गेल्या २ महिन्यांपासून संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम मंगळवारी (१० नोव्हेंबर) संपला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रंगतदार लढतीने या हंगामाचा शेवट झाला. यंदा आयपीएलला नवा विजेता मिळेल असे सर्वांचा वाटत असताना, शेवटी रोहित शर्माचा मुंबई संघच विजेतेपदाचा मानकरी ठरला. कोरोना व्हायरसदरम्यान खेळण्यात आलेल्या या हंगामात अनेक अशा गोष्टी घडल्या, ज्या क्वचितच कोणता चाहता विसरु शकेल.
चला तर पाहूया…
– आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापुर्वीच चेन्नई सुपर किंग्स संघात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला होता. दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाडसह एकूण १३ सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. पण चाहरने लवकरच बरे होत १९ सप्टेंबरपासून आयपीएल खेळायला सुरुवात केली, तर गायकवाडला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागला.
– हंगामातील दुसऱ्याच साखळी फेरी सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला होता. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या रोमहर्षक लढतीत दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली होती.
– दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्कारावा लागला. परंतु त्याच सामन्यातून एक नवा वाद पेटला होता. एका शॉर्ट रनमुळे हा वाद झाला होता. सामन्यातील अंतिम षटकात मयंक अगरवाल आणि ख्रिस जॉर्डनने दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
पण पंच नितीन मेनन यांना वाटले की जॉर्डनने पहिली धाव घेताना बॅट क्रीझच्या आत टेकवली नाही. त्यामुळे त्यांनी ती शॉर्ट रन घोषित केली. पण नंतर जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले, तेव्हा ती धाव अर्धी (शॉर्ट रन) नसल्याचे लक्षात आले.
– राजस्थान रॉयल्सच्या हंगामातील दुसऱ्या साखळी फेरी सामन्यात राहुल तेवतियाने शानदार विक्रम केला होता. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर एका षटकात सलग ५ षटकार ठोकले होते. त्यामुळे सर्वांना षटकार किंग युवराज सिंगची आठवण झाली होती.
– आयपीएल २०२० मधील दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने केलेली खेळी सर्वांच्याच चांगली लक्षात राहील. इशान किशनने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून मिळालेल्या २०१ धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला विजयाच्या अगदी जवळ आणले होते. परंतु, शेवटच्या षटकात तो इसुरू उडानाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि सामन्यात बरोबरीत झाली.
त्यानंतर आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये या सामन्यात विजय मिळवला. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने ५८ चेंडूत ९ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ९९ धावांची तुफानी खेळी केली होती.
– १८ ऑक्टोबर २०२० हा दिवस तर कोणताच चाहता विसरु शकणार नाही. या सुपर संडेला एक नव्हे दोन नव्हे, तर तीन सुपर ओव्हर झाल्या होत्या. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी झालेल्या सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. कोलकाताने हा सामना खिशात घातला होता. तर रात्री मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात २ सुपर ओव्हर झाल्या होत्या. शेवटी मुंबईला पंजाबकडून पराभव पत्करावा लागला.
– दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किए याने एकाच षटकात इतिहास रचला होता. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या साखळी फेरी सामन्यात त्याने तब्बल १५६.२२ किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकला. हा आयपीएलच्या १३ हंगामाच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे, तर त्याच षटकात नॉर्किएने सलग ४ चेंडू ताशी १५० किमी वेगाच्या आसपास टाकले होते. यासह आयपीएलमधील ३ सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम त्याने नावावर करत, सर्वांना चकित केले.
– आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफ न खेळता चेन्नई सुपर किंग्ज स्पर्धेतून बाहेर पडला. तसेच संघातील स्टार खेळाडूही जास्त चांगले प्रदर्शन करु शकले नाहीत.
– दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनची सलग दोन सामन्यातील शतके तर आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहली जातील. त्याने साखळी फेरीत पंजाबविरुद्ध नाबाद १०६ धावा आणि त्यापूर्वीच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात नाबाद १०१ धावा केल्या होत्या. यासह तो आयपीएल इतिहासात सलग २ शतके ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
आयपीएल २०२०: एकेकाळी मैदान गाजवणारे ५ मोठे खेळाडू; या हंगामात ठरले सपशेल फ्लॉप
मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021मध्ये नव्या संघाचे होणार आगमन?, वाचा सविस्तर
“मी त्याग करायला पाहिजे होता,” स्वत:च्या चुकीमुळे सूर्यकुमारची विकेट गेल्यानंतर रोहितचे मोठे विधान
खराब चपला धुवत असताना विराट कोहली कॅमेरात कैद; अनुष्का म्हणाली, ‘दौऱ्यावर जाण्या अगोदर…’