आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. आयपीयएच्या या उर्वरित सामन्यांमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. विशेष म्हणजे मागील हंगामही युएईमध्ये खेळवण्यात आला होता, त्यावेळी मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले होते, तर चेन्नई सुपर किंग्स पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले होते.
मुंबईने आजपर्यंत सर्व ५ आयपीएल विजेतीपदं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली आहेत. त्यामुळे रोहित शर्माला आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. असे असले तरी यूएईमध्ये आयपीएलचे सर्वाधिक सामने जिंकण्यामध्ये रोहित एमएस धोनीच्या मागे आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहेत कोणत्या कर्णधाराने यूएईमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत.
एमएस धोनी (१० सामने विजयी)
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचे नाव या यादीत सर्वात वर आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात सीएसकेचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले होते आणि संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. मात्र या हंगामात संघाने दमदान पुनरागमन केले आहे.
आयपीएलचा मागचा १३ वा हंगाम यूएईमध्ये खेळवला गेला होता आणि चालू १४ व्या हंगामातील उर्वरित सामनेही येथेच खेळवले जाणार आहेत. यापूर्वी आयपीएल २०१४ मध्ये सुरुवातीचे काही सामने यूएईमध्ये खेळवले गेले होते. चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात आतापर्यंत यूएईमध्ये १९ सामने खेळले आहेत आणि यातील १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
श्रेयस अय्यर (९ सामने विजयी)
आयपीएल फ्रेंचायजी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचे नाव या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने खूपच चांगेल प्रदर्शन केले आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये स्थान मिळवले होते. मात्र, अंतिम सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने हरवले होते. त्यांनी त्यांच्या अप्रतिम प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत पुन्हा एकदा दिल्ली काॅपिटल्सच्या संघाचे चांगले प्रदर्शन दिसू शकते. श्रेयस अय्यरने यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या १७ सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व केले असून त्यातील ९ सामने जिंकले आहेत.
विराट कोहली (९ सामने विजयी)
राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीही या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीच्या नेतृत्वात बेंगलोरच्या संघाने तीन वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये स्थान मिळवले आहे. मात्र, संघाला एकदाही ट्राॅफी जिंकता आलेली नाही. असे असले तरी कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आयपीएल २०१६ मध्ये सर्वाधिक ९७३ धावा केल्या होत्या आणि त्याचा हा विक्रम आजपर्यंत कोणीच तोहलेला नाही. कोहलीने युएईमध्ये २० सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे आणि यातील ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
डेविड वार्नर (८ सामने विजयी)
सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वाॅर्नरचे नाव या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने खूपच खराब प्रदर्शन केले आहे. संघाने ७ सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे आणि संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांनी वॉर्नरकडून कर्णधारपद काढून केन विलियम्सनकडे दिले आहे. आता यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या उर्वरित सामन्यांमध्ये संघाला स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी आहे. संघाचा माजी कर्णधार डेविड वाॅर्नरच्या नेतृत्वात संघाने यूएईमध्ये १६ सामने खेळले आहेत आणि यातील ८ सामने जिंकले आहेत
रोहित शर्मा (८ सामने विजयी)
आयपीएलचा पाचवेळचा विजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानावर आहे. रोहित आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. संघाने त्याच्याच नेतृत्वात पाच वेळा आयपीएलची ट्राॅफी जिंकली आहे. मुंबईने यूएईमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत १७ सामने खेळले आहेत आणि यातील ८ सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चाहत्यांच्या आनंदासाठी शमीने चालू सामन्यात मैदानावरच कापला केक, पाहा व्हिडिओ
रोहितचा नवा विक्रम! धोनी, गांगुलीला पछाडत ‘त्या’ विक्रमाच्या यादीत मिळवले ५ वे स्थान
चुकीला माफी नाही! भारत-इंग्लंड सामन्यात सलग तिसऱ्यांदा घुसणाऱ्या जार्वोवर अटकेची कारवाई