आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग समजली जाते आणि याचे मुख्य कारण काय असेल तर, या लीगमध्ये खेळाडूंनी ठोकलेले गगनचुंबी षटकार. परंतु या टी-20 लीगमध्ये असे काही खेळाडू झाले आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. तर आज आम्ही तुम्हाला त्या 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला आहे.
1. केवन कूपर
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू केवन कूपरने राजस्थान रॉयल्स संघाकडून किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 6 एप्रिल 2012 रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला फक्त 3 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये त्याने नाबाद 11 धावा केल्या.
त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच चेंडू षटकारसाठी पाठवला होता. तसेच त्याने या सामन्यात शानदार गोलंदाजीही करताना 4 षटकांत केवळ 26 धावा देऊन एकूण 4 बळी घेतले होते. या चमकदार पदार्पणासाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले होते.
2. सिद्धेश लाड
10 एप्रिल 2019 रोजी मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या सिद्धेश लाड या खेळाडूनेही पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आयपीएलमध्ये आपले खाते उघडले. त्याने हा षटकार पंजाब किंग्जचा गोलंदाज अंकित राजपूत याच्या चेंडूवर लावला. या सामन्यात त्याने 13 चेंडूत 15 धावा केल्या होत्या.
नंतर त्याला मोहम्मद शमीने बोल्ड केले. या सामन्यात दुखापतग्रस्त असलेल्या रोहित शर्माच्या जागी त्याला संधी मिळाली होती. परंतु या सामन्यानंतर त्याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करतताना 197 धावा कुटल्या. हे लक्ष्य मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटच्या चेंडूवरती 3 गडी राखून पार केले.
3. जेवन सिर्ल्स
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जेवन सिर्ल्सने इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर 12 मे 2018 कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला केवळ 1 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्यातही हा चेंडू त्याने षटकारासाठी लावला.
सिर्ल्सने आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळताना त्यामध्ये त्याने 8 धावा केल्या आहेत. तसेच 2 बळीही घेतले आहेत. आयपीएल 2018 च्या सत्रात तो खास कामगिरी करू न शकल्यामुळे केकेआरने त्याला सोडले आणि त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे ३ भारतीय, रोहित नव्हे ‘हा’ धुरंधर अव्वलस्थानी
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, बघा रोहित-धोनीसोबत आहे कोणाचे नाव