भारतीय संघाने दुसर्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने १९.४ षटकांत ६ गडी राखून पूर्ण केले. भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावांची तुफानी खेळी करत भारताचा विजय सुनिश्चित केला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.
मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांनी पंड्या नव्हे तर टी नटराजनच्या कामगिरीने भारताला विजय मिळविणे शक्य झाले, असे मत मांडले आहे.
“नटराजनची कामगिरी होती निर्णायक”
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसर्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांना मदत करणार्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. २० षटकांत त्यांनी ५ बाद १९४ धावा उभारल्या. यावेळी इतर सगळे गोलंदाज धावा देत असताना डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने मात्र ४ षटकांत केवळ २० धावा देत २ बळी घेतले. संपूर्ण सामन्यात नटराजनची ५.०० ही धावगती सर्वोत्तम होती.
त्याच्या याच कामगिरीने प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडीने भारताच्या विजयात नटराजनचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटले आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत मूडी म्हणाले, “हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने उत्कृष्ट खेळी खेळली. मात्र प्रतिस्पर्धी संघ १९४ धावा काढत असताना नटराजनने फक्त २० धावा देत पटकाविलेले २ बळी, ही माझ्या मते खऱ्या अर्थाने सामना जिंकवून देणारी कामगिरी होती.”
Hardik Pandya was named MOM, top innings but T. Natarajan 2/20 when a team makes 194 was the match winning performance in my view. #AUSvIND
— Tom Moody (@TomMoodyCricket) December 6, 2020
नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच केले पदार्पण
तामिळनाडूचा २९ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने भारताच्या चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वनडे मालिकेतील तिसर्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळालेल्या नटराजनने पहिल्याच सामन्यात १० षटकांत ७० धावा २ बळी घेतले. त्यानंतर खेळलेल्या २ टी-२० सामन्यांत १०.०० च्या सरासरीने त्याने ५ बळी घेतले आहेत. हुकमी यॉर्कर टाकू शकणार्या नटराजनने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळतांना दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान पटकाविले.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टिव्ह वॉ यांच्या २१ वर्षीय मुलाने घेतला क्रिकेटमधून ब्रेक; भारताविरुद्ध खेळला होता सामना
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
“मलाही आश्चर्य वाटले”, ‘त्या’ फटक्यावर कोहलीची गमतीशीर प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग