भारत आणि इंग्लंड यांच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे वनडे मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने संपले असून उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे अद्याप वनडे मालिका १-१ ने बरोबरीवर आहे. रविवारी (२८ मार्च) या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे. हा सामना जिंकत वनडे मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघाचा हेतू असणार आहे.
आतापर्यंत झालेल्या पहिल्या २ वनडे सामन्यात भारत आणि इंग्लंड संघातील काही खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले आहे. त्यांच्या कामगिरीला पाहता ते खेळाडू ‘मॅन ऑफ द सीरिज’ अर्थात ‘मालिकावीर’ पुरस्काराचे प्रबळ दावेदार दिसत आहेत.
या लेखात आम्ही त्याच काही निवडक खेळाडूंचा आढावा घेतला आहे, जे भारत-इंग्लंड वनडे मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावू शकतात.
१. जॉनी बेयरस्टो
इंग्लंडचा धाकड सलामीवीर जॉनी बेयरस्टो याच्यासाठी ही वनडे मालिका खूप शानदार राहिली आहे. पहिल्या सामन्यात डावाची सुरुवात करताना त्याने शतक अवघ्या ६ धावांनी हुकले होते. ६६ चेंडूत ७ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ९४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याने ११२ चेंडूत १२४ धावांची अफलातून खेळी केली होती. यात त्याच्या ७ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता.
अर्थात बेयरस्टोने भारत-इंग्लंज वनडे मालिकेत आतापर्यंत २१८ धावा केल्या आहेत. अशात जर त्याने तिसऱ्या सामन्यातही मोठी आकडी धावसंख्या उभारली, तर तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज करेल. सोबतच मालिकावीर पुरस्कारावरही आपले नाव कोरेल.
२. केएल राहुल
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल नुकताच चांगल्या फॉर्ममध्ये परतला आहे. पहिल्या वनडे सामन्यात त्याने नाबाद ६२ धावांची अतिशय महत्त्वपुर्ण खेळी केली होती. ४३ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि चौकार मारत त्याने या धावा केल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात तर त्याने शतक झळकावले होते. ११४ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने १०८ धावा केल्या होत्या.
अर्थात राहुलने १ शतक आणि अर्धशतक करत एकूण १७० धावा केल्या आहेत. जर तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यातही त्याने धावांची बरसात केली, तर तो निश्चितच मालिकावीर ठरू शकतो.
३. बेन स्टोक्स
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्यासाठी ही वनडे मालिका खूप खास राहिली आहे. त्याने आतापर्यंतच्या २ सामन्याच फलंदाजी आणि गोरंदाजी दोन्हीतही चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या वनडे सामन्यात त्याने ३ विकेट्स चटकावल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात त्याचे शतक केवळ एका धावेने हुकले होते. जर तिसऱ्या वनडे सामन्यातही त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रशंसनीय कामगिरी केली, तर तो मालिकावीर पुरस्काराचा हक्कदार ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला मालिका हॅट्रिकची संधी, तिसऱ्या वनडेत ‘या’ शिलेदारांना उतरवणार सलामीला
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!
INDvENG: सॅम करन आणि हार्दिक पंड्याच्या शाब्दिक बाचाबाची मागे ‘हे’ आहे कारण?