भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलामीवीर उस्मान ख्वाजा व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर पहिला डावात 480 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद 36 धावा केल्या आहेत. फलंदाजीला पोषक असलेल्या या खेळपट्टीबाबत भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकर याने एक महत्त्वाचे विधान केले आहे.
या मालिकेतील पहिला तीन सामन्यात फिरकी गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्ट्या मिळाल्या होत्या. त्यामुळे पहिले तीनही सामने अवघ्या तीन दिवसात निकाली लागले. अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल दिसून येत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना आगरकर म्हणाला,
“या खेळपट्टीवर भरपूर धावा आहेत. नागपूर कसोटीतील रोहित शर्माची खेळी सोडल्यास वरच्या फळीतील इतर फलंदाज अपयशी ठरले आहेत. या खेळपट्टीवर त्या सर्वांना धावा करण्याची संधी असेल. विराटला देखील पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी याच सामन्यात चांगला खेळ करावा लागेल. कारण, अशी खेळपट्टी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही.”
विराटने या मालिकेत आतापर्यंत पाच डावांत 110 धावा केल्या आहेत. यामध्ये चकित करणारी गोष्ट म्हणजे विराटने या मालिकेत आत्तापर्यंत वेगवान गोलंदाजांचा एकही चेंडू खेळलेला नाही. टॉड मर्फी व मॅथ्यू कुन्हमन या आपली पहिलीच मालिका खेळत असलेल्या फिरकी गोलंदाजांनी त्याला पाचही वेळी तंबूचा रस्ता दाखवलाय.
ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दोन्ही दिवशी शानदार फलंदाजी केली. उस्मान ख्वाजाने 180 व कॅमेरून ग्रीनने 114 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोठे योगदान दिले. या दोघांच्याच महत्त्वाच्या खेळ्यांमूळे ऑस्ट्रेलियाने 480 धावा उभारल्या. भारतासाठी अश्विनने सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एकही गडी न गमावता 36 धावा केल्या होत्या.
(This is finest chance for Virat scoring big runs in ahemdabad said Ajit Agarkar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कर्णधाराने घेतलेल्या ‘या’ रिव्ह्यूवर पंचांनाही आवरेना हसू, व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून
WPL गाजवतेय पाटलांची श्रेयंका! IPL सामना पाहताना ‘या’ दिग्गजामुळे झालेली प्रभावित