मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल 2020) मध्ये वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्डचा जोरदार धमाका सुरू आहे. शनिवारी बार्बाडोस ट्रायडंट्स विरुद्ध ट्रिंबँगो नाइट रायडर्स यांच्यात सामना झाला. ट्रिंबँगो नाइट रायडर्सचा कर्णधार पोलार्डने अवघ्या 28 चेंडूत 72 धावा फटकावल्या. 149 धावांच्या धावांचा पाठलाग करताना पोलार्डची खेळी निर्णायक ठरली आणि बार्बाडोसवर 2 गडी राखून ट्रिंबँगोने विजय नोंदविला.
पोलार्ड 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा नाईट रायडर्सने 62 धावांत 5 गडी गमावले होते आणि केवळ 7.2 षटके शिल्लक होती, म्हणजे नाईट रायडर्सला उर्वरित 44 चेंडूत 87 धावांची आवश्यकता होती. पोलार्डने कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मैदानावर आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 28 चेंडूत 9 षटकार आणि 2 चौकार ठोकले.
टीकेआरला अंतिम 2 षटकांत 31 धावांची आवश्यकता होती, 19 व्या षटकात बार्बाडोसचा कर्णधार जेसन होल्डर गोलंदाजीसाठी आला. पोलार्डने त्याच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले आणि या षटकात एकूण 16 धावा केल्या.
सामन्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवरही त्याने आर. रेफरचे षटकार मारून स्वागत केले. मात्र तो दुसर्या चेंडूवर पोलार्ड धावबाद झाला, तेव्हा टीकेआरची टीम विजयापासून 8 धावा दूर होती. बाकीचे काम कॅरी पियरे आणि जेडन सीन यांच्या जोडीने पूर्ण झाले.
तत्पूर्वी, बार्बाडोसने जॉनसन चार्ल्स (47) आणि कायल मेयर्स (42) यांच्या सर्वोत्तम खेळीच्या बदल्यात 20 षटकांत 7 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या.