---Advertisement---

विराट कोहलीला बाद करणाऱ्या विदर्भाच्या या खेळाडूची झाली भारतीय संघात एन्ट्री!

On: मंगळवार, मे 19, 2026 8:14 PM
---Advertisement---

रणजी करंडक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावण्याचा विक्रम नावावर असलेला विदर्भचा शिलेदार हर्ष दुबेची भारतीय संघात निवड झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवडसमितीने मंगळवारी भारतीय संघाची घोषणा केली. हर्षची टेस्ट आणि वनडे अशा दोन्ही संघात निवड झाली आहे. २३वर्षीय डावखुरा फिरकीपटू असणारा हर्ष सध्या आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळतो आहे.

२०२४-२५ रणजी हंगामात हर्षने ६९ विकेट्स घेत नवा विक्रम प्रस्थापित केला. एवढ्या विकेट्सच्या बरोबरीने हर्षने ४७६ धावा केल्या. या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. विदर्भ संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत जेतेपदावर नाव कोरलं. या जेतेपदात हर्षचा सिंहाचा वाटा होता.

गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. फलंदाज रवीचंद्रन स्मरण दुखापतग्रस्त झाल्याने हर्षला संघात समाविष्ट करण्यात आलं. हर्षने ३ सामन्यात ५ विकेट्स पटकावत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. हैदराबाद संघाने ३० लाख रुपये खर्चून त्याला रिटेन केलं. यंदाच्या हंगामात हर्ष सनरायझर्ससाठी नियमित खेळतो आहे.

गेल्या वर्षी हर्षची कतार इथे झालेल्या रायझिंग स्टार एशिया कप स्पर्धेसाठी निवड झाली. याच स्पर्धेत हर्षने टी२० प्रकारातलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं.

मी चौथीत होतो. बाबांबरोबर पुस्तकं खरेदी करायला चाललो होतो. बाबा गाडी चालवताना रस्ता चुकले. आम्ही ज्या रस्त्यावर पोहोचलो तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती. मी बाबांना विचारलं, हे काय आहे? तो रुबी क्लब होता. बाबा म्हणाले इथे क्रिकेटपटू घडतात. बाबांच्या उत्तराने मी विचारात पडलो. याच चुकलेल्या रस्त्याने क्रिकेटची गोडी लागली असं हर्षने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

हर्षचे वडील सीआयएसएफ मध्ये काम करतात. कामाचा भाग म्हणून त्यांच्या नियमित बदल्या होतात. वयोगट स्पर्धांमध्ये हर्ष चमकू लागला तसं सतत बदल्या होत राहणं अडसर ठरू शकतं हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. ‘माझं करिअर नीट घडावं यासाठी त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. हर्षची आई शिक्षिका आहेत. आई माझ्यासाठी दररोज पाच वाजता उठायची. डबा भरून द्यायची. त्यानंतर शाळेला जायची. मी शाळा, क्रिकेटचं प्रशिक्षण संपवून घरी यायचो तेव्हा ती परतलेली असायची. त्या दोघांनी माझ्या करिअरसाठी किती गोष्टींचा त्याग केला आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मी जेव्हा चांगली कामगिरी करतो ते त्यांच्या डोळ्यात दिसतं’, असं हर्षने सांगितलं.

हर्षने सनरायझर्स हैदराबाज संघासाठी पदार्पण केलं. हर्षची पहिली विकेट मिचेल मार्श होता. हैदराबादचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होता. या लढतीपूर्वी हर्षने घरी फोन केला. बाबा, मी विराट कोहलीची विकेट घेणार आहे असं त्याने सांगितलं. त्याच्या आईबाबांनी क्रिकेटनेक्स्टशी बोलताना सांगितलं की, ‘तो प्रत्येक सामन्यापूर्वी तयारी करतो. तो विराट कोहलीचा अनेक वर्ष अभ्यास करत आला आहे. विराट कोहली किती मोठा फलंदाज आहे याची त्याला जाणीव आहे पण विराट समोर आहे याचं तो दडपण घेत नाही. त्याच्या यशामागे हे मोठं कारण आहे’.

हर्षने सांगितल्याप्रमाणे विराटची विकेट घेतली. हर्षने विराटला ४३ धावांवर बाद केलं. विराटला बाद केल्यानंतर हर्षचा आनंद गगनात मावेना. सामना संपल्यानंतर हर्षने त्या चेंडूवर विराटची स्वाक्षरी घेतली. ‘मी लहानपणापासून त्याला पाहतो आहे. त्याची विकेट मिळणं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं’, असं हर्ष म्हणाला.

रुबी क्रिकेट क्लबमध्ये सीनिअर खेळाडू आजारी पडला आणि हर्षला खेळायची संधी मिळाली. त्याने त्या सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आणि ६०हून अधिक धावांची खेळी केली. त्याला बॅटिंग करायला आवडतं. म्हणूनच त्याच्या बॅट्स सातत्याने तुटतात असं हर्षच्या वडिलांनी सांगितलं.

२०२५ रणजी हंगामात विदर्भचा संघ हैदराबादविरुद्ध ७०/७ अशा स्थितीत होता. हर्षने झुंजार अर्धशतकी खेळी केली. सामन्यात ८ विकेट्सही घेतल्या. तो हंगामातला सर्वोत्तम सामना होता असं हर्षने सांगितलं. विदर्भने रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्या सामन्यात शेवटची ८ दहा षटकं बोटाला लागलेलं असताना टाकली.

महान फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीही हर्षच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. हर्षच्या कामगिरीतलं सातत्य पाहून रवीचंद्रन अश्विनने त्याला तामिळनाडूत होणाऱ्या लीगमध्ये खेळण्यासाठी बोलावलं. ‘त्याची विकेट्सची भूक न शमणारी आहे. मेहनती खेळाडू आहे’, असं अश्विनने सांगितलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---