येत्या काही दिवसांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा थरार सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. अशातच नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणाऱ्या टीम पेनने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा माजी कर्णधार पेन याने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, तो ऍशेस मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये. या मालिकेत प्रवेश करण्यापूर्वी त्याला मार्श चषक स्पर्धेत तस्मानिया संघाचे प्रतिनिधित्व करायचे होते. परंतु शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पेनचे मॅनेजर जेम्स हेंडरसन यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, “मानसिक आरोग्यामुळे टीम पेन क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत आहे.आम्हाला त्याच्या आणि बोनीच्या (टीम पेनची पत्नी) प्रकृतीची खूप चिंता आहे.आम्ही यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.”
पेनवर ४ वर्षांपूर्वी एका महिलेला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्याचे आरोप करण्यात आले होते. याबाबत माफी मागत टीम पेनने ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत क्रिकेट तस्मानियाने देखील एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, “गेले २४ तास चर्चा केल्यानंतर टीम पेनने म्हटले आहे की, तो क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेत आहे. क्रिकेट तस्मानिया टीम पेन आणि त्याच्या कुटुंबाला व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या पाठिंबा देत राहील.”
तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील टीम पेनच्या निर्णयाचे स्वागत करत मोठे वक्तव्य केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले की, “आम्हाला माहित आहे की टीम आणि त्याच्या कुटुंबासाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही त्याच्या विश्रांती घेण्याच्या निर्णयाला समजतो आणि त्याच्या निर्णयाचा आनंद करतो.”
काय आहे नेमकं प्रकरण?
साल २०१७ मध्ये टास्मानिया क्रिकेटमधील एका महिला कर्मचारीला अश्लील फोटो आणि मेसेज केल्याचा आरोप पेनवर झाला आहे. आता त्याने त्या प्रकरणाबाबत सर्वांची माफी मागत कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये झालेल्या या प्रकरणी टास्मानिया क्रिकेट आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पेनला क्लीन चिट दिली होती. तपासानुसार, ही पेनची वैयक्तिक बाब होती आणि त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झालेले नव्हते. परंतु आता ते प्रकरण जास्तच चिघळल्याने पेनची कारकिर्द धोक्यात आल्याचे दिसते आहे.