भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करत ऐतिहासिक कसोटी मालिका विजय संपादन केला. भारताने प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही लाजवाब कामगिरी करत हा विजय मिळविला. भारतीय संघाच्या या कामगिरीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन देखील प्रभावित झाला आहे. त्याने नुकतेच भारताच्या विजयाला ‘अतुलनीय विजय’ असे संबोधत भारतीय संघाची प्रशंसा केली.
“अडथळ्यांवर मात करत नोंदवलेला विजय असामान्य”
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा विजय मिळविला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. भारतीय फलंदाजी या सामन्यात अवघ्या ३६ धावांवर ढेपाळली होती. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे माघारी परतला होता, तर मोहम्मद शमीने दुखातीमुळे माघार घेतली होती. मात्र अशा खडतर परिस्थितीतूनही भारतीय संघाने पुनरागमन करत पुढील तीन पैकी दोन सामने जिंकत आणि एक सामना अनिर्णीत राखत मालिका खिशात घातली.
यावरच भाष्य करताना केन विलियम्सन म्हणाला, “अनेक खेळाडूंना दुखापत झाली असतानाही ज्या पद्धतीने भारतीय संघाने हा विजय मिळविला, ते असामान्य आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. विशेषतः त्यांच्याच देशात खेळणे, अधिकच कठीण असते. मात्र तरीही भारताने प्रमुख खेळाडू उपलब्ध नसतानाही जो विजय मिळवला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे.”
“अनुभवहीन गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय”
ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटी सगळे प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने भारतीय संघ अतिशय अनुभवहीन गोलंदाजांच्या आक्रमणासह सामन्यात उतरला होता. या सामन्यात सगळ्या भारतीय गोलंदाजांकडे मिळून केवळ ७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांचा अनुभव होता. मात्र त्यांनी दोन्ही डावात ऑस्ट्रेलियन संघाला सर्वबाद करण्यात यश मिळवले.
याबाबत बोलताना विलियम्सन म्हणाला, “हा विजय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाचा होता, हा उल्लेख होईलच. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने हिंमत दाखवून प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला, ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या गोलंदाजांकडे एकूण केवळ ७ कसोटी सामन्यांचा अनुभव होता, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, ते अविश्वसनीय आणि अतुलनीय होते.”
महत्वाच्या बातम्या:
कोहली आणि रहाणेची जुगलबंदी देखील पाहण्यासारखी असेल, भारत-इंग्लंड मालिकेआधी दिग्गजाने व्यक्त केले मत
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ
आर्चरला भारतीय फलंदाजांचे आले टेंशन; म्हणाला, नंबर ६ पर्यंत कोणीही ठोकू शकतात शतक