टी२० विश्वचषक २०२१ ची अंतिम फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. आता त्यांना विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
यंदा पुन्हा एकदा नवीन संघ टी२० विश्वचषक जिंकणार आहे. या स्पर्धेचा इतिहासही असाच आहे. वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे, ज्याने दोनदा टी२० विश्वचषक जिंकला आहे. २०१६ वगळता, दरवेळी नवीन संघाने टी२० विश्वचषक जिंकला आहे. या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला पराभवास सामोरे का जावे लागले याची पाच कारणे आपण पाहणार आहोत.
१. नाणेफेक जिंकणे गरजेचे
दुबईच्या मैदानात नाणेफेकीचे महत्त्व खूप जास्त आहे. विशेषत: संध्याकाळच्या सामन्यात नाणेफेक गमावणारा सामन्यात आधीच मागे पडताना दिसला आहे. पाकिस्तानच्या बाबतीतही तेच झालं. बाबरने नाणेफेक गमावल्याने खेळाडूंचे मनोबल खचले. यासोबतच चांगली धावसंख्या करूनही गोलंदाजी करताना गोलंदाजांना त्रास झाला. सुरुवातीला चांगली गोलंदाजी करणारा शाहीन आफ्रिदी नंतर चांगलाच महागात पडला. त्याच्यासोबत हसन अली आणि हरीश रौफ यांनीही बऱ्यापैकी धावा दिल्या आणि ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत १७७ धावांचे लक्ष्य गाठले.
२. शेवटच्या षटकात खराब गोलंदाजी
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये खराब गोलंदाजी करत केवळ तीन षटकांत ५० धावा दिल्या. या दरम्यान कोणत्याही अतिरिक्त गोलंदाज किंवा फिरकीपटूने गोलंदाजी केली असे नाही. या तीन षटकांमध्ये हसन अली, हरीश रौफ आणि शाहीन आफ्रिदी या प्रमुख गोलंदाजांनी मिळून १८ चेंडूत ५० धावा दिल्या. शाहीनने आपल्या शेवटच्या षटकात २२ धावा दिल्या.
३. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका
या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी अनेक चांगले झेलही घेतले, मात्र महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना विकेट घेता आली नाही. पाकिस्तानकडे धावबाद करण्याच्या अनेक संधी होत्या, पण ऑस्ट्रेलियाचा एकही खेळाडू धावबाद झाला नाही. पाकिस्तानने धावबादच्या एकूण तीन संधी गमावल्या. यापैकी दोनदा ते मॅथ्यू वेडला बाद करू शकले असते आणि एकदा डेव्हिड वॉर्नरची विकेट घेऊ शकले असते. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
शाहीनच्या शेवटच्या षटकात तीन षटकार मारण्यापूर्वीच वेडने झेल दिला होता, पण पाकिस्तानकडून हसन अलीने तोही झेल सोडला होता. तीन जीवदान मिळाल्यानंतर वेडने सलग तीन षटकार मारून सामना संपवला.
४. दुसऱ्या फिरकीपटूची कमी
या सामन्यात पाकिस्तानच्या शादाब खानने चार विकेट घेतल्या, मात्र त्याच्याशिवाय दुसरा कोणताही गोलंदाज काही विशेष करू शकला नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहज धावा करतात आणि त्यांना फिरकी खेळणे कठीण जाते. या सामन्यातही ते स्पष्टपणे दिसून आले, पण पाकिस्तानकडे दुसरा चांगला फिरकी गोलंदाज नव्हता. या सामन्यात इमाद वसीम आणि हाफिजनेही गोलंदाजी केली, पण इमादने चेंडू वळवण्याचा चांगला प्रयत्न केला नाही. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाने ९६ धावांत पाच विकेट गमावल्यानंतरही पाकिस्तानच्या गोलंदाजांना वर्चस्व राखता आले नाही, आणि फॉर्ममध्ये नसलेल्या वेडने पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर फेकले.
५. हसन अलीवर निर्भर राहणे पडले महागात
पाकिस्तान संघाने, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने केलेल्या चुकीचीच पुनरावृत्ती केली. या विश्वचषकातील एकाही सामन्यात हसन अलीने पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी केली नाही. तो त्याच्या लयीतही दिसत नव्हता. त्याने भारताविरुद्ध खूप धावा खर्च केल्या होत्या आणि बाकीच्या सामन्यांमध्येही तेच झाले. असे असतानाही त्याला प्रत्येक सामन्यात संधी देण्यात आली आणि मोठे नाव असल्याने त्याला संघातून वगळण्याचे धाडस बाबरने केले नाही. या सामन्यातही हसन अलीने भरपूर धावा देत संघावर दबाव वाढला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पोहचला जयपूरमध्ये, टीम इंडियाचे ‘हे’ खेळाडूही ‘पिंकसिटी’मध्ये दाखल
संघाचे नेतृत्व करायची इच्छा असली तरी ‘या’ तीन भारतीय दिग्गजांना कर्णधारपद मिळण्याची शक्यता कमीच