कसोटी क्रिकेट म्हटलं की नेहमीच फलंदाजांच्या संयमाची परिक्षा पाहिली जाते. एक कसोटी सामना ५ दिवसांचा होतो. प्रत्येक दिवशी साधारण ८ तासात ९० षटकांचा खेळ होतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी फलंदाजांसमोर संयमी खेळ करण्याचे आव्हान असते.
कसोटी हा क्रिकेट प्रकारातील सर्वात धीमा प्रकार मानला जातो. पण असे असले तरी काही फलंदाज असे आहेत ज्यांनी कसोटीतही आक्रमक खेळी केल्या आहेत. कसोटीमध्ये आत्तापर्यंत ४ फलंदाजांनी ६० पेक्षाही कमी चेंडूंचा सामना करत शतकी खेळी करण्याचा कारनामा केला आहे. या ४ फलंदाजांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
सर्वात कमी चेंडूंचा सामना करत कसोटीत शतक करणारे फलंदाज –
४. ऍडम गिलख्रिस्ट – ५७ चेंडू
ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट कसोटीत मधल्या फळीत किंवा खालच्या फळीत फलंदाजीला येत आक्रमक खेळी करायचा. त्याने २००६ ला इंग्लंड विरुद्ध पर्थ कसोटी खेळताना केवळ ५७ चेंडूत शतक केले होते. त्यामुळे तो सर्वात कमी चेंडूंचा सामना करत कसोटीत शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
त्याने या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ५९ चेंडूच नाबाद १०२ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने शतक ५७ चेंडूत पूर्ण केले होते. गिलख्रिस्टने या खेळीदरम्यान १२ चौकार आणि ४ षटकार मारले होते. तो या डावात ऑस्ट्रेलियाने ३५० पेक्षाही अधिक धावा केल्यानंतर फलंदाजीला आला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने २१५ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ५२७ धावांवर घोषित करत २९ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला ५५७ धावांचे आव्हान दिले होते. पण इंग्लंडला ३५० धावाच करता आल्याने ऑस्ट्रेलिया विजेते ठरले होते.
३. मिस्बाह-उल-हक – ५६ चेंडू
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिस्बाह-उल-हककडे मोठे फटके खेळण्याची क्षमता असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण अनेकदा तो धीम्यागतीने फलंदाजी करायचा. मात्र नोव्हेंबर २०१४ ला त्याने कसोटीत सर्वात जलद शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या ३ फलंदाजांमध्ये स्थान मिळवले होते.
त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबुधाबीमध्ये खेळताना दुसऱ्या डावात ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना केवळ ५६ चेंडूत शतकी खेळी केली होती. त्याने त्या डावात ५७ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे मिस्बाहने या सामन्यातील पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या डावात १६८ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५७० धावांवर घोषित केला होता. तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २६१ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने ३०९ धावांची आघाडी घेतली.
पाकिस्तानने दुसरा डाव २९३ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावातील ३०९ धावांच्या आघाडीसह ६०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ २४६ धावांवरच संपुष्टात आल्याने पाकिस्तानने या सामन्यात सहज विजय मिळवला होता.
२. सर विव रिचर्ड्स – ५६ चेंडू
वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर विव रिचर्ड्स कसोटीत चेंडूंच्या तुलनेत सर्वात जलद शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध एप्रिल १९८६ ला सेंट जॉन्स येथे झालेल्या कसोटी सामन्यात केवळ ५६ चेंडूत शतक केले होते.
त्यांनी हे जलद शतक वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात खेळताना केले होते. त्यांनी त्या डावात एकूण ५८ चेंडूत नाबाद ११० धावांची खेळी केली होती. या खेळीत त्यांनी ७ चौकार आणि ७ षटकार मारले होते. त्यावेळी ते कसोटीत सर्वात जलद शतक करणारे खेळाडू ठरले होते. त्यांचा हा विक्रम जवळजवळ २९ वर्षे अबाधित होता.
त्यांच्या या शतकाच्या जोरावर त्या सामन्यात वेस्ट इंडिजने दुसरा डाव २४६ धावांवर घोषित केला होता आणि पहिल्या डावात घेतलेल्या १६४ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला ४११ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सर्वबाद १७० धावाच करता आल्या. तत्पूर्वी वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा पहिला डाव ३१० धावांवर संपुष्टात आला होता.
१. ब्रेंडन मॅक्यूलम – ५४ चेंडू
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम हा १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या ३ क्रिकेटपटूंपैकी १ आहे. त्याने न्यूझीलंडकडून खेळताना अनेक विक्रम केले आहेत. पण कारकिर्दीत शेवटचा कसोटी सामना खेळताना मॅक्यूलमने सर्वात खास विक्रम केला. त्याने शेवटचा कसोटी सामना खेळताना कसोटीत सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला.
हा विक्रम त्याने फेब्रुवारी २०१६ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ख्राइस्टचर्च येथे खेळताना केला. त्याने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून पहिल्या डावात ७९ चेंडूत १४५ धावा केल्या होत्या. ही खेळी करताना त्याने केवळ ५४ चेंडूत शतकाला गवसणी घातली होती.
त्याच्या या खेळीच्या मदतीने न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७० धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५०५ धावा करत १३५ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडला दुसऱ्या डावात ३३५ धावा करता आल्या. पण १३५ धावांच्या पिछाडीमुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला २०१ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार करत हा सामना जिंकला.
विशेष म्हणजे या सामन्यात मॅक्यूलम न्यूझीलंडचा कर्णधार देखील होता. मात्र त्याला कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळताना पराभव स्विकारावा लागला. पण असे असले तरी मॅक्यूलमसाठी हा सामना त्याच्या जलद शतकामुळे नेहमी लक्षात राहिल.
ट्रेंडिंग लेख –
केवळ आणि केवळ एका धावेमुळे हुकली होती ‘या’ ६ दिग्गज भारतीयांची शतकं
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे ५ फलंदाज
थेट विश्वचषकातूनच टी-20 कारकिर्दीला सुरुवात करणारे भारतीय खेळाडू