IND vs SL, ODI Series :- श्रीलंका आणि भारत यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका कोलंबो येथे खेळली गेली. या मालिकेत यजमान संघाने 2-0 असा विजय मिळवला. या मालिकेत श्रीलंकेचे अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. श्रीलंकेन खेळाडूंच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील दमदार प्रदर्शनापुढे भारताच्या अनुभवी खेळाडूंनीही लोटांगण घातले. परिणामी श्रीलंकेच्या संघाने 27 वर्षांनंतर भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे.
या मालिकेत श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे पहिला सामना बरोबरीत राहिल्यानंतरही संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली. त्यामुळे आता आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक फ्रँचायझींची नजर श्रीलंकेच्या काही खेळाडूंवर असेल. चला जाणून घेऊया श्रीलंकेच्या त्या 3 खेळाडूंबद्दल, ज्यांवर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सर्वांच्या नजरा असतील.
3. चरिथ असलंका
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेने चारिथ असलंकाची कर्णधारपदी नियुक्ती केली आणि त्याने या संधीचे सोनेही केले. त्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि या मालिकेत 2.86 च्या इकॉनॉमीने 8.66 च्या सरासरीने 6 विके्स घेतल्या आणि तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याने 3 सामन्यात 49 धावा केल्या. या मालिकेत फलंदाजीत तो विशेष काही करू शकला नाही, पण मधल्या फळीत वेगवान फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तो श्रीलंकन संघाची पहिली पसंती आहे. त्यामुळे आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक संघ त्याच्यावर लक्ष ठेवू शकतात.
2. जेफ्री वँडरसे
या मालिकेसाठी 34 वर्षीय अनुभवी फिरकी गोलंदाज जेफ्री वँडरसेला स्टँडबायवर ठेवण्यात आले होते. वानिंदू हसरंगा मालिकेतून बाहेर झाल्यानंतर त्याला दुसऱ्या वनडेत खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला आणि त्याने या सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली. वँडरसेने त्या सामन्यात 33 धावांत 6 विकेट्स घेत भारताच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यातही त्याने 2 फलंदाजांना बाद केले. 4.46 च्या इकॉनॉमीने धावा खर्च करताना 8.37 च्या सरासरीने 8 विकेट्स घेणारा वँडरसे हा या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज होता. आयपीएलमध्ये अनेक संघ चांगल्या फिरकीपटूच्या शोधात असतील, त्यामुळे काहींना वँडरसेमध्ये रस असेल.
1.दुनिथ वेल्लालगे
श्रीलंकेचा युवा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालगेने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात आपली सर्वोत्तम कामगिरी केली. या मालिकेत त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात 5/27 च्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसह 15.28 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आणि 3 सामन्यांमध्ये 5.30 च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या. तो मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
वेल्लालगेने पहिल्या सामन्यात शानदार नाबाद अर्धशतक झळकावले होते आणि 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या, ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. त्याने फलंदाजी करताना 54 च्या सरासरीने 108 धावा केल्या आहेत. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले. वेल्लालागेने दाखवून दिले की तो चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत प्रभावी ठरू शकतो. या कारणास्तव, आगामी मेगा लिलावात अनेक फ्रँचायझी त्याच्यासाठी बोली लावू शकतात.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात; शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय खेळाडूंची हकालपट्टी
पदक जिंकल्यानंतर मनू भाकरवर पैशांचा वर्षाव, क्रीडामंत्र्यांनी दिला इतक्या रुपयांचा धनादेश
विनेश फोगटवर सरकारने केला चक्क इतका खर्च, आकडा जाणून बसेल धक्का