रणजी ट्रॉफी २०२१-२०२२ हंगामातील साखळी सामने आयोजित करण्यात आले आहेत. आता या प्रथमश्रेणी स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने आयपीएल २०२२ पूर्वी आयोजित केले जातील. तर उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामना आयपीएल २०२२ च्या समाप्तीनंतर आयोजित केले जातील. आता कोणत्या संघांनी नॉक-आउट फेरीत मजल मारली आहे याबद्दल जाणून घेऊया.
अहमदाबाद येथे एलिट ग्रुप डी सामन्यात ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी पराभव करून मुंबईने २०१७-२०१८ नंतर प्रथमच रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयाचा हिरो ठरला सर्फराज खान, ज्याने सर्वाधिक १६५ धावा केल्या. त्याला सामनावीराचा किताब मिळाला. या सामन्यात अरमान जाफरनेही शतक झळकावले. तर शम्स मुलानीने या सामन्यात ७ विकेट घेतल्या. मुलानीने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या आणि हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.
एलिट ग्रुप एच मध्ये झारखंडने तामिळनाडूचा दोन गडी राखून पराभव केल्याने तामिळनाडू या मोसमाच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. दिल्ली आणि चंदीगड यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. अशा स्थितीत झारखंडने एच गटात अव्वल स्थान पटकावले असून, आता उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हा संघ प्लेट गटातील नागालँडच्या अव्वल संघाशी भिडणार आहे.
चेन्नई येथे झालेल्या एलिट ग्रुप सी सामन्यात कर्नाटक संघाने पुद्दुचेरीचा एक डाव आणि २० धावांनी पराभव केला. देवदत्त पडिक्कलच्या १७८ धावा आणि कर्णधार मनीष पांडेच्या शतकाच्या जोरावर कर्नाटक संघाने पहिल्या डावात आठ गड्यांच्या मोबदल्यात ४५३ धावा केल्या होत्या. त्याचवेळी आंध्र प्रदेशविरुद्धचा सामना हरल्यानंतरही उत्तराखंडने बाद फेरीत प्रवेश केला. मध्य प्रदेश आणि केरळ यांच्यातील सामना अनिर्णीत संपला. परंतु, चांगल्या धावगतीमूळे मध्य प्रदेशने अव्वल आठमध्ये स्थान निश्चित केले.
नागालँडने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर मिझोरामचा पराभव करून प्लेट गटात पहिले स्थान मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एलिट ग्रुप एफमध्ये पंजाबने त्रिपुराविरुद्ध ६ गडी राखून विजय नोंदवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी बंगाल संघाने एलिट गट बी मधील सलग तिसऱ्या सामन्यात चंदीगडचा १५२ धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
रणजी ट्रॉफी २०२१-२०२२ च्या नॉक आउट फेरीसाठी पात्र ठरलेले संघ-
मध्य प्रदेश, बंगाल, कर्नाटक, मुंबई, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड.
महत्वाच्या बातम्या-