इंग्लंडचा संघ मागील आठवड्यातच भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संघ ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा संघ जवळपास ४ वर्षांनी भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईला तर शेवटचे २ सामने अहमदाबादला होणार आहेत.
आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड संघात भारतात ६० सामने खेळले आहेत. तसेच भारतात इंग्लंडचे १६१ खेळाडू किमान एक तरी कसोटी सामना खेळले आहेत. त्यातील ४३ खेळाडूंनी भारतात कसोटी पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे यातील अनेक खेळाडूंची कारकिर्द पुढे जाऊन इतकी बहरली की ते दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ओळखले गेले.
या लेखातही आपण अशा ४ इंग्लंडच्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी भारतात पदार्पण केले आहे आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये मोठे नावही कमावले.
४. मॉन्टी पानेसर –
इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू मॉन्टी पानेसरसाठी भारत देश खास ठरला आहे. त्याने अनेकदा भारतात खास कामगिरी केली आहे. त्याचे कसोटी पदार्पणही भारतात झाले आहे. त्याने २००६ साली नागपूर येथे कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ यांना बाद केले होते.
पुढे जाऊन पानेसरने त्याच्या कारकिर्दीत ५० कसोटी सामने खेळले. त्यात त्याने १६७ विकेट्स घेतल्या. त्यातील २८ विकेट्स त्याने भारतात घेतल्या आहेत. एका सामन्यात ११ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
३. ग्रॅमी स्वान –
इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू म्हणून नाव कमावलेल्या ग्रॅमी स्वानचे कसोटी पदार्पणही भारतातच झाले आहे. त्याने २००८ साली चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. हा सामना भारताने चौथ्या डावात ३८७ धावांचे आव्हान पार करण्याच्या विक्रमासाठी ओळखला जातो. असे असले तरी या सामन्यात स्वानने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात असे ४ विकेट्स घेण्यात यश मिळवले होते.
स्वानने त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात गौतम गंभीर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बाद केले होते. पुढे जाऊन स्वान हा इंग्लंडचा नियमित फिरकीपटू बनला. त्याने त्याच्या कारकिर्दीत ६० कसोटी सामने खेळताना २५५ विकेट्स घेतल्या. एका सामन्याच १० विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
२. ऍलिस्टर कूक –
इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या ऍलिस्टर कूकचे कसोटी पदार्पणही भारतात झाले आहे. कूकने २००६ साली नागपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. पदार्पणातच कूकने त्याच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवताना शानदार कामगिरी बजावली. त्याने पहिल्याच डावात ६० धावांची तर दुसऱ्या डावात १०४ धावांची शतकी खेळी केली.
यानंतर कधीही कूक इंग्लंड संघातून त्याच्या खराब कामगिरीमुळे बाहेर गेला नाही. कूकने सर्वात कमी वयात १० हजार कसोटी धावा करण्याचाही विक्रम केला. कूकने त्याच्या कारकिर्दीत १६१ कसोटी सामने खेळताना ४५.३५ च्या सरासरीने १२४७२ धावा केल्या. यात त्याच्या ३३ शतकांचा आणि ५७ अर्धशतकांचा समावेश आहे.
१. जो रुट –
इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार आणि सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या जो रुटचेही कसोटी पदार्पण भारतात झाले आहे. त्याने नागपूर येथे सन २०१२ ला १३ ते १७ डिसेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्याचे पदार्पणही धडाक्यात झाले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात नाबाद २० धावा केल्या होत्या. हा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना होता. विशेष म्हणजे २०१२ ची कसोटी मालिका इंग्लंडसाठी प्रचंड खास ठरली होती. या मालिकेत इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.
पुढे जाऊन रुटने त्याच्या कारकिर्दीत ९९ कसोटी सामने खेळले. आता भारताविरुद्ध ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरु होणारा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे. त्याने आत्तापर्यंत ९९ कसोटी सामन्यात ४९.३९ च्या सरासरीने ८२४९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १९ शतकांचा आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई कसोटीसाठी दिग्गजाने निवडली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, ‘या’ अष्टपैलूला दिली संधी