आयसीसीने प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाईल. या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ केव्हाच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. प्रत्यक्ष सामन्याला आणखी २५ दिवसांचा अवधी शिल्लक असताना न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज टीम साऊदी याने माईंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे.
न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्यापूर्वी न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. २ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पहिली कसोटी लंडन येथे तर दुसरी कसोटी बर्मिंघम येथे खेळवली जाईल. तसेच या मालिकेपूर्वीही ते एक सराव सामना खेळतील.
आम्हाला होणार ‘या’ गोष्टीचा फायदा: साऊदी
न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेविषयी व जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याविषयी मत व्यक्त केले.
साऊदी म्हणाला, “इंग्लंड विरुद्ध होणार्या मालिकेचा आम्हाला कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी फायदा होईल. येथे लवकर येऊन वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जाते. आम्हाला २० दिवसात तीन सामने खेळायचे आहेत. मात्र यासाठी आम्ही पूर्णता तयार आहोत. आम्हाला सर्वांना तंदुरुस्त रहावे लागेल.”
टीम साऊदी हा न्यूझीलंडचा सध्या सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असून त्याला ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर व अष्टपैलू कायले जेमिसन साथ देतील.
इंग्लंड दौरा व जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ:
केन विलियम्सन (कर्णधार), हेन्री निकोल्स, बी.जे वॉटलिंग, रॉस टेलर, टॉम लॅथम, कायले जेमिसन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर, टॉम ब्लंडल, डग ब्रेसवेल, कॉलिन डी ग्रॅंडहोम, डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र, एजाज पटेल, विल यंग, डेरिल मिचेल, मॅट हेन्री व जेकब डफी.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियासारखे का खेळले नाही?’, जाफरचा ‘त्या’ खेळाडूला खोचक प्रश्न
महिला संघाच्या प्रशिक्षक निवडीचा वाद संपेना! आता गांगुलीने ‘या’ कारणाने व्यक्त केली नाराजी
कसोटी पदार्पणात सलग ३ शतके ठोकताना मोहम्मद अझरुद्दीनने वापरलेली बॅट निवडली होती ‘या’ खास व्यक्तीने