---Advertisement---

बलाढ्य चेन्नईवर मात करण्यात ‘या’ खेळाडूंनी उचलला खारीचा वाटा; पाहा दिल्लीच्या विजयाचे नायक

On: रविवार, एप्रिल 11, 2021 10:23 AM
---Advertisement---

शनिवार (10 एप्रिल) रोजी आयपीएल २०२१ च्या ‘गुरू आणि शिष्या’च्या सामन्यात शिष्याने गुरूवरती विजय मिळवला. म्हणजेच युवा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुभवी कर्णधार एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर सात गडी राखून विजय मिळविला.

कौतुकास्पद बाब म्हणजे दिल्ली संघातील काही नामांकित खेळाडू या सामन्याला मुकले असतानाही संघाने हा सामना जिंकला. ज्यामध्ये गेल्या मोसमात मिळून 52 बळी घेणारे कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए क्वारंटाईन असल्याने या सामन्यात सहभागी नव्हते. तसेच अक्षर पटेललाही कोरोनाची लागण झाल्याने क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ज्याप्रकारे दिल्लीकरांनी दमदार कामगिरी करत हंगामाची विजयी सुरुवात केली आहे.

दिल्लीच्या चेन्नईविरुद्ध झालेल्या विजयात काही खेळाडूंनी खारीचा वाटा उचलला. तर आज आपण आयपीएल 2021 मध्ये दिल्लीला विजयाची सुरुवात देणार्‍या 3 खेळाडूंबद्दल पाहूया.

आवेश खान –
आयपीएल 2021 सत्रातील प्रत्येक सामन्यात कोणी-ना-कोणी चमकदार कामगिरी करत असते. त्यामध्ये आयपीएलच्या 14 व्या सत्रातील सलामी सामन्यात हर्षल पटेलने गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली तर सत्रातील दुसऱ्या दिवसाची चमकदार कामगिरी आवेश खान याने केली. संघातील प्रमुख गोलंदाज नसल्याने दिल्ली संघात स्थान मिळवलेल्या आवेश खानने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.

आयपीएल 2020 मध्ये चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला त्याने खातेही न उघडता पायचित केले. तर डावाच्या शेवटी फलंदाजीला आलेल्या धोनीला त्याने भोपळाही न फोडता त्रिफळा उडवून तंबूत धाडले. हा बळी त्याला बर्‍याच काळासाठी लक्षात राहणार आहे. 4 षटकांमध्ये 6 पेक्षा कमी इकॉनोमी रेटने त्याने 23 धावा देत 2 गडी बाद केले.

पृथ्वी शॉ-
यामध्ये दुसरा खेळाडू म्हणजे दिल्ली संघाचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात पृथ्वी शॉच्या खेळीचे खूप कौतुक होत आहे. विजय हजारे चषकामध्ये खोऱ्याने धावा काढून पुनरागमन करणाऱ्या शॉने चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला.

अर्धशतकापूर्वी त्याने काही बेजबाबदार फटके मारले, परंतु त्याला दोनदा जीवदान मिळाले ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. आपली विकेट गमावण्यापूर्वी त्याने दिल्लीसाठी विजयाचा पाया मजबूत केला. ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 38 चेंडूत 72 धावा केल्या.

शिखर धवन-
तीसरा खेळाडू म्हणजे शिखर धवन. या सामन्यातील त्याची कामगिरी अतुलनीय होती. मागील हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या धवनने आपल्या सलामी सहकारी पृथ्वी शॉप्रमाणे वेगाने धावा केल्या. त्याने फिरकी गोलंदाजांना लेग साइडला हवाई फटके आणि वेगवान गोलंदाजांना ऑफ साइडला फटके मारले.

सलामी जोडीदार शॉ बाद झाल्यानंतरही त्याने चेन्नईला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. शतकाच्या दिशेने जाणाऱ्या धवनला 16.3 षटकात शार्दुल ठाकूरने पायचित केले. त्याने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या ज्यामध्ये दहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तसेच त्याला ‘सामनावीर’ म्हणूनही गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारतात अफाट प्रतिभा, ते एक युग क्रिकेटविश्वावर राज्य करु शकतात,’ दिल्लीकरांच्या फलंदाजीवर इंग्लिश दिग्गज फिदा

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---