बंगळूरु। बुधवारी(27 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर दोन सामन्यांची टी20 मालिकाही 2-0 अशा फरकाने जिंकली.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 190 धावा केल्या होत्या. भारताकडून विराटने नाबाद 72, केएल राहुलने 47 आणि एमएस धोनीने 40 धावा केल्या. त्याचबरोबर धोनी आणि विराटने चौथ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारीही केली.
पण ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने पिटर हँड्सकॉम्बला मदतीला घेत भारताने दिलेले 191 धावांचे आव्हान 19.4 षटकातच पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
ग्लेन मॅक्सवेलने 55 चेंडूत नाबाद 113 धावांची विजयी खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. तर हँड्सकॉम्बने नाबाद 20 धावा केल्या.
ही मालिका भारताला गमवावी लागली असला तरी भारतीय खेळाडूंनी या सामन्यात काही खास विक्रम केले आहेत.
या मालिकेत झाले हे खास विक्रम-
-बुधवारी झालेला हा टी20 सामना शिखर धवनचा 50 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. आत्तापर्यंत 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळण्याचा टप्पा एमएस धोनी, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली आणि युवराज सिंग या पाच भारतीय खेळाडूंनी पार केला आहे.
-विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मिळवले तिसरे स्थान. शोएब मलिकची केली बरोबरी. या यादीत विराट आणि शोएब प्रत्येकी 2263 धावांसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील 2272 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच भारताचा रोहित शर्मा 2331 धावांसह अव्वल स्थानी आहे.
-एमएस धोनी आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 षटकारांचा टप्पा केला पूर्ण. याआधी भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रोहित शर्मा, सुरेश रैना आणि युवराज सिंग या तीन खेळाडूंनी केला होता 50 षटकारांचा टप्पा पार.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीने केले 350 षटकार पूर्ण. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू.
– विराटने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्यामध्ये रोहितची बरोबरी केली आहे. त्यामुळे हे दोघेही या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आले आहेत. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 20 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
-मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील तिसरे शतके केले आहे. त्यामुळे तो कॉलिन मुनरोसह आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मुनरोनेही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 3 शतके केली आहेत. तर या यादीत अव्वल क्रमांकावर 4 शतकांसह रोहित शर्मा आहे.
– विराटने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 223 चौकार पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत तिलत्करने दिलशानसह अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.
-धोनी आणि विराट जोडीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 500 धावांच्या भागीदारीचा टप्पा केला पार. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 500 धावांच्या भागीदारीचा हा टप्पा पार करणारी धोनी आणि विराट ही 9 वी भारतीय जोडी.
-विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशात पहिल्यांदाच मालिका पराभूत झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशात 16 मालिका खेळला आहे. त्यातील 14 मालिका भारताने जिंकल्या आहेत. तर 1 मालिका बरोबरीत सुटली आहे आणि बुधवारी पार पडलेली ही मालिका पराभूत झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! एकाच सामन्यात तब्बल ४६ षटकार…
–धोनी-कोहलीने एकाच सामन्यात केला हा खास पराक्रम
–या कारणामुळे एमएस धोनीच आहे टीम इंडियाचा षटकार किंग…






