प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. एजबॅस्टन येथे उभय संघांमध्ये १८ ते २२ जून या काळात हा सामना पार पडेल. या सामन्यापूर्वी, अनेक माजी खेळाडू व समीक्षक या ऐतिहासिक सामन्याविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने या सामन्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकणाऱ्या दोन खेळाडूंविषयी मत मांडले. तसेच या सामन्यात संभाव्य विजेता असेल हेदेखील नमूद केले.
‘हे’ खेळाडू बजावणार भारताच्या विजयात भूमिका
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक व सध्या समालोचक म्हणून काम करणारा पार्थिव पटेल याने प्रसारण वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना म्हटले, “भारताला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर, चेतेश्वर पुजारा याला तीन-चार तास टिकून फलंदाजी करावी लागेल. तसेच, त्याने तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी. माझ्या मते तो भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरेल.”
पार्थिवने या सामन्यातील भारताच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाविषयी बोलताना सांगितले, “या ऐतिहासिक सामन्यात भारतासाठी गोलंदाज म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी मोहम्मद शमी करेल. त्याने आत्तापर्यंत जगभरात सर्व ठिकाणी उत्तम प्रदर्शन केले आहे. सर्वच भारतीय गोलंदाज भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.” भारताच्या गोलंदाजीची आक्रमणात शमीशिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांचा समावेश आहे.
‘या’ खेळाडूंनी टाकले न्यूझीलंडच्या पारड्यात वजन
याच कार्यक्रमात बोलताना भारताचे माजी अष्टपैलू इरफान पठाण व अजित आगरकर तसेच न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरीश यांनीदेखील मते मांडली. या तिघांनी देखील हा ऐतिहासिक सामना न्यूझीलंड आपल्या नावे करेल, असा अंदाज वर्तवला. या सर्वांनी न्युझीलंडला सामना जिंकण्याची ५५ टक्के संधी असल्याचे म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लिश क्रिकेटमध्ये वादळ! आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची होणार वर्णद्वेषी टिप्पणीसाठी चौकशी
चहलने शेअर केला पत्नीसोबत व्यायाम करतानाचा व्हिडिओ, चाहत्यांनी दिले मजेशीर सल्ले
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ: पाकिस्तानच्या हसन अलीसह या खेळाडूंना मिळाले नामांकन