भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत. जेव्हाही भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले आहेत, तेव्हा विराटबरोबर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बाचाबाची झाली आहे. त्यामुळे जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांचे सामने होणार असतात तेव्हा हे सामने सुरु होण्याआधीच शाब्दिक चकमकी घडायला सुरुवात होते. अनेक जण विविध प्रतिक्रिया या दोन देशांच्या मालिकांबद्दल देत असतात.
नुकतेच ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने म्हटले आहे की ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विराटचा खेळाडू म्हणून तिरस्कार करायला आवडतो, पण त्याचवेळी एक चाहता म्हणून त्याची फलंदाजी पहायलाही आवडते.
एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना पेन म्हणाला, ‘मला विराट कोहलीबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. पण तो माझ्यासाठी अन्य खेळाडूंप्रमाणेच आहे. त्याच्याबरोबर खरंतरं कसलाच संबंध येत नाही. मी त्याला नाणेफेकीवेळीच पाहातो, एवढेच.’
तसेच पेन म्हणाला, ‘विराट बाबत मजेशीर गोष्ट अशी की आम्हाला त्याचा तिरस्कार करायला आवडतो. पण त्याचबरोबर आम्हाला क्रिकेट चाहते म्हणून त्याची फलंदाजी पहायलाही आवडते. आम्हाला त्याची फलंदाजी आवडते पण आम्हाला त्याने खूप साऱ्या धावा केलेल्या पहायला आवडत नाही.’
तसेच पेन ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील सामन्यांबद्दल म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात नेहमीत तीव्र स्पर्धा राहिली आहे. विराट नक्कीच एक स्पर्धा करणारा खेळाडू आणि मी सुद्धा, त्यामुळे नक्कीच अशा काही घडना झाल्या ज्यात शाब्दिक चकमकी घडल्या. पण हे सर्व आम्ही दोघेही कर्णधार आहोत म्हणून झाले नाही, तिथे कोणीही असतं तरी या घटना घडल्या असत्या.’
याबरोबरच पेन म्हणाला, विराट एक सर्वोत्तम खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच त्याच्या विरुद्ध खेळताना तीव्र स्पर्धा असते. तसेच ही मोठी मालिका असेल. त्यांनी मागील वेळी आम्हाला पराभूत केले होते.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
या दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. त्यामुळे तो या दौऱ्यातील वनडे, टी२० मालिकेत आणि केवळ पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे. त्यानंतर तो उर्वरित ३ कसोटी सामने खेळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची सरावाला सुरुवात, पाहा फोटो
-भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
-मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा