मुंबई । आयपीएलचे बिगुल वाजले असून 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होईल. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली असून या वेळी कोणते विक्रम नोंदविण्यात येणार किंवा कोणते विक्रम मोडले जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारतीय यष्टिरक्षक खेळाडूंनी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये विकेटच्या मागे धोनीची जादू चांगली चालली आहे. यष्टिरक्षक म्हणून खेळताना सर्वाधिक बळी घेण्याच्या शर्यतीत दिनेश कार्तिक त्याला मागे टाकू शकतो. विशेष म्हणजे धोनीपेक्षा कार्तिकची आकडेवारी चांगली आहे.
एमएस धोनी
आयपीएलमध्ये विकेटच्या पाठीमागे थांबून जास्तीत जास्त बळी घेण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी अव्वल स्थानी आहे. माही हा जगातील दिग्गज यष्टिरक्षक आहे, त्याची शैली वेगळी आणि शानदार आहे. आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत एकूण 190 सामने खेळले आहेत. त्याने 183 डावात विकेटच्या मागे 132 बळी घेतले आहेत. यात त्याने 94 झेल घेतले तर 38 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
दिनेश कार्तिक
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक या यादीत दुसर्या स्थानावर आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून कार्तिक खेळत आहे. आतापर्यंत तो 6 संघांसाठी खेळला आहे. कार्तिकने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 182 सामने खेळले आहेत. या सामन्यात 166 डावात 131 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याने 101 झेल आणि 30 यष्टीचीत केले आहे.
रॉबिन उथप्पा
या यादीत रॉबिन उथप्पा तिसर्या क्रमांकावर फलंदाज आहे. रॉबिन उथप्पाने आयपीएल कारकीर्दीत आत्तापर्यंत एकूण 177 सामने खेळले आहेत. त्याने 114 डावांमध्ये एकूण 90 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान उथप्पाने 58 झेल पकडले तर 32 यष्टीचीत केले आहे.