जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथील ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडेल. देश-विदेशातील अनेक नामवंत क्रिकेटपटूंनी या लिलावासाठी नावनोंदणी केली होती. लिलावासाठीची खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयने जाहीर केली आहे. ज्यामध्ये २९२ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
आयपीएल २०२१ साठी लिलावात सहभागी होणाऱ्या २९२ क्रिकेटपटूंमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व न केलेले १४७ क्रिकेटपटू आहेत. नुकतीच संपलेली देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी गाजवलेले पाच खेळाडू या लिलावात मोठ्या किमतीत विकले जाण्याची शक्यता आहे.
त्याच पाच खेळाडूंविषयी आपण जाणून घेणार आहोत
१) अवि बरोट
सौराष्ट्राचा २८ वर्षीय आक्रमक फलंदाज अवि बरोट अनेक संघांच्या रडारवर असेल. अविने नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३२ चौकार व १२ षटकारांच्या सहाय्याने एक शतक व एक अर्धशतक ठोकत २८३ धावा कुटल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १८५ असा प्रभावी राहिला आहे.
२) लुकमन मेरीवाला
बडोद्याचा डावखुरा युवा वेगवान गोलंदाज लुकमन मेरीवाला याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. बडोद्याच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत त्याने ५ सामन्यात १५ बळी मिळवले. मेरीवालाने आत्तापर्यंत आपल्या टी२० कारकिर्दीत ४४ सामने खेळताना ६.७२ च्या इकॉनॉमीने ७२ बळी मिळवले आहेत. त्याच्या गोलंदाजीतील वैविध्यपणामुळे अनेक संघ त्याला खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवतील.
३) केदार देवधर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा केदार देवधर यावर्षी लिलावात मोठी रक्कम मिळवू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ मध्ये त्याने आठ सामने खेळताना ३४९ धावा काढल्या होत्या. देवधरचा स्ट्राईक रेट तितका उच्च नसला तरी, त्याचे सातत्य अनेक संघांसाठी फायदेशीर ठरू शकते.
४) जलज सक्सेना
देशांतर्गत क्रिकेटचा दिग्गज मानला जात असलेल्या अष्टपैलू जलजने गेल्या काही वर्षांत शानदार कामगिरी केली आहे. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत त्याने ११.९० च्या सरासरीने १० बळी घेतले. जलज यापूर्वी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली कॅपिटल्स या संघांचा सहभाग राहिला आहे. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. साल २०२१ आयपीएलच्या लिलावापूर्वी अशा अनेक बातम्या आल्या की निवड समितीने त्याकडे दुर्लक्ष केले. टी-२० मध्ये त्याचा ट्रॅक विक्रम चांगला आहे. त्याने आपल्या टी२० कारकिर्दीत ६.८४ च्या इकॉनॉमीने ५९ बळी मिळवले आहेत.
५) विष्णू सोळंकी
बडोदा संघ २०२१ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यष्टीरक्षक विष्णू सोळंकी याने मोठा हातभार लावला होता. उपांत्य सामन्यात अखेरच्या तीन चेंडूवर १४ धावा ठोकत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विष्णूने स्पर्धेत ८ सामने खेळताना ५३.४० च्या सरासरीने २६७ धावा ठोकल्या होत्या. आत्तापर्यंत एकदाही आयपीएलमध्ये सहभागी न झालेला विष्णू आयपीएलच्या चौदाव्या हंगामात खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपन : दुसऱ्या मानांकित राफेल नदालला पराभवाचा धक्का; त्सित्सिपास सेमीफायनलमध्ये दाखल
सौरव गांगुलीच्या पत्नीने नोंदवली पोलिस तक्रार, धक्कादायक आहे कारण