कोलकाता। भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) रोजी खेळायचा आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत सध्या भारतीय संघ २-० अशा फरकाने विजयी आघाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळून न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे, तर न्यूझीलंड क्रिकेट संघ आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
त्याचबरोबर या सामन्यादरम्यान काही खास विक्रम करण्याची भारताचा कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुलसह काही खेळाडूंकडे संधी असणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी२० सामन्यांत होऊ शकतात हे विक्रम
रोहितला विश्वविक्रमाची संधी
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत २९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याच्या ४ शतकांचा आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. तो सध्या सर्वाधिकवेळा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. विराटनेही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
त्यामुळे रविवारी न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने ५० धावांचा टप्पा ओलांडला, तर तो या यादीत विराटला मागे टाकू शकतो आणि हा विश्वविक्रम आपल्या नावावर करु शकतो.
रोहित करु शकतो १५० षटकारांचा विक्रम
रोहित शर्माने रविवारी ३ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारल्यास तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५० षटकारांचा टप्पा पूर्ण करेल. तसेच असा कारनामा करणारा तो जगातील दुसराच खेळाडू ठरेल. यापूर्वी केवळ न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टीलला हा विक्रम करता आलेला आहे. सध्या रोहितच्या नावाववर ११८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १४७ षटकार आहे. तसेच गप्टीलने १११ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १६१ षटकार मारले आहेत.
युजवेंद्र चहलकडे बुमराहला मागे टाकण्याची संधी
रविवारी जर युजवेंद्र चहलला भारताकडून अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली, तर त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याची संधी असणार आहे.
चहलने या सामन्यात जर ४ विकेट्स घेतल्या, तर तो हा विक्रम आपल्या नावावर करु शकतो, तसेच जसप्रीत बुमराहला मागे टाकू शकतो. सध्या हा विक्रम बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५५ सामन्यांमध्ये ६६ विकेट्स घेतल्या आहेत. चहलच्या नावावर सध्या ४९ सामन्यांत ६३ विकेट्स आहेत. याबरोबरच चहलसाठी हा ५० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना ठरेल.
केएल राहुलला ५०० चौकारांची संधी
भारताचा उपकर्णधार केएल राहुलने रविवारी २ किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारल्यास तो त्याच्या टी२० कारकिर्दीत ५०० चौकारांचा टप्पा ओलांडू शकतो. सध्या त्याच्या नावावर १७२ टी२० सामन्यांत ४९८ चौकार आहेत. यापूर्वी टी२० क्रिकेटमध्ये ५६ खेळाडूंनी ५०० पेक्षा अधिक चौकार मारले आहेत.
पंत, अय्यरला ५० चौकारांची संधी
रविवारी रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने प्रत्येकी ६ किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारल्यास ते आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० चौकार पूर्ण करू शकतात. सध्या दोघांच्याही नावावर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी ४४ चौकारांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvsNZ: कधी, कुठे आणि कसा पाहाणार तिसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर