इंडियन प्रीमियर लीग ही अशी स्पर्धा आहे, जिथे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळत असते. याचा फायदा त्यांना येणाऱ्या काळात होत असतो. तसेच आयपीएल २०२० मध्ये देखील युवा खेळाडू देवदत्त पडीक्कलने मिळालेल्या संधीचे सोने करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. पडीक्कलने १४ सामन्यात ४७३ धावा केल्या होत्या. आयपीएलचे १४ वे हंगाम सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का बसला आहे.
देवदत्त पडीक्कलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशातच त्याची जागा भरून काढण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात असे काही फलंदाज आहेत.जे पडीक्कलच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात.
१)फिन ऍलेन : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिपने वैयक्तिक कारणास्तव यंदा माघार घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने फिन ऍलेन याला संघात स्थान दिले होते. त्याने नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेत अवघ्या २९ चेंडूत ७१ धावांची खेळी केली होती. या खेळीमध्ये त्याने १० चौकार आणि ३ लांब षटकार मारले होते. जर या खेळाडूला सामना सुरू करण्याची संधी मिळाली तर तुफानी फटकेबाजी करत हा फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात विराट कोहली, डिव्हीलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे आक्रमक फलंदाज आहेत.
२)मोहम्मद अजहरुद्दीन : आयपीएल २०२१ च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मोहम्मद अजहरुद्दीनला २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मोहम्मद अजहरुद्दीन देशांतर्गत सामन्यांमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच तो केरळ संघासाठी सलामी फलंदाजी देखील करतो. त्याने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने ५ सामन्यात २१४ धावा केल्या होत्या. तसेच एका सामन्यात त्याने अवघ्या ५४ चेंडूत १३७ धावांची खेळी केली होती. मोहम्मद अजहरुद्दीन देखील पडीक्कलच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
३)रजत पाटीदार : देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये मध्यप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रजतने, सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत अवघ्या ५१ चेंडूत ९६ धावांची खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने आणखी एक महत्त्वाची खेळी केली होती. त्याने अवघ्या २९ चेंडूत ६८ धावांची खेळी केली होती. हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करण्यास सक्षम आहे. त्याने नुकत्याच झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या सराव सामन्यात ३५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे विराट कोहली आणि संघ या खेळाडूला देखील पडीक्कलच्या अनुपस्थितीत संघात स्थान देऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहासात झाली आहे ‘या’ लाजिरवाण्या विक्रमांचीही नोंद; दिग्गज खेळाडूंचाही समावेश
मोईन अलीने दारुच्या कंपनीचा लोगो जर्सीवरुन हटवण्याची केली होती मागणी? चेन्नईचे सीइओ यांनी दिले उत्तर
भारतातील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन; महान क्रिकेटपटू सीके नायडूंशी होते ‘हे’ नाते





