---Advertisement---

क्रिकेटमधील पुढील फॅब ४ होण्याची क्षमता असलेले ४ खेळाडू

---Advertisement---

जगभरातील अनेक देशात क्रिकेट खेळले जाते. अशात प्रत्येक कालखंडात सर्वोत्कृष्ट खेळी करणाऱ्या खेळाडूंपैकी ४ महत्त्वाच्या खेळाडूंचा मिळून फॅब्युलस ४ अर्थात फॅब ४ म्हणतात. एका कालखंडानंतर या ४ सर्वश्रेष्ठ खेळाडूंपेक्षा अधिक उत्कृष्ट खेळाडूंचे क्रिकेटमद्ये आगमन होते. त्यामुळे पुढे नवे फॅब ४ जगाला मिळतात.

सुरुवातीच्या फॅब ४ मध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग आणि जॅक्स कॅलिस यांचा समावेश होता. पुढे त्यांचे स्थान विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि जो रुट यांनी घेतले. याचप्रमाणे  पुढील काळात फॅब ४चे स्थान भविष्यातील वेगळे ४ खेळाडू प्राप्त करतील.

या लेखात भविष्यात फॅब ४ बनणाऱ्या खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. तर जाणून घेऊया, कोण असतील ते ४ खेळाडू This 4 Players Will Become Next Fab 4 In Cricket

१. बाबर आझम (पाकिस्तान)

पाकिस्तान संघाचा नवनियुक्त कर्णधार बाबर आझम हा येत्या फॅब ४चा सदस्य बनण्याची क्षमता बाळगतो. ज्याप्रमाणे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राइव्हला पाहताना चाहत्यांच्या नजरा एका ठिकाणी टिकून राहायच्या, त्याप्रमाणेच आझमचा कव्हर ड्राइव्ह खेळताना नजाराही पाहण्याजोगा असतो.

आझमने २०१५ला झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यातून पाकिस्तान संघात पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ६० चेंडूत ५४ धावा आपले फलंदाजी कौशल्य दाखवून दिले होते. त्यानंतर सप्टेंबर २०१६मध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी२०मद्ये पदार्पण केले. यावेळी तो फक्त ११ चेंडूत १५ धावा करु शकला. मात्र, त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिवस रात्र कसोटीत पदार्पण करत, आझमने पहिल्या डावातच ६९ धावा केल्या होत्या. यासह दिवस रात्र कसोटी पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१६मद्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग ३ सामन्यात ३ शतके करत आझमने ३६० धावा केल्या होत्या. यासह तो ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. तसेच, वनडेत सलग ३ शतके मारणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला.

तसेच, जानेवारी २०१७ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात सर्वात वेगाने १००० धावा करणारा तो संयुक्तपणे तिसरा फलंदाज ठरला. शिवाय, २१ डावात वनडेत वेगवान १००० धावा करणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. पुढे हे दोन्ही विक्रम फखर जमान याने आपल्या नावावर केले. वनडे आणि टी२०मध्ये वेगाने यश मिळवणाऱ्या आझमला त्याचे कसोटीतील पहिले शतक करण्यासाठी १७ डावांची वाट पाहावी लागली. अखेर २०१८मधील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद १२७ धावा करत आपले पहिले कसोटी शतक केले होते. तर २०१९ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक शतक आणि एक अर्धशतकासह त्याने २१० धावा केल्या होत्या.

ऑक्टोबर २०१९मध्ये आझमची पाकिस्तानचा टी२० संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. आझमने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २६ सामन्यात ४५.१२च्या सरासरीने १८५० धावा केल्या आहेत. तर, वनडेत ७४ सामन्यात ५४.१७च्या सरासरीने ३३५९ आणि टी२०त ३८ सामन्यात ५०.७२च्या सरासरीने १४७१ धावा केल्या आहेत.

२. मार्नस लाबूशेन (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन हा जगातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्यात भविष्यातील फॅब ४मद्ये सामाविष्ट होण्याची क्षमता आहे. त्याने केवळ ५ सामन्यात कसोटी सामन्यात ८९६ धावा केल्या होत्या. यात त्याच्या पाकिस्तानविरुद्ध १७३.५च्या सरासरीने केलेल्या ३४७ धावांचा आणि न्यूझीलंडविरुद्ध ९१.५च्या सरासरीने केलेल्या ५४९ धावांचा समावेश होता.

लाबूशेनने ऑक्टोबर २०१८मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यावेळी दुसऱ्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला होता. तर, पुढील २०१८-१९मधील भारत दौऱ्यावर त्याने केवळ एका डावात फलंदाजी करताना ३८ धावा केल्या होत्या. पुढील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो ४ डावात फक्त १ अर्धशतक करु शकला होता.

लाबूशेनने एप्रिल २०१९मध्ये ग्लॅमरॉन काउंटी क्रिकेट क्लंबशी करार केला होता. त्यावेळी त्याने पूर्ण हंगामात ६५.५२च्या सरासरीने १११४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५ अर्धशतकांचा आणि  ५ शतकांचा समावेश होता. शिवाय काउंटी चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या हंगामात तो १८ डावात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला होता. २०१९मधील इंग्लंड येथे झालेल्या ऍशेस सीरीजमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. परंतु त्याला खेळायची संधी मिळाली नाही. मात्र, स्टिव्ह स्मिथला दुखापत झाल्यामुळे त्याला अखेर त्याला ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटीत खेळण्याची नव्याने संधी मिळाली.

लाबूशेनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १४ सामन्यात ६३.४३च्या सरासरीने १४५९ धावा केल्या आहेत. तर, ७ वनडे सामन्यात त्याने ३०५ धावा केल्या आहेत.

३. एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका)

एडेन मार्करम हा १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषकात १९ वर्षांखालील दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार होता. विशेष म्हणजे, त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा संघाने चषक पटकावला होता. त्याच्यात येत्या फॅब ४ मध्ये स्थान मिळवण्याची क्षमता आहे.

सप्टेंबर २०१७मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून मार्करमने दक्षिण आफ्रिका संघात पदार्पण केले होते. यावेळी अवघ्या ३ धावांनी त्याचे शतक हुकले होते. परंतु पुढील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपले कसोटी शतक करुन सर्वांचे लक्ष वेधले. तर, पुढील झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक करत, तो पहिल्या ३ कसोटी सामन्यात २ शतके करणारा पहिला दक्षिण आफ्रिकन फलंदाज ठरला.

ऑक्टोबर २०१७मध्ये मार्करमने बांग्लादेशविरुद्ध वनडे पदार्पण केले. त्यावेळी त्यावेळी पदार्पणाच्या वनडे सामन्यातच त्याने ६६ धावांची प्रशंसनीय खेळी केली होती. तर, फेब्रुवारी २०१८मध्ये त्याला फाफ डू प्लेसिसला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर करण्यात आल्यामुळे तेव्हाच्या २३ वर्षीय मार्करमला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यामुळे ग्रीम स्मिथनंतरचा तो वनडेतील दुसरा युवा कर्णधार  बनला होता. तर, २०१८मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यावेळी त्याने २ शतके आणि १ अर्धशतक करत ४८० धावा केल्या होत्या.

मार्करमने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २० सामन्यात उल्लेखनीय १४२४ धावा केल्या आहेत. तर, तर २६ वनडेत ६४३ धावा केल्या आहेत.

४. निकोलस पूरन (वेस्ट इंडिज)

निकेलस पूरन हा २०१४मधील १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू होता. यावेळी त्याने ६०.६च्या सरासरीने १ शतक आणि २ अर्धशतकांसह ३०३ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर २०१५मध्ये त्याचा कार अपघात झाला. त्यामुळे त्याच्या पायाच्या घोट्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला २ सर्जरी कराव्या लागल्या. तसेच तो १८ महिने क्रिकेटपासून दूर होता.

सप्टेबर २०१६ला पाकिस्तानविरुद्धच्या टी२०तून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निकोलसने आतापर्यंत २१ सामन्यातील १९ डावात फलंदाजी करत ३५३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. तो भविष्यात अजून चांगली खेळी करु शकतो. तर, फेब्रुवारी २०१९मध्ये वनडेत पदार्पण करत तो ४ चेंडूत शून्य धावेवर बाद झाला होता. पुढे आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये त्याने ९ सामन्यात ३६७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या श्रीलंकाविरुद्धच्या शतकाचा समावेश होता आणि तो वेस्ट इंडिजचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

निकोलसने त्याच्या एका वर्षाच्या वनडे कारकिर्दीत २५ सामन्यात ९३२ धावा केल्या आहेत. तो पुढे वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाचाही चांगला खेळाडू बनू शकतो. त्याच्यात फॅब ४मध्ये सामाविष्ट होण्याची क्षमता आहे.

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक

जागतिक क्रिकेटमधील ७ सर्वात आळशी क्रिकेटपटू; २ नावे आहेत भारतीय…

खालच्या फळीत खेळणारे ३ खेळाडू, जे पुढे जाऊन बनले टीम इंडियाचे धुव्वांदार सलामीवीर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---