इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा १५ वा हंगाम सध्या खेळला जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये नेहमीच्या ८ संघांबरोबर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघही खेळताना दिसत आहेत. त्यामुळे रोमांच अधिक वाढलेला दिसतोय. तसेच आयपीएलमध्ये अनेक चर्चाही होत आहेत.
पण, केवळ पैशानेच नव्हे, तर भव्यता-दिव्यता आणि खेळाडूंच्या टॅलेंटने श्रीमंत असलेली ही लीग, जर कदाचित त्या दोन घटना घडल्या नसत्या, तर आयपीएलला दोन-तीन वर्षात आपला गाशा गुंडाळावा लागला असता. आयपीएलला यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या दोन घटना म्हणजे.. धोनीच्या यंग इंडियाने जिंकलेला पहिला-वहिला टी२० विश्वचषक आणि ब्रेंडन मॅक्यूलमची कोणतीही विशेषणे फिके पडतील अशी पहिल्या सामन्यामधील वादळी खेळी.
वेस्ट इंडीजमध्ये २००७ च्या वनडे विश्वचषकाला टीम इंडिया चारीमुंड्या चीत झाली. त्याच वर्षी टी२० विश्वचषक नियोजित होता. आधीतर बीसीसीआयने या विश्वचषकासाठी संघ पाठवायला नकार दिला. थोडेफार ताणल्यानंतर भारत तो विश्वचषक खेळायला तयार झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुलीसारखे अनुभवी खेळाडू स्वतःहून घरी बसले होती. संघाची धुरा होती उगवता तारा एमएस धोनीच्या हातात. अनुभवाच्या नावावर सोबत होते अजित आगरकर, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग.
मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासूनच चमत्काराला सुरुवात झाली. बॉल आऊटच्या त्या नव्याकोऱ्या निर्णयाने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवले. पुढे युवराजने राज केले. स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकामध्ये ६ षटकार खेचत टी२० क्रिकेट म्हणजे मनोरंजन आहे याची ग्वाही दिली. सेमी फायनलला ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि ऐतिहासिक फायनलमध्ये पुन्हा पाकिस्तानला हरवून विश्वचषक नावावर केला. इथेच आयपीएलच्या आयोजनाला किक मिळाली.
पडद्यामागे पटापट गोष्टी घडू लागल्या. आयसीएलचे बंड मोडून काढण्यात बीसीसीआय यशस्वी ठरली. आयपीएलसाठी फ्रेंचाइजी मिळाल्या. अंबानी-मल्ल्यासारखे बिजनेस टायकून आणि शाहरुख-प्रीतीसारखे बॉलीवूड स्टार आयपीएलचा भाग झाले. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंचा लिलाव. त्यांनाही कोट्यावधींची किंमत मिळाली. अखेर काट्याकुट्याचा साऱ्या वाटा तुडवत आणि सारे अडथळे पार करत ललित मोदींच्या स्वप्नातील आयपीएल सुरू होण्यास सज्ज झालेली.
तारीख होती १८ एप्रिल २००८, ठिकाण चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू. नेत्रदीपक रंगारंग सोहळ्याने आयपीएलला शुभारंभ झाला. पहिल्या सामन्यात समोरासमोर होते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. बेंगलोरच्या प्रविण कुमारने टाकलेला आयपीएल इतिहासातील पहिला चेंडू सौरव गांगुलीने खेळला आणि आयपीएलला सुरुवात झाली.
यानंतर मैदानावर जे घडले ते केवळ अकल्पनीय होते. गांगुलीच्या साथीला सलामीवीर म्हणून उतरलेल्या न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्यूलमने मैदानावर अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक पाहून चाहते खुश झाले. ५३ व्या चेंडूवर मॅक्यूलमचे शतकही पूर्ण झाले. हे काय घडतंय कोणाला कळत नव्हते. २० षटकांनंतर खेळ थांबला तेव्हा कोलकाताच्या नावा पुढे होते. २२२ धावा एकट्या मॅक्यूलमने १० चौकार आणि १३ षटकारांसह ७३ चेंडूवरवर चोपल्या होत्या नाबाद १५८ धावा. क्रिकेट इतिहासात अशी खेळी कोणी कधीही पाहिली नव्हती. मॅक्यूलम मैदानावर तुफानी खेळत असताना, स्टॅन्डमध्ये असलेला सुपरस्टार शाहरुख खान ज्यावेळी जायंट स्क्रीनवर जल्लोष करताना दिसत होता, तेव्हाच सगळे जण समजून गेले की, ही आयपीएल सुपरहिट आहे.
ललित मोदींनी पाहिलेलं दिवास्वप्न सत्यात उतरलं होतं आणि जगातील सर्वात मोठा ब्रँड बनलं. आज अब्जावधींची उलाढाल या आयपीएलमध्ये होतेय. जगातले सर्व नामवंत खेळाडू या लीगचा हिस्सा होण्यासाठी धडपडत असतात. ‘टॅलेंट मिट्स अपॉर्च्युनिटी’. या आपल्या ब्रीदवाक्याला आयपीएल अक्षरश: जागलेय. आज याच आयपीएलमधून मिळालेल्या रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या या खेळाडूंच्या जीवावर आपण क्रिकेट जगतावर राज करतोय. सध्या १५ व्या हंगामापर्यंत पोहोचलेली आयपीएल आणखी कितीही मोठी झाली तरी, ही आयपीएल घडण्यामागे, ही आयपीएल मोठी होण्यामागे, ललित मोदींचे कष्ट, २००७ टी२० विश्वचषक आणि मॅक्यूलमच्या क्रिकेट बदलणाऱ्या खेळीचा सिंहाचा वाटा आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! पृथ्वी शॉ रुग्णालयातून बाहेर