टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) झालेला भारत-पाकिस्तान सामना अतिशय रोमांचक होता. टीम इंडियानं अवघ्या 120 धावांचा बचाव करताना पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. एके काळी भारताला पाकिस्तानच्या हातून लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागेल, असं वाटत होतं. पण भारतीय खेळाडूंनी हार मानली नाही आणि शेवटी पाकिस्तानला पाणी पाजलं.
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 19 षटकात सर्वबाद केवळ 119 केल्या. 120 धावांचं छोटं लक्ष्य गाठताना पाकिस्तानचा संघ सहज जिंकेल असं वाटत होतं. 12 षटकांनंतर ते मजबूत स्थितीत देखील होते. परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं आणि संपूर्ण षटकं खेळूनही बाबर आझमचा संघ फक्त 113 धावा करू शकला.
भारताचा टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचा हा 7वा विजय आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला भारताच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टॉप 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. हे 3 खेळाडू भारताच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले.
(3) हार्दिक पांड्या – भारताच्या विजयात उपकर्णधार हार्दिक पांड्याचं योगदान महत्त्वाचं होतं. तो फलंदाजीत अपयशी ठरला, मात्र गोलंदाजीत त्यानं शानदार कामगिरी केली. हार्दिकनं 13व्या षटकात फखर जमानची विकेट घेऊन भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. येथून पाकिस्तानचा डाव गडगडला. तोपर्यंत पाकिस्तानच्या 12 षटकांत 2 गडी गमावून 72 धावा झाल्या होत्या. त्यांना 48 चेंडूत फक्त 48 धावांची आवश्यकता होती. मात्र फखर जमानच्या विकेटनं सामना फिरला. हार्दिकनं 4 षटकांत 24 धावा देत 2 बळी घेतले.
(2) रिषभ पंत – भारताच्या विजयात रिषभ पंतच्या फलंदाजीचा मोठा वाटा आहे. त्यानं एक टोक सांभाळून शानदार फलंदाजी केली, ज्यामुळे टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. यानंतर त्यानं विकेटच्या मागे क्षेत्ररक्षणासह डीआरएसमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पंतनं 31 चेंडूत 42 धावा केल्या. त्याचबरोबर त्यानं यष्टिरक्षक म्हणून 3 झेलही घेतले.
(1) जसप्रीत बुमराह – भारताच्या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती जसप्रीत बुमराहनं! त्यानं गोलंदाजीत कहर करत पाकिस्तानी फलंदाजांना नाकीनऊ आणलं. बुमराहनं 4 षटकात 14 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. बुमराहनं बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
48 चेंडूत 48 धावा हव्या होत्या, 8 गडी बाकी होते; तरीही पकिस्तानचा पराभव! भारतीय गोलंदाजांनी असा फिरवला सामना
टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची अविश्वसनीय कामगिरी
खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद