T20 World Cup 2024: नुकताच वनडे विश्वचषक 2023 पार पडला. यानंतर आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेपूर्वीही अनेक भविष्यवाणी केल्या जात आहेत. यामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याच्या नावाचाही समावेश आहे. मोईन अली टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेपूर्वी मोठे विधान करून चर्चेत आला आहे. त्याने विश्वचषक किताब जिंकण्यासाठी आपल्याच संघाचे समर्थन केले आहे.
काय म्हणाला मोईन अली?
अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) याने अबू धाबी टी10 लीग स्पर्धेदरम्यान मोठे भाष्य केले. मोईन म्हणाला की, इंग्लंड संघ वनडेच्या तुलनेत टी20 क्रिकेट प्रकारात सर्वोत्तम संघ आहे. गल्फ न्यूजशी बोलताना मोईन म्हणाला, “आम्हाला पुन्हा प्रयत्न करून जिंकायचे आहे. मला वाटते की, आम्ही एक चांगला टी20 संघ आहोत. मला विश्वास आहे की, आम्ही आणखी मजबूतीने पुनरागमन करू.”
सांगितले वनडे विश्वचषक पराभूत होण्याचे कारण
पुढे बोलताना मोईन अलीने विश्वचषक पराभूत होण्याचे कारणही सांगितले. तो म्हणाला, “आम्ही वनडे विश्वचषकात चांगले प्रदर्शन करू शकलो नाही. फलंदाज फॉर्ममध्ये नव्हते आणि क्रिकेटमध्ये असे होत असते. आम्ही दीर्घ काळापासून चांगले खेळत आलो आहोत, पण हे त्या गोष्टींपैकी एक आहे, ज्यात आम्ही प्रदर्शन केले नाही.”
वेस्ट इंडिजविरुद्ध गमावला पहिला सामना
खरं तर, वनडे क्रिकेटमधील इंग्लंडचे खराब प्रदर्शन अजूनही संपले नाहीये. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. 325 धावांचे आव्हान उभे केल्यानंतर, इंग्लंडने खराब गोलंदाजी केली आणि 4 विकेट्सने सामना गमावला. मात्र, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने चांगले पुनरागमन करत विजय नोंदवला. वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 9 डिसेंबर रोजी खेळला जाईल.
वनडे विश्वचषकात खराब प्रदर्शन
विशेष म्हणजे, मागील महिन्यात पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत इंग्लंडचे प्रदर्शन खूपच खराब राहिले होते. त्यांना पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. गतविजेत्या संघात सामील जॉनी बेअरस्टो, जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांच्यासह अव्वल खेळाडू प्रदर्शन करण्यात सपशेल अपयशी ठरले होते. (this cricketer backs his team to defend t20 world cup 2024 title)
हेही वाचा-
WPL 2024 Auction: महिला खेळाडूंवर होणार कोट्यवधींची उधळण; कधी, कुठे आणि कसा पाहायचा लिलाव? घ्या जाणून
गंभीरशी भांडण करणं श्रीसंतला पडलं महागात! LLC कमिशनरने पाठवली लीगल नोटीस; म्हणाले, ‘जोपर्यंत तू…’






