ऑस्ट्रेलियामध्ये पुरूषांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामनेही खेळला. या आठव्या टी20 विश्वचषकासाठी नुकतेच बीसीसीआयने जसप्रीत बुमराच्या जागी मोहम्मद शमी याची निवड केली आहे. त्याचा हा तिसरा टी20 विश्वचषक असणार आहे. तर भारत तब्बल 15 वर्षानंतर टी20 विश्वचषक जिंकण्यास उत्सुक असताना संघामध्ये अनेक नवे चेहरे दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वाधिक टी20 विश्वचषक खेळले आहेत.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारताकडून सर्वाधिक टी20 विश्वचषक खेळले आहेत. त्याचा 2007 पासून प्रत्येक विश्वचषकाच्या संघात समावेश राहिला आहे. त्याच्याबरोबर विराट कोहली (Virat Kohli) आणि आर अश्विन यांनीही प्रत्येकी चार-चार वेळा टी20 विश्वचषक खेळला आहे. यामुळे या दोघांचा हा पाचवा टी20 विश्वचषक असणार आहे.
रोहितने 33 टी20 विश्वचषकाच्या सामन्यात 847 धावा केल्या आहेत. यामुळे तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 21 टी20 विश्वचषकाच्या सामन्यात 845 धावा केल्या असून तो पाचव्या स्थानावर आहे. 2012चा विश्वचषक त्याचा पहिला विश्वचषक होता. तसेच त्याने 2021च्या पर्वात संघाचे नेतृत्वही केले होते.
अश्विनचा देखील 2012चा पहिला टी20 विश्वचषक होता. त्याने नंतर 2014, 2016 आणि 2021 या विश्वचषकांचा भाग राहिला आहे. तो मोठ्या काळानंतर भारताच्या टी20 संघात परतला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवण्यास तो उत्सुक आहे.
विकेटकीपर आणि सध्याचा फिनिशर दिनेश कार्तिक हा 2007च्या पहिल्या टी20 विश्वचषकाच्या संघात होता. त्यानंतर त्याला 2009 आणि 2010च्या पर्वातही संघात निवडले होते. आता तो तब्बल 12 वर्षानंतर टी20 विश्वचषक खेळण्यास सज्ज आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक खेळणार आहे. याआधी तो 2014 आणि 2021मध्ये संघाचा सदस्य राहिला आहे. तो मागील काही सामन्यांमध्ये आऊट ऑफ फॉर्म राहिला असल्याने त्याच्यावर ऑस्ट्रेलियात दबाव असणार आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्या 2016 आणि 2021मध्ये टी20 विश्वचषक खेळला आहे. मागील वर्षी त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्या स्पर्धेनंतर त्याला संघाबाहेर केले होते. आता त्याने शानदार पुनरागमन करत संघात आपले स्थान कायम केले आहे.
भारताचा उपकर्णधार केएल राहुल दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक खेळणार आहे. तो 2021च्या टी20 विश्वचषकात खेळला होता. त्यामध्ये त्याने भारताकडून सर्वाधिक 5 सामन्यात 194 धावा केल्या होत्या. त्याने 66 आतंरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 39.57च्या सरासरीने 2137 धावा केल्या आहेत.
यंदाच्या टी20 विश्वचषकात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहे. कारण तो सध्या भलताच फॉर्ममध्ये असून कारकिर्दीतील दुसरा टी20 विश्वचषक खेळण्यास सज्ज आहे. त्याने 2021च्या विश्वचषकात खेळताना खास कामगिरी केली नव्हती.
विकेटकीपर रिषभ पंत याने 2021च्या दौऱ्यात कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाची मैदाने गाजवली आहेत. यामुळे तो पुन्हा एकदा तशी कामगिरी करण्यास तयार आहे.तसेच त्याचा हा दुसरा टी20 विश्वचषख असून त्याने 2021चा विश्वचषक खेळला आहे.
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल पहिल्यांदाचा टी20 विश्वचषक खेळणार आहे. त्याच्याबरोबरच दीपक हुड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग हे पण पहिल्यांदाचा टी20 विश्वचषक खेळणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत दाखवून दिला आपला दम, ‘कॅप्टन’ बटलर मालिकावीर
पुजाराचा स्ट्राईक रेट पाहून तुम्ही म्हणाल, “अरे हा तर टी20 स्पेशालिस्ट”; खेळलीये धमाकेदार खेळी
बाबो! भारत अन् पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड बनला चाहत्यांचा आवडता सामना, सर्व तिकिटांची विक्री