान फलंदाज ऍलिस्टर कूक (Alastair Cook) आणि दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) या जोडीचेही चमकदार योगदान राहिले आहे. या जोडीने २००६ ते २०१८ दरम्यान १३० कसोटी सामने एकत्र खेळले आहेत. कूकने त्याच्या कारकिर्दीत १६१ कसोटी सामन्यात १२४७२ धावा केल्या. तर अँडरसनने १५१ कसोटीत ५८४ विकेट्स घेतल्या आहेत.
माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा
श्रीलंकेच्या कसोटी क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakkara) यांचे योगदानाबद्दल नेहमी चर्चा होते. या दोघांनीही २००० ते २०१४ दरम्यान श्रीलंकेकडून १२६ कसोटी एकत्र खेळले आहेत. त्यात त्या दोघांनीही एकत्र १२० डावांमध्ये भागीदारी करत ५६.५० च्या सरासरीने ६,५५४ धावा जोडल्या. त्यात १९ शतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी एकत्र खेळलेल्या १२६ कसोटीमध्ये जयवर्धनेने १०,३७२ धावा, संगकाराने ११,५३७ धावांचे संघासाठी योगदान दिले आहे.
वाचनीय लेख-
-होय आम्ही भूत पाहिले! भूत पाहिल्याचा दावा करणारे जगातील ५ क्रिकेटर्स
-आठवणीतील बॅट- ५ भारतीय क्रिकेटपटूंच्या बॅट व त्यावरील खास स्टिकर्स
-२०२०मध्ये या क्रिकेटर्सच्या कामगिरीवर जगातील सर्वांचेच असेल लक्ष