पृथ्वीवरील सर्वात वेगवान मनुष्य असा किताब मिरवणारा उसेन बोल्ट, त्याच्या कारकिर्दीतील अखेरची १०० मीटर शर्यत धावणार आहे. ज्या शर्यतीमुळे त्याला हा किताब मिळाला ती शर्यत तो शेवटी परत जिंकण्यासाठी आज लंडन येथे उभा आहे. जैमैकाचा हा खेळाडू जेव्हा जेव्हा मोठ्या शर्यतीमध्ये धावतो तेव्हा तेव्हा तो जिंकतो हे विशेष. कित्येकदा स्पर्धेच्या आधी त्याच्या कामगिरीवर उपस्थित केला जातो. पण बोल्ट आपल्या कामगिरीच्या जोरावर स्पर्धा जिंकून त्याला उत्तर देतो.
कित्येक खेळाडू उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळतात पण बोल्ट निखळ पाण्यासारखा. आजवर कधीच बोल्टवर असे आरोप झाले नाहीत आणि असा शरीरासाठी घातक गोष्टी मी घेत नाही असे बोल्टचे म्हणणे आहे. लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे आपण जे करतो ते ही लहान मुलं करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपणच या मार्गाला जायचे नाही असे बोल्टचे विचार आहेत.
उसेन बोल्ट याच्या ऑलम्पिकमधील कामगिरीकडे पाहिलेकी त्याला उसेन बोल्ट म्हणण्यापेक्षा ‘उसेन गोल्ड’ म्हणण्याचा मोह अवरत नाही. गेल्या तीन ओलम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४*१०० मीटर यासाऱ्या शर्यतीमध्ये सलग सुवर्णपदकं मिळवण्याचा विक्रम त्याने केला आहे. ऑलंपिकच्या शर्यतीमध्ये सलग तीन वेळेस १०० मीटर आणि २०० मीटर स्पर्धा जिंकण्याची किमया कोणी करू शकला नव्हता.
रिओ ऑलिम्पिकमध्ये तर उसेन बोल्ट या नावामुळे हजारो प्रेक्षक खेचले गेले होते. त्या प्रेक्षकांना त्याने निराश केले नाही आणि त्याने सर्व शर्यती जिंकल्या. वार्षिक कमाईच्या बाबतीत जगातील पहिल्या १०० खेळाडूंमध्ये बोल्ट येतो. या यादीत तो एकमेव ऍथलिट आहे. उसेन बोल्टचा वेग इतका जास्त असतो की त्याला त्याच्या मागे धावणाऱ्या खेळाडूला पाहून हसण्या इतपत वेळ असतो. त्याला डिवचण्याचा त्याचा हेतू मुळात नसला तरी ”तू अजून लहान आहेस” असा त्याचा काहीसा अर्थ ज्याने त्याने घ्यायचा असे ठरले असावे.
म्हणतात ना ‘हर किसीको मुक्कमल जहाँ नही मिलता, किसीको जमी तो किसीको आस्मान नही मिलता’ ही बाब खोटी ठरणार की नाही हे पाहणे आहे. कित्येक मोठे खेळाडू शेवटच्या शर्यतीमध्ये हरताना आपण पहिले आहेत पण उसेन याला अपवाद ठरेल असे वाटते. बोल्टचा मागील काही शर्यतीतील फॉर्म पाहता ही लढत त्याच्यासाठी थोडी अवघड जाणार असली तरी त्याची मोठ्या स्पर्धेत कामगिरी उंचावण्याची क्षमता पाहता तो ही स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील शेवटची १०० मीटर शर्यत जिंकेल अशी आशा आहे.
त्याला त्याच्या शेवटच्या शर्यतीसाठी शुभेच्छा……..